Wednesday, July 24, 2019

लोकसभा निवडणूकीत मतदानापासून वंचित राहिलेल्‍या मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्‍याची सुवर्ण संधी दिनांक 27 (शनिवार) व 28 (रविवार) जुलै 2019 रोजी विशेष मोहिम




              नांदेड, दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका विचारात घेऊन दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत महाराष्ट्र राज्यातील  सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
              या कार्यक्रमांतर्गत लोकसभा निवडणूकीत पात्र असतांना पण मतदार नसल्‍यामुळे किंवा यादीत नाव न आलेमुळे मतदान करता आले नाही अशा व्‍यक्‍तींना त्‍यांची नावे मतदार यादीत नोंद करण्‍यासाठी दिनांक 30 जुलै 2019 ( सोमवार) पर्यंत अर्ज करता येतील. 
              या कार्यक्रमाचे वेळापत्रकानूसार दिनांक 15 जुलै 2019 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. या मतदार यादीमध्‍ये ज्‍या व्‍यक्‍तींची नावे समाविष्‍ट नाहीत अशांना नमुना -६ मध्‍ये अर्ज सादर करून त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट  करता येतील. तसेच अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना -6अ मध्‍ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्‍ट करता येईल. मतदार यादीत समाविष्‍ट असलेल्‍या नोंदीबाबत आक्षेप असल्‍यास सदर नोंद वगळण्‍यासाठी नमुना -७ मध्‍ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्‍या नोंदीबाबत दुरूस्‍ती करावयाची असल्‍यास नमुना -८ मध्‍ये आणि एका भागातून दुस-या  यादीभागात नोंद स्‍थलांतरीत करावयाची असल्‍यास विहीत नमुना -८अ मध्‍येअर्ज सादर करता येतील.
             मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍याच्‍या अनुषंगाने  दिनांक 27 (शनिवार) व 28 (रविवार) जुलै 2019 रोजी रोजी विशेष मोहिम राबविण्‍यात येत आहे. सदर दिवशी जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रस्‍तरीय  अधिकारी संबंधित मतदान केंदावर उपस्थित राहुन मतदारांचे नाव नोंदणी / वगळणी तसेच दुरूस्‍ती बाबतचे अर्ज स्विकारतील.
             आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 च्‍या अनुषंगाने प्रत्‍येकाने आपले नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्‍ट असल्‍याची खात्री करून घ्‍यावी, मतदार यादीत नाव समाविष्‍ट नसल्‍यास दिनांक  30 जुलै 2019 पर्यंत आपले अर्ज भरून संबंधित बीएलओ, तहसिल कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात जमा करावेत. तसेच मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन नाव नोंदणीची, यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

Tuesday, July 23, 2019


लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन
नांदेड, दि. 23 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. परंतू सोमवार                 5 ऑगस्ट 2019  रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


शेतकऱ्यांनी उपकर योजनेतंर्गत अनुदानावर
कृषि साहित्याचा लाभ घेण्याचे आवाहन

    नांदेड, दि. 22:- सन 2019-20 मध्ये जिल्हा परिषद उपकर योजने अंतर्गत जिल्हयातील शेतकऱ्यांना अनुदानावर डी.बी.टी. कॅशलेस पध्दतीचा अवलंब करुन बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर, ताडपत्री, 3एचपी / 5 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच, पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर) नविन तंत्रज्ञान आधारीत मशिनरी प्रक्रिया यंत्रे इत्यादी कृषि साहित्यांचा लाभ देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
तरी गरजू शेतकऱ्यांनी अनुदानावर औजारे / कृषि साहित्य मिळणेसाठी आवश्यकत्या सर्व कागदपत्रासह प्रस्ताव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे मार्फत जिल्हा परिषद कृषि विभागाकडे सादर करावेत. असे आवाहन जिल्हा परिषद कृषि पशुसंवर्धन सभापती  रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण रेड्डी, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे. औजार निहाय देण्यात येणारे अनुदान खालील प्रमाणे आहे.
            औजाराचे /कृषि साहित्य बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर देय उच्चतम अनुदान  मर्यादा  प्रति औजार 2 हजार एकुण  लाभ  दयावयाची  लाभार्थी संख्या 250, औजाराचे /कृषि साहित्य ताडपत्री देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रति औजार 2 हजार एकुण  लाभ  दयावयाची लाभार्थी  संख्या 1 हजार , औजाराचे /कृषि साहित्य 3 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रति औजार 10 हजार तर औजाराचे /कृषि साहित्य 5 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच देय उच्चतम अनुदान मर्यादा  प्रति औजार 15 हजार एकुण  लाभ  दयावयाची लाभार्थी  संख्या 133, औजाराचे / कृषि साहित्य पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर) देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रति औजार 15 हजार  एकुण  लाभ  दयावयाची लाभार्थी  संख्या 133 , औजाराचे /कृषि साहित्य नविन तंत्रज्ञान आधारीत मशिनरी प्रक्रिया यंत्रे देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रति औजार 20 हजार एकुण  लाभ  दयावयाची लाभार्थी  संख्या 50 अधिक माहितीसाठी पंचायत समितचे कृषि अधिकारी / विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा परिषदेचे कृषि विस्तार अधिकारी यांनी कळविले आहे.
0000  


Sunday, July 21, 2019


नांदेड तहसिल कार्यालयात
जप्त रेती साठ्याचा गुरुवारी लिलाव

नांदेड,दि. 21 :- नांदेड तालुक्यातील भणगी, गंगाबेट, रहाटी बु, सोमेश्वर, जैतापूर, नाळेश्वर, कोटीतीर्थ, नागापूर, वांगी व सिद्धनाथ येथील अंदाजे 4 हजार 890 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. ईटीएस मोजणीअंती या रेती साठ्याचा जाहीर लिलाव गुरुवार 25 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वा. उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे उपस्थितीत तहसिल कार्यालय नांदेड येथे करण्यात येणार आहे. या लिलावात भाग घेण्यास इच्छुकांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.
0000

  


अर्धापूर न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न
न्यायिक कार्यात सक्षम राहून काम केल्यास
न्यायदानासाठी मोलाचे योगदान राहील
-         न्यायमुर्ती प्रसन्न वराळे
नांदेड,दि. 21 :- न्यायिक कार्यात सक्षम राहून काम केल्यास समाजाच्या न्यायदानासाठी मोलाचे योगदान राहील. यातून एकमेकांच्या सहकार्यातून न्यायदानाचे पवित्र कार्य पुढे जाणार असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती प्रसन्न वराळे यांनी अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक अ. धोळकिया हे होते. यावेळी अर्धापूर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्रीमती मयुरा यादव, अर्धापूर अभियोक्ता संघाचे अध्यक्ष किशोर देशमुख, आमदार श्रीमती अमिताताई चव्हाण आदिंची उपस्थिती होती.   
न्यायालयाच्या संख्येत वाढ म्हणजे सामाजिक प्रश्न वाढत असल्याचे सांगून न्यायमुर्ती वराळे म्हणाले, एखाद्या वादाचे निराकरण सामोपचाराने मिटत नसेल, तर अशा अपरिहार्य परिस्थितीत शोषित व्यक्ती न्याय मंदिरात प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी येतो.  या प्रकरणात जलद न्याय देण्याच्या प्रयत्नात लोकन्यायालय व ग्राम न्यायालयातून न्याय हा प्रभावीपणे व तात्काळ मिळतो. त्यातून पारंपारिक न्यायालयावरचा भार कमी होतो. लोकन्यायालयात जास्तीत-जास्त प्रकरणे यशस्वीपणे निपटारा होत आहेत, असेही सांगितले.  
न्यायमुर्ती वराळे पुढे म्हणाले, आपल्या संविधानाने न्याय व्यवस्था व समानता यांना एकासुत्रात आणले आहे. देशाची राज्यघटना ही मुलतत्व मानून न्याय व्यवस्था अधिक समाजाभिमूख होईल. राज्य घटनेच्या विधीद्वारे स्थापित व संचलित अशी स्वयंरचना घेऊन न्याय व्यवस्था कार्यान्वित आहे.  बदलणारे कायदे समाजातील बदलानुसार असल्याचे सांगून बदलते कायदे हे समाजातील अपेक्षांचे तसेच नव्याने होणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. युवा वकिलांनी नव्या कायद्‌याकडे लक्ष दयावे आणि सक्षम रहावे. तसेच मानवी व प्राण्यांचे हक्क, सामाजिक जबाबदारी व अधिकार याबाबत विचार मांडले. पर्यावरण, अपुरे पर्जन्यमान, पाणीसाठा याबाबत जागरुक राहून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचाही संदेश दिला.
प्रस्ताविकात प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया म्हणाले, न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात न्यायालय असावे. यातून अर्धापूर तालुक्यातील न्यायालयाची निर्मिती झाली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री गवई यांच्या हस्ते 25 एप्रिल 2009 रोजी या न्यायालयाची निर्मिती झाल्याची माहिती दिली. न्याय आपल्या दारी या उपक्रमामध्ये नांदेड जिल्ह्याला सृजनशील प्रयोग करण्याची संधी मिळाली आहे. राज्यात निवडक तालुक्यात  ग्रामन्यायालयाची निर्मिती झाली आहे. त्यात अर्धापूर तालुक्याला बहुमान मिळालेला होता. कासारखेडा येथे यशस्वीरित्या ग्रामन्यायालय संकल्पना यशस्वी झाली. आता तामसा येथे ग्रामन्यायालय चालू असल्याचे सांगून नांदेड जिल्हा दिवाणी व फौजदारी खटल्याच्या तडजोडीत निपटारा करण्यात आघाडीवर असल्याचे सांगितले. अर्धापूर येथील सुसज्ज या इमारतीचे बांधकाम 50 वर्षाच्या पुढचा विचार करुन नियोजनबध्द झाल्याचे सांगितले. प्रलंबित खटल्याचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी अभिवक्ता संघाच्या सदस्यांनी सहकार्य करण्याचे सूचविले, असे न्या. धोळकिया यांनी सांगितले.  
सुरुवातील अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अर्धापूर अभियोक्ता संघाचे किशोर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन गजानन पिंपरखेडे यांनी केले तर न्यायाधीश श्रीमती यादव यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, नागरिक आदींची उपस्थिती होती.
00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 23.15 मि.मी. पाऊस



नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यात  रविवार 21 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 23.15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 370.42 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 181.63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 19.19 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 21 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 23.75 (172.14), मुदखेड- 26.67 (239.67), अर्धापूर- 33.00 (174.32), भोकर- 30.25 (180.70), उमरी- 34.67 (210.45), कंधार- 25.17 (182.33), लोहा- 24.83 (149.54), किनवट- 26.43 (182.10), माहूर- 34.75 (236.09), हदगाव- 11.57 (135.27), हिमायतनगर- 12.67 (106.02), देगलूर- 2.00 (134.32), बिलोली- 29.20 (252.40), धर्माबाद- 12.00 (146.65), नायगाव- 31.60 (216.00), मुखेड- 11.86 (188.13). आज अखेर पावसाची सरासरी 181.63 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 2906.13) मिलीमीटर आहे.
00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...