Wednesday, December 12, 2018


कापसाची फरदड घेणे टाळावे
-         कुलगुरु डॉ. अशोक ढवण
नांदेड दि. 12 :- पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चालू हंगामातील कापसाची फरदड घेऊ नये, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रमध्ये 9 डिसेंबरला आयोजित कापूस फरदड निर्मुलन कार्यशाळेतते बोलत होते.
या कार्यशाळेस वनामकृवि परभणीचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, उपविभागीय कृषि अधिकारी बाळासाहेब कदम, कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी डॉ. ढवण म्हणाले, बीटी कापसातील गुलाबी बोंडअळीची प्रतिकरक्षमता लोप पावल्यामुळे या अळीचे एकात्मिक पद्धतीनेच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करावा. विविध वाण व तंत्रज्ञानाचा तूलनात्मक अभ्यास शेतकऱ्यांनी करावा. प्राप्त ज्ञानाचा अन्य शेतकऱ्यांपर्यंत विस्तार माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करावा. कृषि विद्यापीठ व कृषि विभागाच्या समन्वयाने खरीप हंगामात शेंदरी बोंडअळी व्यवस्थापन मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात बचत होवून उत्पादनात देखील सरासरी एक ते दोन क्विंटल पर्यंत वाढ झाल्याची दिसून आले आहे, असे त्यांनी सांगितले. यापुढे देखील शेतकऱ्यांना अडचणी सोडविण्यासाठी कृषि विद्यापीठ सदैव तत्पर राहील अशी ग्वाही कुलगुरु डॉ. ढवण यांनी दिली.
सद्यस्थितीमध्ये कपाशीच्या बोंडामध्ये काही प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसाची फरदड ठेवल्यास पुन:श्च प्रादुर्भाव वाढेल, असे कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी कार्यशाळेच्या प्रस्ताविकामध्ये सांगितले. सध्या राज्यामध्ये कापसाची फरदड घेण्यात येऊ नये म्हणून त्याचे दुष्परिणामांची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेची विमोचन यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
चालू वर्षात जुलै-ऑगस्ट महिण्यात शेतकऱ्यांनी विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभाग यांच्या सल्ल्याने एकत्मिक पद्धतीने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन केल्यामुळेच आपण हंगामामध्ये प्रादुर्भाव नियंत्रणात ठेऊ शकलो. याकरिता विद्यापीठ शास्त्रज्ञांचे कृषि विभागास तत्परतेने सहकार्य लाभत असल्याचे श्री कदम यांनी सांगितले.
कापूस पिकावरील संशोधनात नांदेड येथील कापूस संशोधन नेहमीच अग्रेसर असुन गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे संकेत, त्यावरील उपाययोजना याबाबतची तांत्रिक माहिती या संशोधन केंद्राने बोंडअळीचा प्रादुर्भाव राज्यामध्ये होण्यापूर्वीच दिली होती. सध्या कापसाची पऱ्हाटी शेताबाहेर काढून नष्ट करण्यासाठी जनजागृती करणे अनिवार्य आहे असे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी सांगितले.
यावेळी प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना निविष्ठांचे वाटप करण्यात आले. अर्धापूर तालुक्यातील मौ. जांभरुन येथील प्रात्यक्षिक घेणाऱ्या मन्मथ गवळी या शेतकाऱ्याने या कार्यक्रमात अन्य शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानामुळे त्यांना मिळालेल्या फायदयाची माहिती दिली.
या कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रामध्ये प्रा. अरविंद पांडागळे यांनी कापूस फरदड निर्मूलन बाबत व गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन बाबत डॉ. शिवाजी तेलंग यांनी माहिती दिली. भविष्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व भागामध्ये एकत्रितपणे जनजागृती करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन अ. द. पांडागळे यांनी केले व प्रा. डी. व्हि. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ. पवन ढोके, श्री शेळके, श्री पांचाळ, श्री शिंदे, श्री जोगपेटे व श्री कळसकर इत्यादींनी परिश्रम घेतले.
00000


दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन
- सचिंद्र प्रताप सिंह कृषि आयुक्त
राज्याचे ढोबळमानाने मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असे चार विभाग पडतात. यामध्ये कोकण विभागात आंबा,काजु, नारळ, चिकु,सुपारी, पश्चिम महाराष्ट्रात केळी, पपई, पेरु, द्राक्ष,डाळींब, सिताफळ, लिंबु, मराठवाडा विभागात मोसंबी, लिंबु, डाळींब, आंबा, सिताफळ विदर्भात संत्रा, मोंसबी, लिंबु, आंबा, सिताफळ, केळी, बोर, डाळींब, पेरु, आवळा, पपई इ. फळपिकाची प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते.
सुक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर
उन्हाळ्यात किंवा दुष्काळ सदृष्य काळात फळबागा वाचविण्यासाठी सुक्ष्म सिंचन मुख्यत: ठिबक पध्दतीचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजेच पारंपारिक पध्दती पेक्षा 50 ते 60 टक्के पाणी बचत होते. शिवाय दर्जेदार व अधिक उत्पादन मिळते. तसेच मजुरां वरील व खता वरील खर्च कमी होतो. यामुळे शेतकरी बंधूंनी सुक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा व कमीत कमी पाण्यामध्ये आपल्या फळबागा टिकवाव्यात. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति-थेंब अधिक पिक या योजने अंतर्गत अल्प, अत्यल्प अनुसूचित जाती-जमाती या शेतक-यांना एकूण खर्चाच्या 55 टक्के अनुदान व इतरशेतक-यांना 45 टक्के अनुदान सुक्ष्म सिंचनासाठी देण्यात येते.
मटका सिंचन पध्दतीचा वापर
उन्हाळ्यामध्ये मटका सिंचनाव्दारे सुध्दा आपण फळबागा जगविणे शक्य आहे. फळबागांच्या वयोमानानुसार प्रतिझाड 5 लिटर क्षमतेचे 2 ते 4 मटक्याचा उपयोग करावा. मटक्याच्या तळाशी छिद्र पाडून त्यामध्ये कपडयाची गाठ बसवून मटक्याचे तोंड जमिनीच्या दोन इंच वर राहील अशा बेताने ज्या भागात झाडाची तुंतुमय मुळे जास्त प्रमाणात असतील. (दुपारी 12 वाजता झाडाच्या सावलीच्या आतील बाजूस) पुरावे. यामुळे आवश्यकते नुसार व सतत झाडाला पाण्याचा पुरवठा होत राहील.
आच्छादनाचा वापर
ठिबक सिंचना सोबत जर आपण आच्छादनाचा वापर केला तर प्रखर सूर्यप्रकाशामुळे व अधिक तापमानामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन क्रिया आटोक्यात येईल आणि जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहील व जमिनीची धूप देखील कमी होईल. आच्छादना करिता आपण विविध प्रकारचे साहित्य वापरू शकतो. उदा. वाळलेले गवत, पालापाचोळा,सोयाबिनचा भुसा,ऊसाचे पाचट,गव्हाचे काड,केळीची वाळलेली पाने, तुरकाडया,कपाशीच्या पऱ्याटी,लाकडाचा भुसा इ. अशा नैसर्गिक आच्छादनांची जाडी ही 12 ते 15सेमी असावी व हे आच्छादन झाडाच्या पूर्ण परिघात करावे.
सेद्रींय आच्छादनासाठी साहित्य उपलब्ध न झाल्यास प्लॅस्टिक पासून बनविलेल्या वस्तूंचा उपयोग करून आच्छादन करू शकतो (पॉलिथीनमल्चिंग). यामध्ये यु.व्ही.स्टबिलाईज्ड फिल्मचा वापर केला जातो. जास्त कालावधीच्या बहुवर्षायु फळपिका करिता या फिल्मची जाडी ही 100 ते 200 मायक्रॉनअसावी. पॉलिथीन आच्छादनासाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के, जास्तीत जास्त 16 हजार रुपये मर्यादेपर्यंत प्रतिहेक्टरी अनुदान एकात्मिक फलोद्यान विकास अभियान मधून दिले जाते.

झाडांचे छत्र व्यवस्थापन
झाडाने शोषण केलेल्या पानाच्या जवळपास 98 टक्के पाणी हे झाडांची तापमान नियंत्रित करणे करिता पानाव्दारे पाण्याचे उत्सर्जन करीत असते. हे उत्सर्जन नियंत्रित करणे करिता उपाययोजना कराव्यात.
बाष्परोधकांचा वापर :- प्रकाश संशलेषणावर विपरित परिणाम न करता पानाव्दारे पाण्याचे उत्सर्जन नियंत्रित करणे करिता विविध बाष्परोधकांचा उदा.केओलिन, फिनील मर्क्युरिक ॲसिटेट वापर करून झाडाच्या पाण्याची आवश्यकता कमी करावी. झाडावर 2 ते 8 टक्के तिव्रतेच्या केओलिन या बाष्परोधकाची फवारणी दर 2 आठडयाच्या अंतराने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडया पासुन ते पाऊस सुरु होई पर्यंत फवारण्या कराव्यात. फळझाडावर पोटॅशिअम क्लोराईडच्या 1 टक्के द्रावणाची फवारणी केल्यास दुष्काळी परिस्थितीत झाडे तग धरु शकतात.
झाडांची छाटणी :- झाडाची हलकी छाटणी करावी. त्यामुळे पानांची संख्या कमी होईल व पाण्याचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. या शिवाय पाण्याच्या उपलब्ध ते नुसार बहार घ्यावयाचा किंवा नाही हे ठरवावे.
झाडांवरील पानोळा कमी करावा. (डिव्होलिएशन) :- छाटणी शिवाय पानांची संख्या कमी करावी. त्या करिता विविध रसायने उपलब्ध् आहेत त्याचा वापर करावा. उदा.सायकोसिल.
खोडांचे उन्हापासून संरक्षण
जमिनीत असलेल्या कमी ओलाव्यामुळे आणि उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाशामुळे झाडांच्या खोडास इजा होण्याची शक्यता असते. त्याकरिता उन्हाळयाच्या सुरुवातीस फळझाडांच्या मुख्य खोडास 1 टक्का बोर्डो पेस्टचा लेप द्यावा. तसेच ज्या भागात उन्हाची तीव्रता जास्त आहे. अशा परिस्थितीत मुख्य खोडास गवताने किंवा बारदानाने झाकून घ्यावे व सुतळीच्या सहाय्याने घट्ट बांधून घ्यावे.
जमिनीत पाणी धरून ठेवणा-या घटकांचा वापर करावा:- मातीमध्ये मिसळणारे आणि त्यांच्या वजनाच्या 200 ते 300 पट अधिक पाणी धरून ठेवणारे घटक जसे जलशक्ती, अमरशक्ती, पोटॅशिअम नायट्रेट सारखी रसायने जमिनीत टाकावीत. तसेच जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे जमिनीची पाणी साठवून धरण्याची क्षमता वाढविण्यास मदत होते.
नवीन झाडाकरिता सावली करावी :- नवीन फळझाडाची लागवड केळी असल्यास त्याकरिता पहिल्या वर्षी विशेष काळजी घ्यावी. ही झाडे अती उष्णतेमुळे करपून किंवा जळून जाण्याची शक्यता असते. त्याकरिता शेतातच उपलब्ध साहित्याच्या किंवा प्रत्येक झाडास शेडनेटचा मंडप करून नवीन झाडांना सावली करावी. ज्या शेतक-यांकडे ठिबक सिंचनाची व्यवस्था नाही अशा शेतक-यांनी सिंचनासाठी दोन सरी पध्दतीचा किंवा खळगे पध्दतीचा वापर करावा व त्यावर आच्छादनाचा वापर करावा.
या शिवाय, खते शक्यतो फवारणी अथवा ठिंबक सिंचनाव्दारे देण्यात यावीत. झाडावरील अतिरिक्त फळे, फण्यांची विरळणी करावी.पक्व झालेल्या फळांची काढणी करावी. बागेभोवती 50 टक्के शेडनेट वापरुन वारा संरक्षक कुंपन करावे. शेताची सर्वसाधारण स्वच्छता राखावी , झाडावरील रोगट किडक्या फादंया काढायाव्यात. शेत तणमुक्त ठेवावे. केळीची पिल्ले नियमित कापावीत. फळबागेत आंतरमशागतीची कामे करुन वाफ्यातली माती भुसभुशीत ठेवावी.
शेततळयामध्ये पाणी उपलब्ध असल्यास फळबागा जिवंत राहतील या पध्दतीने सिंचन करावे. तसेच ज्या शेतक-यांना शेततळे घ्यावयाचे त्यासाठी मागेल त्याला शेततळे या योजनेतून 100 टक्के अनुदान शेततळे करण्यासाठी जास्तीत 50 हजार रुपये मर्यादेपर्यंत देण्यात येते.
-----

Tuesday, December 11, 2018


अल्पसंख्यांक हक्क दिन 18 डिसेंबरला

नांदेड, दि. 11 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून मंगळवार 18 डिसेंबर 2018 हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणवी, माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, या कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद आदींचा समावेश असावा, असे जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले.
00000


आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांचा
गुरुवारी भरती मेळावा

नांदेड दि. 11 :-  औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे ऑगस्ट 2018 या सत्रात शिकाऊ उमेदवाराची भरती करण्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे सभागृहात उपस्थित रहावे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण उमेदवारांनी apprenticeship.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी. पात्र उमेदवारांनी मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून या संधीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जी. जी. पाटनुरकर यांनी केले आहे.
000000



राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत
सहा बालकांची मुंबईत हृदय शस्त्रक्रिया होणार

नांदेड दि. 11 :- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे सहा बालकांना पाठविण्यात आले आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळातील बालकांची 45 आरोग्य पथकामार्फत दरवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येते. या वार्षात शुन्य ते 18 वयोगटातील 7 लाख 68 हजार 746 बालकांपैकी 6 लाख 47 हजार 312 बालकांची नोव्हेंबर 2018 अखेरपर्यंत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत 3 हजार 496 बालकांना ग्रामीण / उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड आदी ठिकाणी निदान व उपचार करण्यात आले.
जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ ए. पी. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
मागील तीन वर्षात 213 बालके हृदयरोगाची आढळून आली असून त्यापैकी 178 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन 2018-19 या वर्षामध्ये 27 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे तर उर्वरित 35 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया मार्च 2019 पर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील तीन वर्षात 754 बालके इतर शस्त्रक्रियेची आढळून आलेली असून त्यापैकी 628 बालकांच्या इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन 2018-19 या वर्षात 77 बालकांच्या इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
00000

Monday, December 10, 2018


अल्पसंख्यांकासाठी शासनाच्या चांगल्या योजना  
- हाजी अराफत शेख
नांदेड, दि. 10 :-  शासन अल्पसंख्याकांसाठी चांगल्या योजना राबवित आहे. योजनांची दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन आढावा घेण्याच्या सूचनाही  राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केली.  
जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या केंद्राच्या पंधरा कलमी कार्यक्रमाच्या अमलबजावणीचा आढावा  येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक संजय जाधव आदि विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
उर्दू घराबाबत तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून उर्दू घराचे काम कार्यान्वित करण्यात येईल.  त्यांनी शहरातील उर्दू घराला प्रत्यक्ष भेट देखील दिली. त्यापूर्वी त्यांनी शीख समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सचखंड गुरुद्वाराला प्रत्यक्ष भेट दिली.
देशभरातून येणाऱ्या शिख भाविकांसाठी  रेल्वेने रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक एकवर उतरण्याची आणि पुन्हा परत जाणाऱ्या प्रवाशांना ही फलाट क्रमांक एक वरच रेल्वेत सोडण्याची व्यवस्था करून द्यावी. यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करु असेही त्यांनी गुरुद्वाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.पी सिंग यांना सांगितले. गुरुद्वाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. पी. सिंग यांनी हाजी अराफत शेख यांच्यासमोर आपल्या काही मागण्या सादर केल्या. त्यामध्ये शीख धर्माचे धर्मगुरू गुरुगोबिंद सिंघजी तीनशे वर्षापूर्वी ज्या मालटेकडी परिसरात थांबले होते. त्या परिसरातील गुरुद्वाराच्या जागेला अधिकची गायरान जमिनीची जागा शासनाने उपलब्ध करून द्यावे, ही मागणीही त्यांच्याकडे केली.  कौशल्य विकास योजनेअंतर्गत होणाऱ्या प्रशिक्षण मेळाव्यासाठी प्रचार, प्रसार व्हावा. विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत पाठपुरावा करावा. घरकुल योजना पारदर्शक पद्धतीने राबवा, असेही त्यांनी सांगितले.  
0000


मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील  
                                          - डॉ. भागवत कराड

नांदेड, दि. 10 :-  मराठवाड्यातील सिंचन, शैक्षणिक, आरोग्य तसेच इतर क्षेत्रातील अनुशेष दूर करणार असून अधिकाधिक निधी आणून सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविणार असून मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. मराठवाडा विकास कामांना गती देण्यासाठी पाणी प्रश्न आणि इतर अनुशेष निर्मुलन व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनेबाबतच्या बैठकीत ते बोलत होते.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार हेमत पाटील, महापौर शिलाताई भवरे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अभिवन गोयल, मनपा आयुक्त लहुराज माळी, म.वि.म.औरंगाबाद सहसंचालक रविंद्र जगताप, तज्ज्ञ सदस्य कृष्णा लव्हेकर, मुकूंद कुलकर्णी, डॉ. अशोक बेलखोडे, भैरवनाथ ठोंबरे, डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रा. बालाजी कोंपलवार, हर्षद शहा आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            तालुकानिहाय पडलेल्या पर्जन्यमानाचा तालुकानिहाय अहवाल, जलाशयातील पाणीसाठा,  जलाशयातील पाणी आरक्षण मागणी, ग्रामीण पाणी टंचाई आराखडा , ग्रामीण व नागरी भागातील पाणीटंचाई, दुष्काळ निवारण कामांचा आढावा, चारा टंचाई, खरीप 2018-2019 हंगामातील दुष्काळी तालुक्यांची माहिती, मग्रारोहयो कामांचा आढावा आदि विविध विभागांचाही यावेळी आढावा मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड  यांनी घेतला.
000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...