Wednesday, August 8, 2018


कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या
अनुषंगाने दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड, दि. 8 :- मुदखेड तालुक्यात मुदत संपणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 11 ऑगस्ट 2018 रोजी मतदान व 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होत आहे. त्यासंबंधी मुदखेड संपूर्ण तालुक्यात मतदान होत असलेल्या गावी दारु विक्री बंद ठेवण्याचे सुधारीत आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.  
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
यामध्ये मुदखेड संपूर्ण तालुक्यात मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर सायं 6 वाजेपासून अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची तारीख व ठिकाण 10 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून व मतदानाचा दिवस 11 ऑगस्ट रोजी संपुर्ण दिवस. मतमोजणी होत असलेल्या शहर / गावात मतमोजणीचा दिवस 12 ऑगस्ट 2018 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद व मुदखेड येथील कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणुका होणार आहेत. परंतू मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशान्वये धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असल्याने धर्माबाद तालुक्यातील अनुज्ञाप्त्या चालू राहतील, असेही सुधारीत आदेशात नमूद केले आहे.
000000


हदगाव कृषि उत्‍पन्‍न बाजार
समितीच्या गणाचे आरक्षण निश्चीत

नांदेड, दि. 8 :- हदगाव कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या गणाचे आरक्षण जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) तथा जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्‍यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे आज निश्‍चीत करण्‍यात आले आहे.  
या आरक्षण सोडतीसाठी अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्‍हाधिकारी सामान्‍य श्रीमती अनुराधा ढालकरी, सहायक निबंधक सहकारी संस्‍था नांदेड, हिमायतनगरचे तहसिलदार, नायब तहसिलदार सहा.निबंधक सहकारी संस्‍था हदगाव व सचिव कृषि उत्‍पन्‍न  बाजार समिती हदगाव तसेच जिल्‍हा परिषद सदस्‍य  गजाजन गंगासागर, विजय बास्‍टेवाड, माजी जि.प.सदस्‍य पंजाबराव पाटील हरडफकर, पंचायत समिती पदाधिकारी भंडारे आनंद, पदाधिकारी आणि संबंधित बाजार समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हदगाव कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या 15 गणांचे विभाजन करण्‍यात आल्‍याचे व गणामध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या गावाची माहिती चित्रफीतीव्‍दारे (पीपीटीव्‍दारे) उपस्थिताना सांगण्‍यात आली. त्‍या एकूण 15 गणापैकी 5 गणाचे आरक्षण लहान बालकांच्‍या  हस्‍ते लॉटरी पध्‍दतीने  निश्चित करण्‍यात आले. त्‍याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
गणाचा क्रमांक
गणाचे नाव
आरक्षणाचा तपशील
1
तळणी
विमुक्‍त जाती/भटक्‍या जमाती
2
शिरड
सर्वसाधारण
3
धानोरा रु.
अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमाती
4
कोळी
महिलांसाठी
5
तालंग
सर्वसाधारण
6
पळसा
महिलांसाठी
7
हदगाव
सर्वसाधारण
8
हरडफ
सर्वसाधारण
9
तामसा
सर्वसाधारण
10
सावरगाव
सर्वसाधारण
11
चाभरा
सर्वसाधारण
12
मांडवा
इतर मागासवर्गीय
13
पिंपळगाव
सर्वसाधारण
14
आष्‍टी
सर्वसाधारण
15
कांडली बु.
सर्वसाधारण
राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यांच्या आदेशान्‍वये व महाराष्‍ट्र कृषि उत्‍पन्‍न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 चे (सुधारणा) नियम 2017 मधील तरतूदी तसेच सहकार, पणन व वस्‍त्रोद्द्योग विभागाचा अध्‍यादेश क्र. 2017 (Ordinance No. XVII of 2017) दि. 31 ऑगस्‍ट, 2017 च्‍या अध्‍यादेशाव्‍दारे महाराष्‍ट्र कृषि उत्‍पन्‍न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 चे कलम 13, कलम 14 आणि कलम 14-अ मध्‍ये झालेल्‍या सुधारणांना अनुसरून या बाजार समितीच्‍या  गणाची आरक्षण सोडत काढण्‍यात  आली आहे.
000000


Tuesday, August 7, 2018


हदगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती
बाजार क्षेत्रातील आरक्षण सोडत
बचत भवन येथे आज होणार
            नांदेड दि. 7 :- हदगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणूककामी बाजार क्षेत्रातील आरक्षण सोडत जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) अरुण डोंगरे यांचे अध्‍यक्षतेखाली बुधवार 8 ऑगस्ट 2018 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे सकाळी 11.30 वा. काढण्‍यात येणार आहे. संबंधीत नागरिकांनी या आरक्षण सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांचे आदेशान्वये कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणूकीसाठी नांदेड जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी यांना जिल्‍हा  निवडणूक अधिकारी (कृउबास) म्‍हणून घोषीत केले आहे. त्‍यानुषंगाने दिनांक 31 डिसेंबर 2017 अखेर मुदत संपणाऱ्या नांदेड जिल्‍ह्यातील हदगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची निवडणूक प्रक्रीया घेण्‍याचे प्राधिकरणाचे निर्देश आहेत.
            हदगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रात एकुण 161 गावे समाविष्‍ट आहेत. राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांचे 5 डिसेंबर 2017 रोजीच्‍या आदेशानुसार गावातील गावनिहाय खातेदारांची संख्‍या विचारात घेवून या गावाचे एकुण 15 गणांमध्ये (विभाग) विभाजन करून महाराष्‍ट्र कृषी उत्‍पन्‍न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 13 (1) मधील तरतूदीनूसार 15 गणापैकी महिलांसाठी 2 गण,  इतर मागासवर्गीयांसाठी- 1 गण, विमुक्‍त  जाती / भटक्‍या जमाती साठी- 1 गण, अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीसाठी 1 गण असे एकुण 5 गणांचे आरक्षण लॉटरी पध्‍दतीने जाहीर करावे. तसेच गणाचे आरक्षण काढताना संबंधीत बाजार क्षेत्रातील लोकसभा / राज्‍यसभा सदस्‍य, विधानसभा / विधानपरिषद सदस्‍य, जिल्‍हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती पदाधिकारी, संबंधीत बाजार समितीचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत जाहीर करण्‍याचे निर्देश आहेत.
000000

Monday, August 6, 2018


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 6 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.
00000


वैयक्तिक लाभ योजनेसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 6 :- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडील 20 टक्के सेस निधीतून सन 2018-19 या आर्थिक वर्षात वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी पंचायत समिती स्तरावरुन अर्ज करावीत, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
वैयक्तिक लाभांच्या योजनेत पुढील योजनेचा समावेश आहे. मागासवर्गीय प्रशिक्षीत महिलांना शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन देणे. अपंगांना कृत्रीम अवयव साहित्य व मिरची कांडप, पिठाची गिरणी पुरविणे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल, मागासवर्गीय पिठाणी गिरणी व झेरॉक्स (प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स लहान मशीन), मागासवर्गीय शेतकऱ्यांना 3 एचपी विद्युत मोटार पुरविणे. मागासवर्गीयांना व्यवसायासाठी वाहन वाटप करणे या योजनेचा यात समावेश आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


नांदेड जिल्ह्यात गुलाबी बोंडअळी
व्यवस्थापन अभियानास सुरुवात
नांदेड दि. 6 :- गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवन यांचे मार्गदर्शनाखाली "विद्यापीठ आपले दारी तंत्रज्ञान शेतावरी" या कार्यक्रमातर्गत "गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन मोहिम" नांदेड जिल्ह्यात 2 ते 10 ऑगस्ट 2018 दरम्यान राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी यामोहिमेत सहभागी होऊन शेंदरी बोंडअळी व्यवस्थापन वेळेवर करावे, असे आवाहन कापूस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. खिजर बेग जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. आर.बी चलवदे यांनी केले आहे.  
मराठवाडा विभागात कापूस लागवडीखाली जवळपास 15 लाख हेक्टर क्षेत्र आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी जून पहिल्या / दुसऱ्या आठवड्यात कापसाची लागवड केली. गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव सन 2017-18 वर्षात महाराष्ट्र इतर राज्यात मोठ्या प्रमाणावर झाला होता.
यावर्षी प्रादुर्भाव होण्याअगोदरच गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उपविभागीय कृषि अधिकारी यांनी कापूस संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकरी यांचेमार्फत "गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन मोहिम" राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे शेतावर प्रत्यक्ष भेट, प्रशिक्षण गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे लावण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथील शास्त्रज्ञांना संपर्क साधून शेंदरी बोंडअळी नियंत्रण अभियान यशस्वी करावे. उपाययोजनासाठी भ्रमणध्वनी क्र. डॉ. खिजर बेग (7304127810), प्रा. डी. व्हि. पाटील (7588082155) डॉ. एस.एम. तेलंग (9421569018), प्रा. पांडागळे (7588581713), डॉ. पवन ढोके (7588581733), प्रा. अे.आर. गायकवाड (940038683) या शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...