Thursday, December 8, 2016

राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्या
अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक
नांदेड, दि. 8 :-  जिल्ह्यातील नगरपरिषद / नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार 9 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह नांदेड येथे घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
संबंधित विभागांनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीच्या अद्यावत माहितीसह बैठकीस उपस्थित रहावे, असेही त्यांनी कळविले आहे.
00000


उमेदवारांनी आचार संहितेचे पालन करावे
नांदेड, दि. 8  :- उमेदवारांनी आचार संहितेचे पालन करावे व शांततेत निवडणूक पार पाडावेत, असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी, नगरपरिषद धर्माबाद  डॉ. सचिन खल्‍लाळ यांनी केले.
धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक संदर्भात उमेदवार व राजकीय पक्षाकडून आचार संहिताचे उल्‍लंघन होवू नये यासाठी कोणतदक्षता घेणे आवश्‍यक आहे. याबाबत संबंधीत उमेदवारांना माहिती व्‍हावी यासाठी आज आचारसंहिता संदर्भात नगरपरिषद सभागृहात बैठक आयोजन करण्‍यात आली होती.
            आचार संहिताबाबत काय करावे व काय करु नये याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ज्‍योती चौहान यांनी मार्गदर्शन केले.  बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल माचेवाड, उमेदवार पक्षाचे कार्यकर्त नगरपरिषद निवडणूक विभागाचे रुक्‍माजी भोगावार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 8  :- जिल्ह्यात बुधवार 21 डिसेंबर 2016  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनांची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात बुधवार 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2016 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

000000
अंशकालीन उमेदवारांना नाव नोंदणीसाठी
30 डिसेंबर पर्यंत मुदत ; अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 8 :- जिल्ह्यातील अंशकालीन उमेदवारांनी जुलै-2016 मध्ये अंशकालीन प्रमाणपत्र पडताळणीसाठी विहित नमुन्यात अर्ज सादर केली नाहीत अशा उमेदवारांनी पुरवणी यादीसाठी मंगळवार 13 डिसेंबर ते शुक्रवार 30 डिसेंबर 2016 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज शपथपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे सादर करावीत, असे आवाहन सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार केंद्र नांदेड यांनी केले आहे.   
अंशकालीन उमेदवारांची अद्यावत यादी तयार करण्यात आली होती. शासनाकडून या यादीस मुदतवाढ देण्यात आली आहे. पुरवणी यादी तयार करण्यासाठी जिल्ह्याती ज्या अंशकालीन उमेदवारांचे यादीत नाव समाविष्ट नाहीत अशा उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत शपथपत्र व शैक्षणिक कागदपत्रे सादर करावीत. मुदतीनंतर आलेल्या उमेदवारांची नावे यादीत समाविष्ट होणार नाहीत. अधिक माहितीसाठी 02462-251674 या दूरध्वनीवर संपर्क साधवा, असेही आवाहन केले आहे.

00000

Wednesday, December 7, 2016

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 डिसेंबर रोजी
नांदेड, दि. 7 :-  ऊर्जा संवर्धनाचे महत्व पटवून देण्यासाठी 14 डिसेंबर 2016 रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन व 14 ते 20 डिसेंबर 2016 दरम्यान राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करावा, असे सर्व शासकीय विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी निर्देशीत केले आहे.
विविध कार्यक्रमांनी ऊर्जा संवर्धनाच्या साधनाची व्यापक जनजागृती करावी. शालेय स्तरावर ऊर्जा संवर्धन विषयावरील निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित कराव्यात. द्योग क्षेत्रातील विविध संघटनांनी जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करावेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रात म्हटले आहे.

000000000
धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक
मतदान जागृती अभियान संपन्न
नांदेड, दि. 7 :-   मतदान निवडणूक जनजागृती रॅली धर्माबाद नगरपरिषदेच्‍या प्रांगणातून मंगळवार 6 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्‍यात आली.
रॅलीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धर्माबाद डॉ. सचिन खल्‍लाळ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ज्‍योती चौहान, सुनिल माचेवाड, धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील, पोलीस निरिक्षक अंगद सुंडगे, शाळेचे मुख्‍याध्‍यापक, सहशिक्षक, शिल्‍पनिर्देशक, कार्यालयातील कर्मचारी, तलाठी, पालक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी पथनाट्यासाठी तहसिलदार श्रीमती ज्‍योती चौहान यांनी सहभागी मुला-मुलींना मार्गदर्शन केले. धर्माबाद येथील जिजामाता कन्‍याशाळा, हुतात्‍मा पानसरे हायस्‍कुल,  इंदिरा गांधी पब्‍लीक स्‍कुल, गुरुकूल विद्यालय, लाल बहादुर शास्‍त्री महाविदयालय धर्माबाद, कस्‍तूरबा गांधी विदयालय, ऊर्दू हायस्‍कुल, जि.प. हायस्‍कुल धर्माबाद या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निवडणूक जनजागृती रॅली नगरपरिषद येथून आय.टी.आय, नरेंद्र चौक, नेहरु चौक, साईबाबा चौक, तसेच मोंढा मार्गे काढण्‍यात आली. रॅलीस चांगला प्रतिसाद मिळाला.  
नायब तहसिलदार माचेवाड यांनी कार्यक्रमाचे प्रस्‍ताविक केले. विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी आपले मत मांडले. विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी पथनाटय व गीत सादर केले. मतदानाचे महत्‍व पटवून देवून धर्माबाद शहरातील नागरीकांनी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी मतदान नि:पक्ष व निर्भिडपणे मतदान करण्‍याचे आवाहन डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. मतदान जनजागृती कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख एन.पी. पांचाळ यांनी केले.
निवडणूक विषयी दुसरे प्रशिक्षण संपन्न
 धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्रिय अधिकारी, केंद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण 6 डिसेंबर रोजी संपन्‍न झाले. यापुर्वी प्रशिक्षणास निवडणूक निरिक्षक तथा अतिरिक्‍त मुख्‍यकार्यकारी अधिकारी पदमाकर केंद्रे यांची उपस्थिती होती.
            या प्रशिक्षणात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती ज्‍योती चौहान व सुनिल माचेवाड यांनी मार्गदर्शन केले. केंद्रअध्‍यक्ष व मतदान अधिकारी यांनी ईव्‍हीएम मशिनची प्रात्‍यक्षिकव्‍दारे प्रशिक्षण देण्‍यात आले. केंद्र प्रमुख एन.पी. पांचाळ यांनी पीपीटीव्‍दारे मतदान अधिकारी यांना माहिती दिली. मतदान अधिकारी यांना नि:पक्ष व निर्भिडपणे काम करण्‍याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ यांनी केल्‍या.

000000
वेतन पडताळणी पथकाचा
जानेवारी 2017 महिन्याचा दौरा
नांदेड, दि. 7 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे जानेवारी 2017 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 17 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 18 जानेवारी ते गुरुवार 19 जानेवारी या काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे  पथक या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील.
वेतन पडताळणीस सेवा पुस्तके सादर करण्यापुर्वी शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर 1299/प्र.क्र.5/99/सेवा-10 दि. 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवा पुस्तके पडताळणीस सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवा निवृत्ती होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन, लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करताना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगीन करावे डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहे त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून Submit करावे. म्हणजे लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल. त्याच पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी  पथकाकडे  सादर  करावीत, असे सूचित केले आहे. 

0000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...