Tuesday, June 18, 2024

 वृत्त क्र. 494

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यशवंत महाविद्यालयात आजपासून मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन 

बुधवारी सकाळी ११ वाजता यशवंत महाविद्यालयात प्रदर्शनाचे उद्घाटन  

नांदेड दि. 18 :-  आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी जगभर साजरा करण्यात येतो.  त्यानिमित्त यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नांदेड येथे 19 ते 21 जून 2024 दरम्यान येथील यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहूउद्देशीय क्रीडा संकुल येथे, योग अभ्यासावर आधारित मल्टीमिडीया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्युरो, नांदेड व श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 19 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. 

 यावेळी माजी मंत्री तथा श्री. शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनिल बेतीवार, नगर रचना विभागाचे सहायक संचालक पी.एल. आलूरकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, द आर्ट ऑफ लिविंगचे समन्वयक शिवा बीरकले, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आणि सर्व प्राध्यापक वर्ग तसेच संस्थेचे कर्मचारी-विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनानिमित्त संपूर्ण योग अभ्यासाची माहिती विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळावी यासाठी 19 ते 21 जून दरम्यान यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहुउद्देशीय क्रीडा संकूल येथे द आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या सहकार्याने सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योगाभ्याची माहिती विद्यार्थांना मिळावी यासाठी विविध शाळांमध्ये योगावर आधारित पोष्टर स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दिनांक 21 जून 2024 रोजी जनजागृती रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाची संकल्पना "महिला सक्षमीकरणासाठी योग" ही असून यावर्षी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे. महिलांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करून आणि जागतिक आरोग्य आणि शांतता यांना प्रोत्साहन देऊन योगाभ्यासाला एक व्यापक चळवळ म्हणून चालना देणे हा योग महोत्सव 2024 चा उद्देश आहे.

00000



वृत्त क्र. 493 दि. 15 जून 2024

 बकरी ईद सण शांततेत साजरी करण्याचे आवाहन

·  शांतता समितीची बैठक संपन्न

नांदेड दि. 15 :- बकरी ईद सणानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी. यासाठी जिल्ह्यात व शहरात बकरी ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करण्यात यावी, यासाठी सर्वानी नियमाचे पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सर्व विभागाना सूचना केल्या.

आज जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात मंथन हॉल येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय धरणे व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आणि शांतता समितीचे सदस्य व सर्व संबंधित विभागप्रमुख आदीची उपस्थिती होती.  

0000






वृत्त क्र. 492 दि. 15 जून 2024

युवाशक्ती करीअर शिबिराच्या माध्यमातून ; युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध 

             -  आमदारांची कार्यक्रमाला उपस्थिती 

·  युवाशक्ती करीअर शिबिरात 800 युवक-युवतींचा सहभाग 

·  युवक- युवतीनी करिअर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 15 :- दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावर शासनाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर संकल्पना राबविण्यात येत आहे. या युवाशक्ती करीअर  शिबिराच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगाराच्या संधी व मार्गदर्शन मिळेल, या संधीचा युवक-युवतीनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार बालाजी कल्याणकर व आमदार आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केले.

औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन आज कामगार कल्याण मंडळाचे ललीतकला भवन लेबर कॉलनी येथे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते दोघे उपस्थित होते.  

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उदघाटन आज आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास राठी , उद्योजक अरुण फाजगे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर , रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त  रेणूका तम्मलवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी, उद्योजक अरुण फाजगे आदीची उपस्थिती होती.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित शिबिरातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी व मार्गदर्शन मिळून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. या युवाशक्ती करीअर शिबिराचा युवक-युवतीनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केले. तसेच त्यांनी या मेळाव्यात उपस्थित युवक- युवकांना शुभेच्छा दिल्या.  

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून 800 युवक व युवतींनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी प्रा. सारिका बकवाड यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता 10 व 12 वी नंतरच्या संधी याबाबत संजय सारडा यांनी मार्गदर्शन केले. सुहास राऊत यांनी शैक्षणिक कर्ज व स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय योजना याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर यांनी केले. करीअर मार्गदर्शन संबंधी विविध महामंडळामार्फत प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे उपप्राचार्य कंदलवाड व्ही.डी. यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राका यांनी केले.

00000













Saturday, June 15, 2024

 वृत्त क्र. 491

शासकीय वसतिगृहातील रिक्त जागेवर

विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश

 

अर्ज करण्याबाबत समाज कल्याणचे आवाहन

 

नांदेड दि. 15 :- सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड या कार्यालयाच्या अधिनस्त अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहे यशवंतनगर नांदेड, बिलोली, धर्माबाद, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगर नांदेड, मुखेड, देगलूर, गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी नांदेड, 125मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर, नायगाव व मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहे भोकर, हदगाव, उमरी असे एकूण 16 शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

या वसतिगृहांमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह यशवंतनगर नांदेड-74, बिलोली-30, धर्माबाद-30, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगर नांदेड-36, मुखेड-31, देगलूर-39, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी नांदेड-78, 125मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड-38, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर-74, नायगाव-38 व मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह भोकर मुले-41, मुली-31, हदगाव मुले-60, मुली-39, उमरी मुले-55, मुली-57 असे वसतिगृहनिहाय रिक्त जागा असून यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गासह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, अकरावी, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.

 

गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित जिल्ह्याचे ठिकाणचे व तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत,तसेच स्वाधार योगजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील जिल्ह्याच्या ठिकाणचे शासकीय वसतिगृह येथील गृहपाल यांच्याकडून अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गृहपाल यांच्याकडे सादर करावा. शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज न भरल्यास त्यांना स्वाधार योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

 

शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता,ग्रंथालय,जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात.तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा,नांदेड जिल्ह्यातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज भरावा असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्र. 490 

जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण

 

नांदेड दि. 15 :- जिल्हा कारागृहाच्या समोरील मोकळ्या परिसरात वृक्षरोपणाकरिता इंदिरा आयव्हीएफ क्लिनीक नांदेड कडून विविध फळांची (आंबा, चिकू, नारळ, चिंच, पेरु, लिंबु इत्यादी) 40 रोपे प्राप्त झाली. ही रोपे जिल्हा कारागृहाचे कारागृह अधिक्षक एस. एम. सोनवणे,  वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. मुलानी  व इंदिरा आयव्हीएफ क्लिनीकच्या श्रीमती डॉ. शितल पवार (मनुरकर) यांच्या हस्ते वृक्षारोपन नुकतेच करण्यात आले. यावेळी सदर संस्थेचे श्री. पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.




00000

 वृत्त क्र. 489 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

 

नांदेड दि. 15 – सन 2024-25 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसामुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन प्रस्ताव नविन विहीर व इतर बाबीसाठी 7/12, होल्डीग, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, व बॅक पासबुक इत्यादी कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

 

या योजनेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहेत. बदलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची सिंचनाची आवश्यकता विचारात घेऊन जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेर) अंतर्गत सिंचन सुविधांचा लाभ देवून त्यांचे उत्पन्नात वाढ करुन जीवनमान उंचावणे व शेतकऱ्यांना स्वंयपूर्ण करण्यासाठी या योजना राबविण्यात येत आहेत.

 

योजनेच्या अटी व शर्ती  

लाभार्थी शेतकऱ्यानी या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर अर्ज विहीत नमुन्यात करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छिणारा लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकरी असावा. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. अर्जदाराकडे त्यांच्या स्वत:च्या नावे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे. शेतकऱ्यांकडे त्याच्या स्वत: च्या नावे जमीन धारणेचा सातबारा दाखला व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. अशा शेतकऱ्यांनी सबंधीत तहसीलदार यांचेकडून उत्पन्नाचा अदयावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये) व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये) या दोन्ही योजनेंतर्गत लाभ दयावयाचे घटक व देय अनुदान मर्यादा पुढील प्रमाणे राहील. नवीन विहीर 2 लाख 50 हजार रुपये. जुनी विहीर दुरुस्ती- 50 हजार रुपये. इनवेल बोअरींग- 20 हजार रुपये. पंपसंच 20 हजार रुपये, वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण- 1 लाख रुपये. सुक्ष्म सिंचन संचात ठिबक सिंचन 50 हजार रुपये तर तुषार सिंचन- 25 हजार रुपये. परसबाग (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत अनु.जमातीसाठी)-500 रुपये. पीव्हीसी/एचडीपीई पाईप (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत अनु.जमातीसाठी)- 30 हजार रुपये (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मंजुर असलेल्या मापदंडानुसार किमतीच्या शंभर टक्के किंवा उच्चतम मर्यादा 30 हजार रुपये.) याप्रमाणे लाभ लाभार्थीस अनुज्ञेय राहील. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 488

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन  

 

नांदेड दि. 15 :- राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागस प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" शासन निर्णय 13 डिसेंबर 2023 नुसार लागु करण्यात आली आहे.

 

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" हे तातडीने अंमलबजावणी करावी, त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानी या योजनेचा अर्ज करावा, असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. इयत्ता 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसाईक व बिगर व्यावसाईक अभ्यासक्रमास प्रथम वर्षात, व्दितीय वर्षात, तृतीय वर्षात व चतुर्थ वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनी या योजनेचा अर्ज करावा. या योजनेचा अर्ज हा सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे वरील बाजुस नांदेड या ठिकाणी संपर्क साधुन विनामुल्य अर्ज प्राप्त करुन घेऊन सदरचे अर्ज व्दितीय, तृतीय वर्षात व चतुर्थ वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनी 15 जुलै 2024 पुर्वी या कार्यालयात सादर करावेत, व प्रथम वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन  इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे. 

 

एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्याना टिकूण राहणे, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्याशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ता धारण करणे, विद्यार्थी / विद्यार्थीनिंना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया विविध क्षेत्रात स्पर्धला तोंड देता यावे आणि शैक्षणिकदृष्टया उन्नती होणे आवश्यक आहे. वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देणे या दृष्टीकोणातून उच्च शिक्षण घेण्याऱ्या मुला-मुलींसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" ची अमलबजावणी करणे बाबत निर्देशित करण्यात आले आहे.

 00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...