Wednesday, December 6, 2023

 जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवकांनी सहभाग घेण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- जिल्हा युवा महोत्सवाला आज दिनांक 6 डिसेंबर पासून शुभारंभ झाला  असून येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह व परिसरात विविध स्पर्धाचे आयोजन दि. 7 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून वक्तृत्व स्पर्धा होतील.  वैयक्तिक व समूह लोकनृत्य दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत याच मंचावर होणार आहेत. यामध्ये भारतातील व महाराष्ट्रातील विविध पारंपारिक लोकनृत्यांचा आनंद नांदेडकरांना मिळेल. यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कृषी संचालनालय, विभागीय उपसंचालक क्रीडा व युवा सेवक लातूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा जिल्हास्तरीय युवा महोत्सव होत आहे.  या युवक महोत्सवामध्ये सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती व संकल्पना आधारित स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. यामध्ये तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान असे विविध विषय देण्यात आले आहेत. यामध्ये पोस्टर्स स्पर्धा कथालेखन व फोटोग्राफीसाठी हे सर्व विषय देण्यात आले आहे. त्यासोबतच हे विषय धरून संकल्पना आधारित स्पर्धा, त्यामध्ये रांगोळी एकांकिका पथनाट्य प्रदर्शनी अशा अनेक स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.

0000

 सामाजिक विकासासाठी विज्ञान, आरोग्यासाठी तृणधान्य

व नवमतदार जागृती यातच उज्ज्वल भवितव्याचा पाया

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

 

·          युवा महोत्सवात मतदार यादीत नाव पडताळणीचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 6 :- आजची युवा पिढी उज्वल भवितव्यासाठी अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना करत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व विज्ञानाचा अंगीकार केल्याशिवाय पर्याय नाही. या स्पर्धेत टिकण्यासाठी स्वत: हाच आपले आत्मपरीक्षण करुन ज्या क्षमता आपल्यात कमी आहेत त्या वाढविण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी स्वत: समवेत स्पर्धा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहस्टेडीयमच्या परिसरात आयोजित युवा महोत्सवाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास मानेजिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडेजिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवारडॉ. सान्वी जेठवाणीजिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर आदीची उपस्थिती होती.

 

सामाजिक विकासासाठी विज्ञान, आरोग्यासाठी तृणधान्य व सक्षम लोकशाहीसाठी नवमतदार जागृती यातच उज्ज्वल भवितव्याचे मार्ग दडले आहेत. प्रत्येकाने सामाजिक जाणिवांचे भान ठेवून आपला विकास साधण्यावर भर दिला पाहिजे. युवकांनी अभ्यासासमवेत खेळ, कौशल्य, आवडीनुरुप एखाद्या कलेची निवड केली पाहिजे. युवा महोत्सव व इतर स्पर्धा या आपण जोपासलेल्या कला, कौशल्याला चालना देतात. याचबरोबर ते हक्काचे व्यासपीठही उपलब्ध करुन देतात असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगून मतदार म्हणून, नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यालाही प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले.   

 

 आपली संस्कृती जोपासण्या समवेत लोकशाहीच्या सक्षमतेसाठी प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्यासाठी आपले नाव मतदार यादीत आहे का याची सर्वानी खात्री करुन घेणे महत्वाचे आहे. निवडणूक विभागाने ही सर्व प्रक्रीया आता ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिली आहे. यात अडचण आल्यास मदतीसाठी प्रशासन तत्पर असल्याचे राज्य निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी सांगितले.

 

एक नागरिक म्हणून देशासाठी, लोकशाहीच्या उज्वल भवितव्यासाठी मतदार म्हणून आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य प्रत्येकाने बजावणेही आवश्यक आहे. यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मतदान यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासून घेतले पाहिजे. नसल्यास मतदानासाठी आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे  जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी तर सुत्रसंचालन श्रुती रावणगावकर यांनी केले.

 

या दोन दिवशीय युवा महोत्सवात सांस्कृतिक कला प्रकारकौशल्य विकाससंकल्पनावर आधारित स्पर्धायुवा कृती इत्यादी कलाकृतीचे आयोजन केले आहे.  अधिकाधिक युवकांनी व प्रेक्षकांनी यात सहभाग घ्यावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले.

 

0000






दि. 5 डिसेंबर 2023

 पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 


नांदेड (जिमाका) दि. 5 :- पोलीस उपनिरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023  ही परीक्षा रविवार 10 डिसेंबर 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील 6 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

नांदेड येथील 6 विद्यालय / महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, पेजर, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000

Tuesday, December 5, 2023

 वृत्त क्र. 821

 

पिकाच्या योग्य वाढीसाठी

मातीचे आरोग्य व जैव विविधता महत्त्वाची

- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे

 

·  जागतिक मृदा दिन साजरा

 

नांदेड, (जिमाका) दि. 5 :- शाश्वत शेतीसाठी मातीचे आरोग्य तेवढेच महत्त्वाचे आहे. पाण्याचा अतिवापररासायनिक खतांचा अतिवापरबांधबंदिस्ती नसणेजैवविविधता न जोपासणे यामुळे मातीचे आरोग्य धोक्यात येते. निसर्गातील सर्व घटक उपलब्ध असूनही जर मातीचे आरोग्य व्यवस्थीत नसेल तर शेतकऱ्यांना शेतीतून आर्थिक उत्पन्न घेणे आव्हानात्मक ठरेलअसे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.

 

जागतिक मृदा दिनानिमित्त आज 5 डिसेंबर रोजी जिल्हा अधिक्षक  कृषी  अधिकारी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी    कृषि  विज्ञान केंद्र पोखर्णी यांच्या संयुक्त  विद्यमाने आत्मा कार्यालयात मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी उपसंचालक नागरगोजे, प्रकल्प उपसंचालक आत्मा माधुरी सोनवणे,  कृषि  विज्ञान केंद्र पोखर्णी येथील संचालक एस. डी .मोरे,  वरिष्ठ  शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, डॉ. माणिक कल्याणकर, डॉ. महेश अंभोरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद् चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड यांची उपस्थिती होती.

 

शेतीसाठी पाणी परिक्षणासह मातीचे अर्थात मृदेची तपासणी तेवढीच आवश्यक ठरते. जमिनीमध्ये जे घटक कमी आहेत त्या घटकांच्या पूर्तीसाठी खतांचे प्रमाण व त्याचा वापर यातून निश्चित करता येतो. शेतीच्या जमिनीला पोषक ठेवण्यासाठी जैविक संघ, ट्रायकोडर्मा, मेटारायझियम,  निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आदी सूक्ष्म जीव व जैविक घटकांचा वापर शेतकऱ्यांनी करावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले. 

 

या कार्यक्रमात मृदेचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनातून विशद केले. शेतकऱ्यांनी मृदा परीक्षण अहवालाप्रमाणे पिकांना खताच्या मात्रा द्याव्यात असे कृषि विज्ञान केंद्र पोखरणीचे संचालक एस. डी. मोरे यांनी सांगितले. मृदा चाचणीतून शेतीमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात तंत्र अधिकारी के. एम. जाधव यांनी  शेतकऱ्यांना मृदा दिनाचे  महत्व सांगून मृदा दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला.

 

जनावरातील  लंपी  स्किन  या विषाणू जन्य आजाराविषयी  डॉ. महेश अंभोरे यांनी माहिती दिली. मृदेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जनावरांची जोपासना करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मौजे मारकंड येथील शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकीचे वाटप करण्यात आले. कासारखेडा येथील प्रगतशील शेतकरी राजाराम शिंदे यांचा सोयाबीनमध्ये उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे तर तंत्र अधिकारी एस. एस. स्वामी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड कार्यालयातील कृषी पर्यवेक्षीका ज्योती शिंदे, कृषी सहायक एस.एस.सोनवणेदत्तात्रय चिंतावार, गजानन पडलवार, राहुल जाधव,  जावेद शेख, मोहन बेरजे, सुनील कराळे आदींनी परिश्रम घेतले.

0000

 वृत्त क्र. 820 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे

नांदेड विमानतळ येथे आगमन व परळीकडे प्रयाण 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज नांदेड विमानतळ येथे आगमन झाले. माजी मंत्री पंकजा मुंडे याही सोबत होत्या. आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. 

परळी येथील नियोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने परळीकडे प्रयाण केले.

00000











Monday, December 4, 2023

 पनवेल महानगरपालिका पदभरती परीक्षा-2023

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :-  पनवेल महानगरपालिका आस्‍थापनेवरील विविध संवर्गातील पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्‍याच्‍या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका पदभरती  परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या आयऑन डिजीटल झोन, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं.18 आणि 22 नांदेड,  राजीव गांधी कॉलेज कॅम्पसविद्युतनगर नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर  नांदला, दिग्रस, खडकूत या 3 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 8 ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी 7 ते रात्री  9 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 दहा रुपयांचे नाणे अधिकृतच

न घेतल्यास होणार कायदेशीर कारवाई

नांदेड (जिमाका), दि. 4 :-  जिल्ह्यातील काही शाखाधिकारी, शासकीय बँका, खाजगी बँका, सहकारी बँका 10 रुपयांचे नाणे व्यवहार करण्यासाठी स्विकारत नसल्याच्या तक्रारीचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी दुकानदार, विक्रेते 10 रुपयांचे नाणे स्विकारण्यास नकार देत आहेत. रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे प्रचलीत असलेले नाणे न स्विकारणे हा गुन्हा असून हे नाणे स्विकारण्यास नकार देणारे विक्रेते, संबंधीत व्यक्ती यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

भारतीय रिझर्व बँक टाकसाळीत तयार केलेली नाणी प्रस्तृत करते. या नाण्यांवर निरनिराळी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये दर्शविणारी स्पष्ट लक्षणे असून, ती नाणी वेळोवेळी प्रसृत केली जातात. नाण्यांचे आयुष्य दीर्घकालिन असल्याने, निरनिराळया डिझाईन्सची व मूल्याची नाणी एकाच वेळी परिवलित होत असतात. रिझर्व बँकेने आतापर्यत 14 डिझाईन्समधील 10 रुपयांची नाणी दिली आहेत. त्यांच्या स्पष्ट लक्षणांबाबत जनतेला वृत्तपत्र निवेदनामार्फत कळविण्यात आले आहे. ही सर्व नाणी वैध चलनात आहेत.

सर्व शाखाधिकारी, शासकीय बँका, खाजगी बँका, सहकारी बँका, व्यापारी विक्रेते यांनी 10 रुपयांच्या नाण्यांच्या वापराबाबतचा गैरसमज दूर केला पाहिजे. याचबरोबर बँकानी आपल्या शाखेच्या बाहेर बँनर, लिफलेट, फिरत्या वाहनावरुन याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. बँकांनी ग्रामीण भागातील यंत्रणाचा पुरेपुर वापर करुन नागरिकांपर्यत हा संदेश पोहोचवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

0000




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...