वृत्त क्र. 821
पिकाच्या योग्य वाढीसाठी
मातीचे आरोग्य व जैव विविधता महत्त्वाची
- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे
· जागतिक मृदा दिन साजरा
नांदेड, (जिमाका) दि. 5 :- शाश्वत शेतीसाठी मातीचे आरोग्य तेवढेच महत्त्वाचे आहे. पाण्याचा अतिवापर, रासायनिक खतांचा अतिवापर, बांधबंदिस्ती नसणे, जैवविविधता न जोपासणे यामुळे मातीचे आरोग्य धोक्यात येते. निसर्गातील सर्व घटक उपलब्ध असूनही जर मातीचे आरोग्य व्यवस्थीत नसेल तर शेतकऱ्यांना शेतीतून आर्थिक उत्पन्न घेणे आव्हानात्मक ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले.
जागतिक मृदा दिनानिमित्त आज 5 डिसेंबर रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी व कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मा कार्यालयात मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी उपसंचालक नागरगोजे, प्रकल्प उपसंचालक आत्मा माधुरी सोनवणे, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील संचालक एस. डी .मोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, डॉ. माणिक कल्याणकर, डॉ. महेश अंभोरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद् चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड यांची उपस्थिती होती.
शेतीसाठी पाणी परिक्षणासह मातीचे अर्थात मृदेची तपासणी तेवढीच आवश्यक ठरते. जमिनीमध्ये जे घटक कमी आहेत त्या घटकांच्या पूर्तीसाठी खतांचे प्रमाण व त्याचा वापर यातून निश्चित करता येतो. शेतीच्या जमिनीला पोषक ठेवण्यासाठी जैविक संघ, ट्रायकोडर्मा, मेटारायझियम
या कार्यक्रमात मृदेचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनातून विशद केले. शेतकऱ्यांनी मृदा परीक्षण अहवालाप्रमाणे पिकांना खताच्या मात्रा द्याव्यात असे कृषि विज्ञान केंद्र पोखरणीचे संचालक एस. डी. मोरे यांनी सांगितले. मृदा चाचणीतून शेतीमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात तंत्र अधिकारी के. एम. जाधव यांनी शेतकऱ्यांना मृदा दिनाचे महत्व सांगून मृदा दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला.
जनावरातील लंपी स्किन या विषाणू जन्य आजाराविषयी डॉ. महेश अंभोरे यांनी माहिती दिली. मृदेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी जनावरांची जोपासना करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मौजे मारकंड येथील शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकीचे वाटप करण्यात आले. कासारखेडा येथील प्रगतशील शेतकरी राजाराम शिंदे यांचा सोयाबीनमध्ये उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे तर तंत्र अधिकारी एस. एस. स्वामी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड कार्यालयातील कृषी पर्यवेक्षीका ज्योती शिंदे, कृषी सहायक एस.एस.सोनवणे, दत्तात्रय चिंतावार, गजानन पडलवार, राहुल जाधव, जावेद शेख, मोहन बेरजे, सुनील कराळे आदींनी परिश्रम घेतले.
0000
No comments:
Post a Comment