Tuesday, June 21, 2022

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा   

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय नांदेड येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  उत्साहात योगाभ्यास करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई  यांच्या आदेशान्वये प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी 7 वा. हा योगाभ्यास वर्ग घेण्यात आला. या कार्याक्रमासाठी योग शिक्षीका श्रीमती नंदीनी व प्रा. सुरेखा  घोगरे यांनी योगाभ्यास घेतला.

 

जिल्हा न्यायाधीश-1 एस. ई. बांगर, अति. जिल्हा न्यायाधीश ए.आर.धामेचा साहेब, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती के. पी. जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज, 4 थे दिवाणी न्यायाधीश क.स्तर श्रीमती बी.एम.एन.देशमुख मॅडम, यांनी यात सहभाग घेऊन योगाभ्यास केला. योगसाधक श्रीमती नंदीनी व घोगरे यांनी योग दिनाच्या निर्देशानुसार योगाभ्यास घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एम. गायकवाड यांनी केले तर आभार मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती के. पी. जैन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योग शिक्षक विधीज्ञ एच.आर.जाधव, विधीज्ञ कानोटे, नयुमखान पठाण, एस. ए. सौंदनकर, डी. जी. राठोड व न्यायालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

0000





 नांदेड जिल्ह्यात पाच व्यक्ती कोरोना बाधित   

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  168 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 828 एवढी झाली असून यातील 1 लाख 127 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 9 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील तीन रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4हदगाव 1 असे एकुण 5 कोरोना बाधित आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 5 असे एकुण 9 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 6 हजार 340

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 86 हजार 207

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 828

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 127

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

 कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 जागतिक पर्यावरण दिन आणि बालकांना मोफत,

सक्तीचे शिक्षण कायद्याविषयक शिबीर संपन्न


नांदेड (जिमाका) दि. 21:-  सामान्य किमान कार्यक्रमातंर्गत वृक्षारोपण करुन त्यांचे संगोपन व संवर्धन व्हावे. तसेच या बाबीची समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल.आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड व प्रादेशिक वनीकरण विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषद मुलींची शाळा नांदेड येथे जागतिक पर्यावरण दिन व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा-2009 याविषयाचे कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.  

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती डी.एम.जज, प्रमुख पाहुणे प्रादेशीक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पांडुरंग धोंडगे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये जि.प्र. शाळेचे मुख्याध्यापक यांनी बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा-2009 या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. धोंडगे यांनी वृक्ष लागवड व त्याचे संगोपन व संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती जज मॅडम यांनी नैसर्गीक साधन संपत्तीच्या व प्लॉस्टीकचा फार मोठया प्रमाणात होत असलेल्या वापरामुळे मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्याशी प्रश्नोत्तर  व  व्हीडीओद्वारे मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता वी ते मधील विद्यार्थीशाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नयुमखान पठाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प.मुलींची शाळा वजीराबाद नांदेड येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, प्रादेशिक वनीकरण विभागाचे कर्मचारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

0000

 जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न


नांदेड (जिमाका) दि. 21:-  आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.आय.भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय प्ररीचर्या प्रशिक्षण केंद्र व आयुष विभागाच्योवतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमांचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष शिरसिकर यांचे हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर योगप्रशिक्षक श्रीमती राणी दळवी  यांनी  विविध योगासन व प्राणायाम यांची प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना योगा दिनाचे धडे दिले. तसेच सर्वांनी नियमित योग साधनेवर भर द्यावा असेही त्या यावेळी म्हणाल्या.

 

या कार्यक्रमास  जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदेश जाधवसहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी डॉ.जव्वाद  खान, शासकीय प्ररीचर्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रेणुकादास मैड, डॉ. कैलास चव्हाण, एल टी तुमोड, रानोळकर, छाया कदम, अपर्णा जाधव, अर्चना भोसले तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णकार सदाशिव यांनी केले. आभार प्रदर्शन गायकवाड बालाजी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी परिश्रम घेतले.

00000




 कृषि संजीवनी मोहीमेत सहभागी होण्याचे

कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 21:-  जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 25 जुन ते 1 जुलै या कालावधीत कृषि संजीवनी मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत विविध उपक्रम, विविध दिन साजरे करण्यात येणार आहेत. या मोहिमेदरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बि.चलवदे यांनी केले आहे.

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमातर्गंत कृषि संजीवनी मोहीमेचे आयोजन केले आहे. 25 जुन ते 1 जुलै दरम्यान हा खरीप हंगाम पिकांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या कालावधीत या मोहिमेद्वारे कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन नवीन तंत्रज्ञानांचा प्रचार व प्रसार करताना शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानांचा अवलंब करावा यासाठी प्रयत्न करणार आहेत.

 

गाव, तालुका आणि जिल्हानिहाय नियोजनाचा आराखडा तसेच केलेल्या प्रचार व प्रसाराची नोंद केली जाणार आहे. 25 जुन रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मुल्यसाखळी बळकटीकरण दिन, 26 जुन रोजी पौष्टिक तृणधान्य दिन, 27 जुन रोजी महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन, 28 जुन रोजी खत बचत दिन,29 जुन रोजी प्रगतशील शेतकरी संवाद दिन, 30 जुन रोजी  शेतीपूरक व्यवसाय दिन व 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येणार असून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

 

या मोहिमेअंतर्गत गाव बैठका, शिवार भेटीचे व शेतीशाळाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसोबत गावात कृषिविषयक राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेटी देण्यात येणार आहेत. या मोहीम कालावधीत दररोज ऑनलाईन चर्चासत्र, मार्गदर्शनपर व्याख्याने इत्यादी आयोजित करण्यात येणार आहेत असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

0000

 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती

अभियानांतर्गत मार्गदर्शन शिबिर संपन्न


नांदेड (जिमाका) दि. 21 :- आजादी का अमृत महोत्सव व महाजीवीका अभियानांतर्गत (ऊमेद)अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत  जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष नांदेड यांच्या सहकार्याने नवीन उदयोजक / अन्न व्यावसायिक व कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 अंतर्गत  अन्न परवाना, नोंदणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले .

 

सहायक आयुक्त बी .बी भोसले  व प्रकल्प संचालक जि.ग्रा.वी. यां.नांदेड डॉ संजय तुबकले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे यांनी पार पाडले. या मार्गदर्शन शिबिरासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पतेवार, जिल्हा व्यवस्थापक- विपणन धनंजय भिसे ,  जिल्हा व्यवस्थापक -संस्था बांधणी द्वारकादास राठोडगणेश कवडेवार,अतिश गायकवाड कौशल्य समन्वयक व जिल्हा व्यवस्थापक माधव भिसे, तालुक्यातील अभियान व्यवस्थापक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

0000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 6.3 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 21:- जिल्ह्यात सोमवार 21 जून  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.3  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 74.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात मंगळवार 21 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 7.1 (46), बिलोली- 5.8 (57.5), मुखेड- 6.3 (103.6), कंधार-3.2 (106.2), लोहा-3.6 (67.6), हदगाव-4.5 (46.2), भोकर- 6.6 (66.2), देगलूर-8.9 (127.7), किनवट- 7 (81.5), मुदखेड- 26.4 (103.4), हिमायतनगर-6.7 (54.1), माहूर- 5 (84.5), धर्माबाद- 9.1 (42.7), उमरी- 4.2 (81.7), अर्धापूर- 2.8 (46.7), नायगाव- 0.4 (50.4) मिलीमीटर आहे.

0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...