Friday, October 8, 2021

 एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- एमएच-सीईटी परीक्षा-2021 रि एक्झाम ही शनिवार 9 ऑक्टोंबर 2021 रोजी दोन सत्रात जिल्ह्यात 7 परीक्षा केंद्रावर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.  

या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात शनिवार 9 ऑक्टोंबर 2021 सकाळी 6 ते सायं 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता  येणार नाही. परीक्षा कालावधीत या परीसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वणी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

00000

 संभाव्य कोरोनाचा धोका टाळण्यासाठी दोन लस घेतलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच प्रथम प्राधान्य

नांदेड (जिमाका), दि. 8 :- राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन जनजीवन पूर्वरत करण्याच्यादृष्टिने अटी व शर्तीच्या अधिन राहून शाळा, मंदिरे, प्रार्थनास्थळ खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे व येत्या काळात असलेल्या विविध सण व उत्सवामुळे होणारी गर्दी आणि यामुळे वाढू शकणारा संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांना कोरोना लसीच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. 

जिल्ह्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानांवर यापुढे ज्या शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केले आहे अशाच लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यात जनतेच्या आरोग्याला अधिक प्राधान्य देऊन संभाव्य धोका  व कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी हे आदेश परिपत्रकान्वये निर्गमीत केले आहेत. लाभार्थ्यांसह जनतेनेही लसीकरणासाठी अधिकाधिक उत्स्फुर्त सहभाग यात घ्यावा, असेही स्पष्ट केले आहे. ज्या व्यक्तींनी लसीचा एक डोस घेतला आहे त्यांना दोन डोस घेतलेल्या लाभार्थ्यांनंतर प्राधान्य दिले जाईल हेही स्पष्ट केले आहे.

0000

 देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरिक्षक (पोलीस) दाखल 

हरकती असल्यास साधता येईल संपर्क 

 नांदेड (जिमाका) दि. 8 :- भारत निवडणूक आयोग यांच्याकडून देगलूर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (पोलीस) गोपेश अग्रवाल हे नांदेड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. निवडणूकी संदर्भात जिल्ह्यातील नागरिकांपैकी कुणाच्या काही हरकती, तक्रारी, गाऱ्हाणी असल्यास निवडणूक निरिक्षक (पोलीस) गोपेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

गोपेश अग्रवाल यांना मिनी सह्याद्री व्हीआयपी सुट शासकीय विश्रामगृह नांदेड येथे भेटता येईल. कुणाला आवश्यकता भासल्यास त्यांना 7498401148 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
00000

 देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरिक्षक (खर्च) दाखल

 हरकती असल्यास साधता येईल संपर्क 

 नांदेड (जिमाका) दि. 8 :- भारत निवडणूक आयोग यांच्याकडून देगलूर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (खर्च) आर.एन.एन.शुक्ला हे नांदेड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. निवडणूकी संदर्भात जिल्ह्यातील नागरिकांपैकी कुणाच्या काही हरकती, तक्रारी, गाऱ्हाणी असल्यास निवडणूक निरिक्षक (खर्च) आर.एन.एन. शुक्ला यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

आर.एन.एन. शुक्ला यांना मिनी सह्याद्री व्हीआयपी सुट शासकीय विश्रामगृह नांदेड येथे भेटता येईल. कुणाला आवश्यकता भासल्यास त्यांना 7498131456 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
00000

 देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरिक्षक दाखल

 हरकती असल्यास साधता येईल संपर्क 

 नांदेड (जिमाका) दि. 8 :-  भारत निवडणूक आयोगा यांच्याकडून देगलूर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक पंकज (भा.प्र.से) हे नांदेड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. निवडणूकी संदर्भात जिल्ह्यातील नागरिकांपैकी कुणाच्या काही हरकती, तक्रारी, गाऱ्हाणी असल्यास निवडणूक निरिक्षक पंकज (भा.प्र.से) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

पंकज (भा.प्र.से) यांना मिनी सह्याद्री व्हीआयपी सुट शासकीय विश्रामगृह नांदेड येथे भेटता येईल. कुणाला आवश्यकता भासल्यास त्यांना 9022820141 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
00000

 जिल्ह्यात लसीकरणासाठी मिशन कवचकुंडल

कोरोनापासून बचावासाठी लसीकरणाची विशेष मोहिम

लसीकरण करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन   

नांदेड (जिमाका), दि. 8 :- संपूर्ण जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत मिशन कवचकुंडल ही विशेष कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस न घेतलेल्यानी या मोहिमेत सहभागी व्हावे. कोरोनापासून सुरक्षित राहावयाचे असेल तर लसीकरण होणे अत्यावश्यक आहे. लसीकरण म्हणजे संरक्षक कवचकुंडले आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

18 वर्षावरील ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही आणि लसीचा दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी तो घेणे आवश्यक आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोनापासून बचावासाठीची खरी कवचकुंडले प्राप्त होणार आहेत. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यास मदत होते. कोरानो आजार झाल्यास लवकर बरा होऊ शकतो  आणि मृत्यूदर कमी राखण्यास मदत होते. जिल्ह्यात पहिला डोस अद्यापही घेतलेला नाही असे, आणि पहिला डोस घेऊन दुसरा डोस न घेतलेल्याची संख्या मोठया प्रमाणात आहे. राज्य पातळीवरुनही लसीचा मुबलक पुरवठा होणार आहे. त्यामूळे आता नागरिकांनी लस घेण्यास टाळाटाळ करुन नये. कोरोनाची तिसरी लाट उदभवू नये यासाठी सर्वाचे पूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे. या मोहिमेमध्ये पाच लक्ष लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या मोहिम कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी तसेच ग्रामीण भागात सर्व शासकीय रुग्णालये, गावपातळीवर विविध ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागामार्फत लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. या काळात 18 वर्षावरील सर्व तसेच चौथ्या महिना व पुढील सर्व गरोदर माता यांनी या मोहिम कालावधीत ज्यांनी एकही डोस घेतला नाही त्यांनी, पहिला डोस आणि ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांनी दुसरा डोस घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले आहे. 

या मोहिम काळात गावपातळीवर विविध शाळेच्या ठिकाणी लसीकरण होणार असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.  जिल्ह्यात कोरोनासाठीचे निर्बंध सध्या काही प्रमाणात शिथिल केले आहेत. मंदिरे आणि प्रार्थनास्थळे खुली झाली आहेत. आता नवरात्रोत्सव सुरु झाला आहे. लवकरच दिवाळीचा सण येणार आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गर्दी वाढते आहे. लोकांनी कोणत्याही ठिकाणी गर्दी करणे टाळावे. गर्दी झाली तर कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असतो. या सण, उत्सवानंतर कोरोनाची तिसरी लाट सुरु होऊ नये यासाठी सर्वाचे संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे. सर्व धर्म, जाती आणि स्तरावरील नागरिकांनी या लसीकरण मोहिमेत भाग घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

0000

Thursday, October 7, 2021

 खेळाडूसाठी जलतरण तलाव सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- ब्रेक द चेन- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी जलतरण तलाव सुरु करण्याबाबत मार्गदर्शन सूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केल्या आहेत. 

जलतरण तलावातील जलतरणासाठी मुभा देण्यात आलेले 18 वर्षावरील खेळाडू आणि व्यवस्थापन व कर्मचारी वृंद यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्र घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. 18 वर्षाखालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु न झाल्याने 18 वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंच्या सरावासाठी संबंधित खेळाडूच्या पालकांचे संमतीपत्र व वयाचा पुरावा आधार कार्ड, आयकर विभागाने निर्गमीत केलेले पॅनकार्ड, वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन आदेशासोबत जोडलेल्या जोडपत्रात नमूद करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच अटी व शर्तीचे पालन करण्याच्या अधिन राहून जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोनाबाबत निर्गमीत 6.10.2021 रोजीच्या आदेशानुसार नमूद सर्व अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करावे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...