Friday, October 8, 2021

 जिल्ह्यात लसीकरणासाठी मिशन कवचकुंडल

कोरोनापासून बचावासाठी लसीकरणाची विशेष मोहिम

लसीकरण करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन   

नांदेड (जिमाका), दि. 8 :- संपूर्ण जिल्ह्यात 8 ते 14 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत मिशन कवचकुंडल ही विशेष कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस न घेतलेल्यानी या मोहिमेत सहभागी व्हावे. कोरोनापासून सुरक्षित राहावयाचे असेल तर लसीकरण होणे अत्यावश्यक आहे. लसीकरण म्हणजे संरक्षक कवचकुंडले आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

18 वर्षावरील ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही आणि लसीचा दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी तो घेणे आवश्यक आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोनापासून बचावासाठीची खरी कवचकुंडले प्राप्त होणार आहेत. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यास मदत होते. कोरानो आजार झाल्यास लवकर बरा होऊ शकतो  आणि मृत्यूदर कमी राखण्यास मदत होते. जिल्ह्यात पहिला डोस अद्यापही घेतलेला नाही असे, आणि पहिला डोस घेऊन दुसरा डोस न घेतलेल्याची संख्या मोठया प्रमाणात आहे. राज्य पातळीवरुनही लसीचा मुबलक पुरवठा होणार आहे. त्यामूळे आता नागरिकांनी लस घेण्यास टाळाटाळ करुन नये. कोरोनाची तिसरी लाट उदभवू नये यासाठी सर्वाचे पूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे. या मोहिमेमध्ये पाच लक्ष लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या मोहिम कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी तसेच ग्रामीण भागात सर्व शासकीय रुग्णालये, गावपातळीवर विविध ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागामार्फत लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. या काळात 18 वर्षावरील सर्व तसेच चौथ्या महिना व पुढील सर्व गरोदर माता यांनी या मोहिम कालावधीत ज्यांनी एकही डोस घेतला नाही त्यांनी, पहिला डोस आणि ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांनी दुसरा डोस घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले आहे. 

या मोहिम काळात गावपातळीवर विविध शाळेच्या ठिकाणी लसीकरण होणार असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.  जिल्ह्यात कोरोनासाठीचे निर्बंध सध्या काही प्रमाणात शिथिल केले आहेत. मंदिरे आणि प्रार्थनास्थळे खुली झाली आहेत. आता नवरात्रोत्सव सुरु झाला आहे. लवकरच दिवाळीचा सण येणार आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गर्दी वाढते आहे. लोकांनी कोणत्याही ठिकाणी गर्दी करणे टाळावे. गर्दी झाली तर कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असतो. या सण, उत्सवानंतर कोरोनाची तिसरी लाट सुरु होऊ नये यासाठी सर्वाचे संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे. सर्व धर्म, जाती आणि स्तरावरील नागरिकांनी या लसीकरण मोहिमेत भाग घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...