Thursday, April 23, 2020


मुस्लीम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यात
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करावे
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे आवाहन
 नांदेड दि. 23 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रसार होत आहे. त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च, 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये यासंदर्भातील नियमावली प्रसिध्द करण्यात आली असून 17 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये एकत्रित सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाने दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना शनिवार 25 एप्रिल 2020 रोजी पासून सुरु होत आहे. रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठया संख्येने मस्जीदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरीत्या नमाज पठण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील नमाज, तरावीह इफ्तार पार्टीसाठी एकत्र येतात. सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग / संक्रमण मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता असते त्यामधून मोठया प्रमाणावर जिवित हानी होऊ शकते. त्यामुळे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवांनी पुढीलप्रमाणे सुचनांचे पालन करावे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे पवित्र रमजान महिन्यामध्ये काटेकोरपणे पालन करुन अंमलबजावणी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत मुस्लीम बांधव मस्जीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार पार्टीसाठी एकत्र येवू नये. घराच्या / इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. मोकळया मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. लोकांकडून कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येवून साजरे होणार करु नयेत. सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह इफ्तार पार्टी इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. इतर कोणत्याही लोकांना धार्मिक कार्यक्रमात समाविष्ठ करु नये.
वरील दिलेल्या सुचनांचे जनतेने काटेकोरपणे पालन करुन आपले कर्तव्य पार पाडून समाजातील लोकांचे आपल्या कुटूंबियांच्या आरोग्य सुरक्षिततेला प्राधान्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाच्या सुरक्षिततेसाठी नेमून दिलेली कर्तव्य पार पाडून समाजापुढे आदर्श घडवू या. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करुन कोरोना विषाणूविरुध्दचा आपला लढा जिंकण्याची मनीषा आपण सर्वजण मिळून बाळगू या...! असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी नांदेड जिल्हयातील जनतेला केले आहे.
0000000


सर्दी, ताप, खोकला आजारांची
औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करु नये
अन्न व औषध प्रशासनचे आवाहन
नांदेड दि. 23 (जिमाका) :- कोव्हीड-19 लक्षणे आढळुन आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ला, चिठ्ठी शिवाय सर्दी, ताप, खोकला या आजारांवरील औषधे खरेदी करू नये. जिल्हयातील सर्व औषध विक्रेत्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना डॉक्टरांच्या चिठ्ठी व औषध विक्री बिलाशिवाय औषधाची विक्री करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (औषधे) मा. ज. निमसे यांनी केले आहे.  
सध्या राज्यात व देशात कोविड-19 चा संसर्ग वाढत असुन त्यावर नियत्रंण मिळवण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहे. कोविड- 19 चा संसर्ग झालेल्या रूग्णास सर्दी, खोकला, अतीताप, श्वास घेण्यास अडथळा आदी लक्षणे दिसून येतात.
सर्दी, खोकला, ताप या आजारावरील औषधे ग्राहक स्वतः औषध विक्री दुकानावर जाऊन खरेदी करून स्वत: उपचार करतात. त्यामुळे कोविड-19 या रोगाने बाधित व्यक्ती सुध्दा स्वयंउपचार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रोगाचा अटकाव न होता त्याचा संसर्ग इतर व्यक्तींना होऊ शकतो.
डॉक्टरांच्या चिठ्ठीवर औषध विक्री करतेवेळेस औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदयातील तरतुदींनुसार त्याची नोंद ठेवण्यात यावी. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय एखादी व्यक्ती औषधांची मागणी करत असल्यास त्यांना शासकीय रूग्णांलयात जाण्यास सांगण्यात यावे. या सुचनांचे औषध विक्रेत्यांने काटेकोरपणे पालन करावे. सुचनांचे अनुपालन करत नसल्याचे आढळुन आल्यास संबंधीता विरुध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदयानुसार कार्यवाही घेण्यात येईल, असे सहायक आयुक्त (औषधे) मा. ज. निमसे यांनी कळविले आहे.
00000


जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2020 पूर्व आढावा बैठक
शेतकऱ्यांसाठी बियाणे, खतांची कमतरता
भासणार नाही - पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड दि. 23 – शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते पुरवठा होणार तसेच बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहातील कॅबिनेट हॉल येथे खरीप हंगाम 2020 जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी खासदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मदार अमरनाथ राजूरकर, मदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहन हंबर्डे, मदार शामसुंदर शिंदे, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणवीस, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश पठारे आदी विविध विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मागील वर्षातील पीक विमा मंजुरीबाबत असलेल्या तफावतीमुळे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी, महसूल, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची समिती नेमून सर्व खासदार, आमदार यांच्या सूचन विचारात घेऊन या कार्यपद्धतीबाबतचा अहवाल सादर करावा. जेणेकरून राज्य शासनामार्फत त्याबाबत आवश्यक निर्णय घेता येईल, अशा सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून प्रस्ताव शासनाला सादर करावा. शेतकऱ्यांची खरीप पूर्व शेती विषयक कामाची निकड लक्षात घेता शेती विषयक आस्थापना, दुकाने, कृषि उत्पन्न बाजार समित्या व त्यांच्याशी निगडीत पुरवठा, वाहतूक चालू ठेवण्यास सकाळी 7 ते सायं 5 वाजेपर्यंत मुभा देण्यात येईल. राज्य शासनाकडून डीएपी खताचे नियतन कमी मंजूर झाल्यामुळे वाढीव 24 हजार मेट्रिक टन नियतन प्राप्त करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.
खते, बि-बियाणे यांच्या गुणवत्ता व काळाबाजारी रोखण्यासाठी गुणवत्ता पथके, भरारी पथकांची स्थापन करुन खते, बि-बियाणे विक्रीच्या कालावधीत जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या.
बँकांना कृषी पतपुरवठा करण्यासाठी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करावे. जिल्ह्यातील कापूस खरेदी नोंदणी नुसार पूर्ण करण्याचे व कापूस खरेदीची वेळ वाढवण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या. तूर व हरभरा खरेदी केंद्रे कार्यान्वित करून नोंदणी नुसार खरेदीचे नियोजन करण्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचना दिल्या.
किनवट येथे माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल. जिल्ह्यातील प्रलंबित अनुदानाच्या मागण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवून अनुदान उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बँकांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्व बँक प्रमुखांची बैठक घेऊन सूचना द्याव्यात असे सांगितले. लॉकडाऊन कालावधीत गरीब लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाहीत याबाबत जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
सन 2018-19 मध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 48 कोटी पीक विम्याची रक्कम भरली असून 15 कोटी रक्कम मंजूर झाली आहे पिक विमा कंपनी अधिकचा विमा मंजूर करत नाही, यासाठी पिक विमा मंजुरीसाठी उंबरठा उत्पन्न मागील सरासरी उत्पन्नही अट काढून टाकावी यासाठी पिक विम्याचे निकष बदलण्याचा कृषि आयुक्तालयास पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.   
00000



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...