Friday, June 29, 2018


सैनिकी मुलांच्या वसतिगृहात
प्रवेश प्रक्रिया सुरु
नांदेड, दि. 29 :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड संचलित सैनिकी मुलांचे वसतिगृह नांदेड  येथील प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे.  माजी सैनिक व सेवारत सैनिकांच्या पाल्यासाठी असलेले या वसतिगृहात प्रवेशाचे अर्ज सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपूरी नांदेड व सैनिक कल्याण कार्यालयात नांदेड येथे  उपलब्ध आहेत.
या वसतिगृहात माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना प्रवेश नि:शुल्क आहे. इतर माजी सैनिकांच्या पाल्यांना अल्पदरात प्रवेश आहे. इच्छूक माजी सैनिकांच्या पाल्यांनी वसतिगृह अधिक्षक मोबाईल नंबर 7875152161 वर संपर्क करावा, असे मेजर सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी  कळविले आहे.                                                        00000

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 29 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 2 जुलै 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.                             
00000

लेख क्र. 26


चला वृक्षांचे करुया संवर्धन...
हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने गेल्या तीन वर्षापासून संपूर्ण राज्यभर वृक्षारोपणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी यंदा राज्यात 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेऊन उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड करण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. नांदेड जिल्हयातही वृक्षलागवड मोहिमेंतर्गत यंदा 60 लाख 20 हजार उद्दीष्ट असून सुमारे 80 लाख झाडे लावण्याचा निर्धार आहे. 
पर्यावरण संतुलनाबरोबरच जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात 1 ते 31 जुलै 2018 या कालावधीत शासन यंत्रणा आणि लोकसहभागातून 13 कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीस सहाय्यभूत होण्यासाठी नांदेड जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात सुमारे 80 लाख रोपांची लागवड करण्याचे नियोजन असून हरित जिल्हयासाठी पालकमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्तीश लक्ष केंद्रीत करुन वृक्षारोपणाच्या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन केले आहे. व्यापक लोकसहभागामुळे जिल्हयात वृक्षलागवडीचा जणु जागरच सुरु झालायं. दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने  तापमानवाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत.  यामुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चालले आहे. यावर उपाय म्हणून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाव्दारे पर्यावरणाची जोपासणा करणे ही  काळाची गरज आहे. 
मानव आणि पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्व विचारात घेऊन वृक्षारोपणाव्दारे हरित महाराष्ट्र घडविण्यावर मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेवर भर दिला गेला. यंदा राज्यात 13 कोटी वृक्षलागवडीचा निर्धार आहे. नांदेड  जिल्ह्यात या कार्यक्रमाचे शास्त्रशुध्द नियोजन केले आहे. शासनाने वृक्षारोपणाव्दारे वनांची समृध्दी आणि जलसाक्षरतेव्दारे हरित महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार असून शासनाच्या निर्धारपूर्तीसाठी जनतेकडूनही वृक्षारोपणास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.  
राज्याचे वनक्षेत्र 33 टक्यापर्यंत वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र-समृध्द महाराष्ट्र या कार्यक्रमाची आखणी केली असून या वृक्षलागवड कार्यक्रमाचे ऑनलाईन नियंत्रण करण्यात येत आहे. सर्व  यंत्रणातील अधिकाऱ्यांमार्फत वृक्षलागवड कार्यक्रमाची दैनंदिनी तयार करण्यात आली असून वृक्ष लागवड कार्यक्रमाचे स्थळ, वेळ आणि लोकसहभागाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या मोहिमेत केलेले काम वनविभागाच्या संकेतस्थळावर फोटो, व्हिडीओ आणि लावलेल्या रोपापासून अपलोड केले जाणार आहे. दर सहा महिन्यांनी या वृक्षारोपन स्थळांची, वाढलेल्या रोपांची, प्रजातीची माहिती या संकेतस्थळावर वेळोवेळी भरण्यात येणार आहे. 
या वृक्षलागवडीमध्ये वन, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ किनवट आणि जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत विभागामार्फत तब्बल 45 लाख 53 हजार रोपे लावण्याचे नियोजन केले असून वृक्षारोपनासाठीची तयारी पूर्ण केली आहे. वृक्षारोपन मोहिमेतील वन आणि सामाजिक वनीकरण विभागाबरोबरच उर्वरित रोपांची लागवड ही अन्य शासकीय विभाग व लोकसहभागातून करण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय जिल्हा, तालुका ते गावपातळीवर अधिकाधिक लोकसहभाग घेण्यावर अधिक भर दिला आहे. यंदाच्या वृक्षारोपणासाठी वन व सामाजिक वनीकरण विभागाने सुमारे 90 लाख रोपे विविध रोपवाटिकामधून उपलब्ध ठेवली आहेत. याशिवाय जिल्ह्यातील  खाजगी रोपवाटिकांमध्येही पुरेशी रोपे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 
या वृक्षारोपन मोहिमेंतर्गत जिल्हयात अंदाजे 5 हजार 600 हेक्टर व 3 हजार 340 कि.मी. क्षेत्रात रोपे लावण्याचे नियोजन केले आहे. वृक्षारोपण स्थळांची माहिती वन विभागच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोडची सुविधा उपलब्ध असून स्थळांची माहिती अपलोड केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाडे लावून नांदेड जिल्हा हरीत जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा गतीमान झाल्या. यंदाच्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत शासकीय तसेच खाजगी मोकळया जागा, रस्ता दुतर्फा, डोंगर, टेकडया, कॅनॉल, जलयुक्त शिवार उपक्रमातील कामांची ठिकाणे, नदीकाठ अशा विविध ठिकाणांचा शोध घेऊन वृक्षारोपणाला गती दिली आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे तसेच सामाजिक वनीकरण विभाग व इतर विभाग या सर्वांनी लक्ष केंद्रीत केले आहे. वृक्षारोपणात लोकसहभागावर अधिक भर दिला असल्याने  जिल्ह्यातील प्रत्येक संस्था व नागरिकांनी आपापल्या शेतात आणि परिसरात अधिकाधिक झाडे लावून वृक्ष लागवडीव्दारे आपला परिसर हरित घडविण्याकामी पुढे येणे काळाची गरज आहे. 
13 कोटी वृक्ष लागवडीसारख्या योजनांतून तीन वर्षात 50 कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामास शासनाने प्राधान्य दिले असून सर्व क्षेत्रातील लोकसहभागावर भर दिला आहे. यंदा आणि यापुढील काळातही अधिकाधिक रोपांची लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्याच्या कामासाठी जिल्हयात शासन यंत्रणा आणि लोकसहभागातून नवी लोकचळवळ उभी करु या. सद्या पावसानेही सुरुवात केली असून जिल्हयातील प्रत्येकाने आपापल्या प्रयत्नातून अधिकाधिक झाडे लावून व ती जोपासून हरित जिल्हा घडविण्याच्या  राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊ या. 
- अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड .
0000000

Thursday, June 28, 2018


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी
जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहिम
नांदेड दि. 28 :- सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात एम.बी.बी.एस., बी.डी.एस. व बी.ए.एम.एस. इ. वैद्यकीय अभ्यासक्रमास तसेच अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या एसटी राखीव जागेवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना, अनुसूचित जमातीचे जमात प्रमाणपत्राच्या तपासणी संदर्भात विशेष मोहिम राबविण्यासाठी आखण्यात आलेली आहे.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र आठ जिल्ह्याचे असून त्यामध्ये औरंगाबाद, नांदेड, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याअनुषंगाने या विभागातील विद्यार्थ्यांना त्यांनी दाखल केलेल्या जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारची त्रुटी, चुक किंवा अपुर्णता राहू नये तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या दावा पडताहणी प्रकरणी काही शंका असल्यास सदर शंकाचे निरसण व योग्य मार्गदर्शन करणेसाठी या समिती कार्यालयात विशेष सहाय्य कक्ष स्थापन करण्यात येत आहे. तसेच या कार्यालयातील पदनाम वरिष्ठ संशोधन अधिकारी व्ही. एम. कटके यांनी जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद या कार्यालयात विशेष सहाय्य कक्ष- आस्थापना कक्ष व हेल्पलाईन नंबर  0240-2362901  वर विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसण व योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 7.82 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यात गुरुवार 28 जून 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 125.08 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 245.56 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 26.23 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 28 जून 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 7.25 (304.89), मुदखेड- निरंक (427.01), अर्धापूर- निरंक (254.67), भोकर- निरंक (350.25), उमरी- 18.00 (247.98), कंधार- 8.50 (276.50), लोहा- 4.83 (268.48), किनवट- 19.00 (163.70), माहूर- 41.50 (236.75), हदगाव- 00.43 (318.29), हिमायतनगर- निरंक (297.68), देगलूर- 1.67 (84.16), बिलोली- 11.00 (173.60), धर्माबाद- 4.33 (204.32), नायगाव- 7.00 (209.20), मुखेड- 1.57 (111.41). आज अखेर पावसाची सरासरी 245.56 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3928.89) मिलीमीटर आहे.
00000


हिशोब पत्रके सादर न करणाऱ्या
संस्थांची तीसरी यादी प्रसिद्ध ;
विश्वस्तांना खुलासा सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 28 :- संस्था नोंदणी क्र. एफ 9 हजार 568 ते एफ 14 हजार पर्यंतच्या संस्थेनी संस्था स्थापन केल्यापासून हिशोब पत्रके दाखल केली नाहीत, त्या संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधीत संस्थेच्या विश्वस्तांनी प्रसिद्ध केलेल्या यादीचे निरीक्षण करुन संस्थेची नोंदणी का रद्द करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा दिलेल्या तालुकाच्या दिवशी व कार्यालयातील न्याय कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहून अथवा वकिलामार्फत सकाळी 11 वा. सादर करावा, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त सौ. प्रणिता श्रीनीवार यांनी केले आहे.
संस्थेची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्ड व संकेतस्थळावर प्रकाशीत केली आहे. संस्था नोंदणी रद्द करण्याची मोहिम तीनही न्याय शाखेत 9 जुलै 2018 पर्यंत राबविण्यात येणार आहे. संबंधितांनी सुनावणीच्यावेळी सबळ पुराव्यासह आपले म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित रहावे. अन्यथा गैरहजर राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही, असे गृहित धरुन आपली संस्था नोंदणी रद्द करण्यासंबंधी नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे.
0000000

Wednesday, June 27, 2018


 अनुदान योजना, बीजभांडवल कर्ज योजनेसाठी
प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 27 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत जिल्हा कार्यालय, नांदेड मार्फत मातंग समाज व 12 पोट जातींना योजनेचा लाभ बँकेमार्फत देण्यासाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये अनुदान योजनेचे 1 हजार 200 व बीजभांडवल योजनेचे 225 उद्दिष्टे प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू लाभार्थ्यांनी कागदपत्रे घेवून जिल्हा कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा, असे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
अनुदान योजनेसाठी प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजारापर्यंत गुंतवणूक असणाऱ्या रक्कमेमध्ये रुपये दहा हजार अनुदान व बाकी बँकेचे कर्ज. बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजार एक ते 7 लाखांपर्यंत यामध्ये सहभाग 5 टक्के महामंडळाचे कर्ज 20 टक्के ( रु. 10 हजार  अनुदानासह) व बँकेचे कर्ज 75 टक्के. या योजनेत स्थिर भांडवल निर्मितीसाठीच्या उद्योगाचे कर्ज प्रस्ताव जसे वाहन, यंत्रे व मशिनरी खरेदीसाठीच उद्दिष्टे देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे, राशनकार्ड झेरॉक्स, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा त्या जागेचा पुरावा. व्यवसायाचे कोटेशन, प्रकल्प अहवाल, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा ग्रामसेवकाचे नाहरकत प्रमाणपत्र, वाहन खरेदीसाठी लायसन्स / परमीट / बॅच , वयोमर्यादा 18 ते 50 च्या आत असावे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...