Friday, June 29, 2018

लेख क्र. 26


चला वृक्षांचे करुया संवर्धन...
हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने गेल्या तीन वर्षापासून संपूर्ण राज्यभर वृक्षारोपणाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी यंदा राज्यात 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेऊन उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड करण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. नांदेड जिल्हयातही वृक्षलागवड मोहिमेंतर्गत यंदा 60 लाख 20 हजार उद्दीष्ट असून सुमारे 80 लाख झाडे लावण्याचा निर्धार आहे. 
पर्यावरण संतुलनाबरोबरच जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात 1 ते 31 जुलै 2018 या कालावधीत शासन यंत्रणा आणि लोकसहभागातून 13 कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीस सहाय्यभूत होण्यासाठी नांदेड जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात सुमारे 80 लाख रोपांची लागवड करण्याचे नियोजन असून हरित जिल्हयासाठी पालकमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्यक्तीश लक्ष केंद्रीत करुन वृक्षारोपणाच्या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन केले आहे. व्यापक लोकसहभागामुळे जिल्हयात वृक्षलागवडीचा जणु जागरच सुरु झालायं. दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने  तापमानवाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत.  यामुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चालले आहे. यावर उपाय म्हणून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाव्दारे पर्यावरणाची जोपासणा करणे ही  काळाची गरज आहे. 
मानव आणि पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्व विचारात घेऊन वृक्षारोपणाव्दारे हरित महाराष्ट्र घडविण्यावर मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेवर भर दिला गेला. यंदा राज्यात 13 कोटी वृक्षलागवडीचा निर्धार आहे. नांदेड  जिल्ह्यात या कार्यक्रमाचे शास्त्रशुध्द नियोजन केले आहे. शासनाने वृक्षारोपणाव्दारे वनांची समृध्दी आणि जलसाक्षरतेव्दारे हरित महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार असून शासनाच्या निर्धारपूर्तीसाठी जनतेकडूनही वृक्षारोपणास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.  
राज्याचे वनक्षेत्र 33 टक्यापर्यंत वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र-समृध्द महाराष्ट्र या कार्यक्रमाची आखणी केली असून या वृक्षलागवड कार्यक्रमाचे ऑनलाईन नियंत्रण करण्यात येत आहे. सर्व  यंत्रणातील अधिकाऱ्यांमार्फत वृक्षलागवड कार्यक्रमाची दैनंदिनी तयार करण्यात आली असून वृक्ष लागवड कार्यक्रमाचे स्थळ, वेळ आणि लोकसहभागाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या मोहिमेत केलेले काम वनविभागाच्या संकेतस्थळावर फोटो, व्हिडीओ आणि लावलेल्या रोपापासून अपलोड केले जाणार आहे. दर सहा महिन्यांनी या वृक्षारोपन स्थळांची, वाढलेल्या रोपांची, प्रजातीची माहिती या संकेतस्थळावर वेळोवेळी भरण्यात येणार आहे. 
या वृक्षलागवडीमध्ये वन, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ किनवट आणि जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत विभागामार्फत तब्बल 45 लाख 53 हजार रोपे लावण्याचे नियोजन केले असून वृक्षारोपनासाठीची तयारी पूर्ण केली आहे. वृक्षारोपन मोहिमेतील वन आणि सामाजिक वनीकरण विभागाबरोबरच उर्वरित रोपांची लागवड ही अन्य शासकीय विभाग व लोकसहभागातून करण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय जिल्हा, तालुका ते गावपातळीवर अधिकाधिक लोकसहभाग घेण्यावर अधिक भर दिला आहे. यंदाच्या वृक्षारोपणासाठी वन व सामाजिक वनीकरण विभागाने सुमारे 90 लाख रोपे विविध रोपवाटिकामधून उपलब्ध ठेवली आहेत. याशिवाय जिल्ह्यातील  खाजगी रोपवाटिकांमध्येही पुरेशी रोपे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 
या वृक्षारोपन मोहिमेंतर्गत जिल्हयात अंदाजे 5 हजार 600 हेक्टर व 3 हजार 340 कि.मी. क्षेत्रात रोपे लावण्याचे नियोजन केले आहे. वृक्षारोपण स्थळांची माहिती वन विभागच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोडची सुविधा उपलब्ध असून स्थळांची माहिती अपलोड केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाडे लावून नांदेड जिल्हा हरीत जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा गतीमान झाल्या. यंदाच्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत शासकीय तसेच खाजगी मोकळया जागा, रस्ता दुतर्फा, डोंगर, टेकडया, कॅनॉल, जलयुक्त शिवार उपक्रमातील कामांची ठिकाणे, नदीकाठ अशा विविध ठिकाणांचा शोध घेऊन वृक्षारोपणाला गती दिली आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे तसेच सामाजिक वनीकरण विभाग व इतर विभाग या सर्वांनी लक्ष केंद्रीत केले आहे. वृक्षारोपणात लोकसहभागावर अधिक भर दिला असल्याने  जिल्ह्यातील प्रत्येक संस्था व नागरिकांनी आपापल्या शेतात आणि परिसरात अधिकाधिक झाडे लावून वृक्ष लागवडीव्दारे आपला परिसर हरित घडविण्याकामी पुढे येणे काळाची गरज आहे. 
13 कोटी वृक्ष लागवडीसारख्या योजनांतून तीन वर्षात 50 कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या कामास शासनाने प्राधान्य दिले असून सर्व क्षेत्रातील लोकसहभागावर भर दिला आहे. यंदा आणि यापुढील काळातही अधिकाधिक रोपांची लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्याच्या कामासाठी जिल्हयात शासन यंत्रणा आणि लोकसहभागातून नवी लोकचळवळ उभी करु या. सद्या पावसानेही सुरुवात केली असून जिल्हयातील प्रत्येकाने आपापल्या प्रयत्नातून अधिकाधिक झाडे लावून व ती जोपासून हरित जिल्हा घडविण्याच्या  राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊ या. 
- अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड .
0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...