Friday, March 30, 2018


नांदेड जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप
ग्राहकांमध्ये शेतकऱ्यांना सन्मानाने उभा करण्याची शक्ती
- अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील
नांदेड, दि. 30 :- शेतकऱ्यांचे कष्ट लक्षात घेऊन त्यांचा उत्पादीत माल खरेदी करुन शेतकऱ्यांना सन्मानाने उभा करण्याची शक्ती ग्राहकांमध्ये आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे केले.  
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचेवतीने 26 ते 30 मार्च या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा मैदान नांदेड येथे आयोजित नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचा समारोप आज विविध शेतकऱ्यांचा सन्मान करुन करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील बोलत होते.      
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.  
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील पुढे म्हणाले, कृषी महोत्सवात उत्पादक ते ग्राहक यामधील साखळी कमी करुन शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना योग्य किंमतीत माल विक्री केला आहे. यामुळे शहरी ग्राहकांपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना, कष्ट पोहचले आहेत. महोत्सवात कृषि विषयक परिसंवाद, व्याख्यानांद्वारे विचारांच्या देवाण-घेवाणीतून शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यात आले. या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी शेती उत्पादनात घेऊन त्याची माहिती इतर शेतकऱ्यांना दयावे, असेही आवाहन त्यांनी केले.
लोहा तालुक्यातील शेतकरी विश्वनाथ होळगे यांनी झिरो बजेट नैसर्गीक शेतीची माहिती देऊन शासनाने शेततळे दिल्यामुळे कोरडवाहू शेतीतून बागायत शेतीकडे वळता आल्याने शेतीत यशस्वी झाल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी कृषि महोत्सवात नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी व ग्राहकांनी सहभाग घेतल्याचे सांगून उत्पादीत शेतमाल विक्रीची सरासरी 67 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषि विषयक परिसंवाद, व्याख्यानांबरोबर मार्केटींग तंत्रज्ञान शिकायला मिळाल्याचे, सांगितले.
यावेळी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतीमध्ये उल्लेखनी अशी कामगिरी केलेले शेतकरी प्रतिक शिंदे, भागवत शिंदे, सुनिल मोरे, अर्जुन राऊत, भिमराव सोनटक्के, माधव सुर्यवंशी, विश्वनाथ होळगे, शशीकुमार पत्की, उमेश मामीडवार, कबीरदास कदम, संताजी वटाणे, नारायण पाटील, विजय ठाकरे, संदीप धडलवार, असलम पठाण यांना तर शेतकरी बचतगटात ओंकारेश्वर शेतकरी बचत गट भोगाव, पद्मश्री कदम शेतकरी गट धानोरा, जय आंबिका महिला शेतकरी गट तामसा, बलराम ग्रुप ॲण्ड फार्मस क्लब देगलूर, हरीतक्रांती शेतकरी गट बिलोली रुद्रापूर यांना प्रमाणपत्र देऊन उत्स्फूर्त गौरव करण्यात आला. तसेच 26 ते 30 मार्च या कालावधीत कृषि महोत्सवात स्टॉल लाऊन शेतीमाल उत्पादनाची विक्री व मार्गदर्शन केलेल्या सहभागींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  
सुरुवातीला कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी यांचेवतीने हळद लागवड तंत्रज्ञान, केळी लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ट्रायकोडमी, माती परिक्षण घडीपत्रिकेचे तसेच एकरी शंभर टन ऊस उत्पादन, आधुनिक शेती पालन, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी एक दृष्टिक्षेप या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  
            कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक विजयकुमार भरगंडे यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन कृषि सहाय्यक वसंत जारीकोटे यांनी केले. नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आयोजकाचे मान्यवरांनी अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, ग्राहक, नागरिक, कृषि व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
000000

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा दौरा
नांदेड, दि. 30 :-  केंद्रीय रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 31 मार्च 2018 रोजी लातूर येथून वाहनाने रात्री 9.15 वा. श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000

राष्ट्रीय लोकन्यायालयाचे
जिल्ह्यात 22 एप्रिलला आयोजन
नांदेड, दि. 30 :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड  यांच्याकडून रविवार 22 एप्रिल 2018 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये तडजोडपात्र फौजदारी, चेक बाऊंसची (138 एन.आय.अॅक्ट), बॅंक रिकव्हरी, दिवाणी, भुसंपादन, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार, मनपा,गरपालिका, विद्युत आणि पाणीपट्टी प्रकरणे तसेच विविध बॅंकांची, टेलीफोन कंपन्यांची प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, म.न.पा. अधिकारी, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, बॅंक अधिकारी व संबंधित सर्व पक्षकार यांनी या राष्ट्रीय लोकन्यायालयात आपली जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढुन आपला पैसा, वेळ वाचवावा व या राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या रूपाने चालून आलेल्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश  सुधीर पी. कुलकर्णी यांनी केले आहे.
मागील राष्ट्रीय लोकन्यायालयातील यश पाहता यावेळी देखील बऱ्याच मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी व्यक्त केला आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात व दाखलपुर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड या कार्यालयाकडे एक अर्ज देवून आपले प्रकरण लोकन्यायालया ठेवावीत. यासाठी कुठलही शुल्क आकारण्यात येणार नाही. आपसातील वाद मिटवून या राष्ट्रीय लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असेही आवाहान श्री. वसावे यांनी केले आहे.
000000

Thursday, March 29, 2018


हिरवळी, जैविक खताची योग्य सांगड
रासायनिक खताशी केल्यास उत्पन्नात वाढ
- प्रगतशील शेतकरी पांडुरंग आव्हाड
नांदेड दि. 30 :- जमिनीतील सेंद्रीय कर्बाची वाढ करण्यात हिरवळी व जैविक खताची योग्य सांगड रासायनिक खताशी केल्यास हमखास उत्पन्नात वाढ होते, असे प्रतिपादन प्रगतशील शेतकरी पांडुरंग आव्हाड यांनी केले.   
नांदेड जिल्हा कृषि महोत्सवात गुरुवार 29 मार्च रोजीच्या चर्चासत्रात "सुधारीत ऊस लागवड तंत्रज्ञान" या विषयावर कळंब तालुक्यातील शिरपूर येथील प्रगतशील श्री आव्हाड हे मार्गदशन करतांना बोलत होते.
प्रगतशील शेतकरी श्री आव्हाड यांनी एकरी 110 टन ऊस उत्पादन घेतल्याचे स्वताचा अनुभव शास्त्रोद्योत पद्धतीने शेतकऱ्यास सांगितला. ऊस पीकावरील पंचसुत्रीची सविस्तर माहिती देताना सुपीकत, हंगाम  लागवड पद्धत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनात ठिबक सिंचनाचा वापर, किड रोग व्यवस्थापनाची सविस्तर माहिती दिली. कृषि महोत्सवास ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला शेतमालास पसंती देऊन खरेदी केली. अशी माहिती नांदेडचे प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दिली.
00000

Wednesday, March 28, 2018


जिल्हा कृषि महोत्सवाचे 30 मार्च पर्यंत आयोजन  
शेतकरी, ग्राहकांनी कृषि महोत्सवास भेट द्यावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 28 :- जिल्हा कृषि महोत्सवास ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून शेतकरी व ग्राहकांनी कृषि महोत्सवास भेट देऊन विविध धान्य, कृषि उत्पादने खरेदी करुन कृषि विषयक विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्यान व परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
नांदेड कृषि उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा मैदान येथे जिल्हा कृषि महोत्सव शुक्रवार 30 मार्च पर्यंत आयोजित केला आहे. या महोत्सवास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी जिल्हाधिकारी जयराम कारभारी यांनी सपत्नीक भेट दिली. त्यांनी विविध स्टॉलाची पाहणी करुन शेतकऱ्यांची उत्पादने खरेदी करुन विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली, यावेळी ते बोलत होते.
जिल्हा कृषि महोत्सवामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होत आहे. मंगळवार 27 मार्च अखेर धान्य महोत्सवा गहू, तुरडाळ, मुगडाळ, तीळ, जवस, मका, टरबुज, आवळा ज्युस, सेंद्रीय गुळ, टाळकी ज्वारी, हरभरा, कडकनाथ कोंबडया व अंडी विक्रीतून 2 लाख 50  हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. तर 26 27 मार्च अखेर 5 हजारापेक्षा जास्त शेतकरी व ग्राहकांनी कृषि महोत्सवाला भेट दिली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली प्रक्रियायुक्त उत्पादने, गटशेती, शेतकरी उत्पादक कंपनीचे दालने, औजारे, मशिनरी, यंत्रसामग्री, खते, औषधी, बियाणे, सिंचन साधने यांची विशेष दालने, सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी उपलब्ध आहे. उत्पादक ते ग्राहक अशी मध्यस्थाविना येथे विक्री होत आहे.
कृषि महोत्सवात कृषि विभाग, पणन, मार्केटिंग, महाबीज, वनविभाग, रेशीम, जिल्हा उद्योग केंद्र, पुरवठा, आधार कार्ड नोंदणी, कृषि विज्ञान केंद्र, जैविक किड नियंत्रण, मृद चाचणी, शासकीय फळरोप वाटीका, जिल्हा परिषद मधील कृषि विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालविकास विभाग, मतदान नोंदणी आदी विभागांचे दालने उभारले आहेत. कृषि महोत्सवात प्रवेश विनामुल्य असून शेतकरी, ग्राहक व नागरिकांनी कृषि महोत्सवातील प्रदर्शनास भेट द्यावी, असेही आवाहन केले आहे.
00000



इंग्रजी माध्यमाच्या नामांकित
निवासी शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत सन 2017-18 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशसाठी इच्छूक पालकाकडून रविवार 1 एप्रिल ते 20 मे 2018 पर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज शासकीय अनुदानीत आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्राप्त करुन घेऊन त्यांच्याकडेच परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. पालकांने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांकासह मूळ प्रमाणपत्र सादर करावे. अन्यथा दारिद्रयरेषेसाठी अर्जाचा विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत असावे. त्यासाठी तहसिलदाराचे यांचे सन 2018-19 चे उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे. इयत्ता पहिलेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 5 वर्ष पूर्ण असावे. ( जन्म 1 जून 2012 ते 1 जून 2013 या कालावधीत झालेला असावा. ) पालकाचे संमती पत्र, दोन पासपोर्ट फोटो व जन्म तारखेचा दाखला अंगणवाडी / सरपंच / ग्रामसेवक यांचा शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. 
 विद्यार्थ्यांचे वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सकयांनी दिलेले वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. विधवा, निराधार, परित्यक्ता यांचेसाठी शंभर रुपये बॉन्ड पेपरवर नोटरीसह दयावे लागेल. घटस्फोटीता  करीता कार्यालयीन निवाडयाची प्रत सोबत जोडावी.
 विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. त्याबाबत शंभर रुपये बॉन्ड पेपरवर पालकानी लेख दयावे लागेल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र देण्यात यावे. वरील अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
000000



जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  
नांदेड, दि. 28 :- जिल्ह्यात शनिवार 7 एप्रिल 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 24 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 7 एप्रिल 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...