Friday, March 30, 2018


नांदेड जिल्हा कृषी महोत्सवाचा समारोप
ग्राहकांमध्ये शेतकऱ्यांना सन्मानाने उभा करण्याची शक्ती
- अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील
नांदेड, दि. 30 :- शेतकऱ्यांचे कष्ट लक्षात घेऊन त्यांचा उत्पादीत माल खरेदी करुन शेतकऱ्यांना सन्मानाने उभा करण्याची शक्ती ग्राहकांमध्ये आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे केले.  
कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचेवतीने 26 ते 30 मार्च या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा मैदान नांदेड येथे आयोजित नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचा समारोप आज विविध शेतकऱ्यांचा सन्मान करुन करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील बोलत होते.      
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.  
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील पुढे म्हणाले, कृषी महोत्सवात उत्पादक ते ग्राहक यामधील साखळी कमी करुन शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना योग्य किंमतीत माल विक्री केला आहे. यामुळे शहरी ग्राहकांपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना, कष्ट पोहचले आहेत. महोत्सवात कृषि विषयक परिसंवाद, व्याख्यानांद्वारे विचारांच्या देवाण-घेवाणीतून शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यात आले. या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी शेती उत्पादनात घेऊन त्याची माहिती इतर शेतकऱ्यांना दयावे, असेही आवाहन त्यांनी केले.
लोहा तालुक्यातील शेतकरी विश्वनाथ होळगे यांनी झिरो बजेट नैसर्गीक शेतीची माहिती देऊन शासनाने शेततळे दिल्यामुळे कोरडवाहू शेतीतून बागायत शेतीकडे वळता आल्याने शेतीत यशस्वी झाल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी कृषि महोत्सवात नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी व ग्राहकांनी सहभाग घेतल्याचे सांगून उत्पादीत शेतमाल विक्रीची सरासरी 67 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषि विषयक परिसंवाद, व्याख्यानांबरोबर मार्केटींग तंत्रज्ञान शिकायला मिळाल्याचे, सांगितले.
यावेळी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतीमध्ये उल्लेखनी अशी कामगिरी केलेले शेतकरी प्रतिक शिंदे, भागवत शिंदे, सुनिल मोरे, अर्जुन राऊत, भिमराव सोनटक्के, माधव सुर्यवंशी, विश्वनाथ होळगे, शशीकुमार पत्की, उमेश मामीडवार, कबीरदास कदम, संताजी वटाणे, नारायण पाटील, विजय ठाकरे, संदीप धडलवार, असलम पठाण यांना तर शेतकरी बचतगटात ओंकारेश्वर शेतकरी बचत गट भोगाव, पद्मश्री कदम शेतकरी गट धानोरा, जय आंबिका महिला शेतकरी गट तामसा, बलराम ग्रुप ॲण्ड फार्मस क्लब देगलूर, हरीतक्रांती शेतकरी गट बिलोली रुद्रापूर यांना प्रमाणपत्र देऊन उत्स्फूर्त गौरव करण्यात आला. तसेच 26 ते 30 मार्च या कालावधीत कृषि महोत्सवात स्टॉल लाऊन शेतीमाल उत्पादनाची विक्री व मार्गदर्शन केलेल्या सहभागींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  
सुरुवातीला कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी यांचेवतीने हळद लागवड तंत्रज्ञान, केळी लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ट्रायकोडमी, माती परिक्षण घडीपत्रिकेचे तसेच एकरी शंभर टन ऊस उत्पादन, आधुनिक शेती पालन, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी एक दृष्टिक्षेप या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  
            कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक विजयकुमार भरगंडे यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन कृषि सहाय्यक वसंत जारीकोटे यांनी केले. नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आयोजकाचे मान्यवरांनी अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, ग्राहक, नागरिक, कृषि व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...