Friday, October 14, 2016

फटाका विक्री परवान्यासाठी 
19 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ
नांदेड, दि. 14 :- तात्पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्याच्या कालावधीस बुधवार 19 ऑक्टोंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
सन 2016 मध्ये दिपावली उत्सव 29 ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत साजरा होत आहे. त्याअनुषंगाने  नांदेड  महानगरपालिका  हद्दीतील तात्पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत व जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनियम 2008 नुसार 10 ऑक्टोंबर पर्यंत विक्री व स्विकारले जाणार होते. आता त्यास 19 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वीच्या जाहीर प्रगटनातील अटी व शर्ती कायम राहतील, असेही जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
            000000           
कापसावरील लाल्या रोग
नियंत्रणाबाबत कृषि सल्ला
नांदेड, दि. 14 :-  कापसावरील लाल्या रोगाबाबत कृषि विभागाने किड नियंत्रणाचा कृषि सल्ला दिला आहे. हा सल्ला पुढीलप्रमाणे जिल्ह्यात काही तालुक्यात कापसावर लाल्याचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी पुढील प्रमाणे उपाय करण्यात यावेत. मॅग्नेशिअम सल्फेटच्या कमतरतेमुळे झाडाची पाने लालसर पडतात प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावून अन्न पुरवठा कमी पडल्याने उत्पादकता कमी होते. यासाठी मॅग्नेशिअम सल्फेट 15 किलो प्रती हेक्टर जमिनीतून देयावे.
झिंक सल्फेट- प्रामुख्याने भारी जमिनीत कमतरता दिसून येते त्यामुळे पाते व बोंडगळ होते अशावेळी जमिनीतून 10 ते 15 किलो झिंक सल्फेट किंवा फवारणीद्वारे 200 ते 400 ग्रॅम पाण्यातून दयावे. याप्रमाणे सुक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केल्यास या लाल्या विकृती होऊ शकत नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून बोंडे वाढीच्या काळात 2 टक्के युरीयाची पहिली फवारणी घ्यावी. पंधरा दिवसांनी 2 टक्के डीएपीची फवारणी करावी. पाणी साचलेल्या जागी त्वरीत पाणी काढून टाकावे इत्यादी केल्यास लाल्या विकृती दूर होईल, असे उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा
नवीन जागेत स्थलांतरीत
नांदेड, दि. 14 :- जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांचे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी कार्यालय 1 ऑक्टोंबर पासून श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालय परिसर जुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे स्थलांतरीत झाले आहे. कार्यालयाच्या या नवीन पत्त्याचा संबंधितांनी नोंद घ्यावी , असे आवाहन कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा नांदेड यांनी केले आहे.    

000000

Thursday, October 13, 2016

नांदेड जिल्हा नागरी स्वच्छता अभियानात
मराठवाड्यात अव्वल, उमरीचे हागणदारी मुक्तीसाठी कौतूक
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या प्रयत्नाला यश
नांदेड, दि. 13 :-  स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत हगणदारीमुक्त व स्वच्छ शहरांच्या कामागिरीसाठी नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा दुहेरी तूरा खोवला गेला आहे. स्वच्छ भारत अभियान-नागरी क्षेत्रात औरंगाबाद विभागांतर्गत सर्वाधिक शौचालय बांधकाम पुर्ण केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचा तसेच मराठवाडा विभागात पहिली हागणदारीमुक्त नगरपरीषद ठरलेल्या उमरी नगरीचा आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हाच्यावतीने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी हा सत्कार स्विकारला, तर उमरी नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख, उपाध्यक्ष राजाबाबू सारडा, मुख्याधिकारी निता अंधारे यांनी सत्कार स्विकारला.
मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, नगरपालिका (प्रशासन) संचालनालयाचे आयुक्त विरेंद्रसिंग उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी क्षेत्रातील स्वच्छता अभियानासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी पुढाकाराने नियोजन केले. त्यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील बारा नगर परिषदा व चार नगरपंचायतीमध्ये स्वच्छता मोहिमांचे नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे या नगरपरीषदा-नगरपंचायतीमध्ये स्वच्छता या घटकासाठी सकारात्मक स्पर्धा सुरु झाली. जिल्ह्यात 2015 मध्ये नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांमधील सार्वजनिक तसेच वैयक्तीक स्वच्छता घटकांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले. या नगरीपरिषदांमधील सार्वजनिक स्वच्छतेसाठी सामुहीक प्रयत्नांबरोबरच विविध घटकांना प्रोत्साहीत करण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. तर दुसरीकडे वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी नगरपरीषद प्रशासन विभागाच्या बैठकीत वारंवार आढावा घेण्यात आला. त्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून प्रयत्न करण्यात आले. यामुळेच शौचालयांच्या बांधकामाला अपेक्षीत गती मिळाली. त्याद्वारे बांधकामांचे फोटोही राज्यात सर्वाधिक प्रमाणात नांदेड जिल्ह्यातून अपलोड करण्यात आले. शौचालय बांधकामाचे उद्दीष्‌ट 22 हजार 927 इतके होते. त्यापैकी आता 13 हजार 701 शौचालयांचे बांधकाम पुर्ण होत आले आहे. त्यातील 8 हजार 167 बांधकामांचे फोटो अपलोड करण्यात आले आहे. सार्वजनिक तसेच वैयक्तीक शौचालयांच्या अभियानात तब्बत 30 हजार 330 तास इतक्या तासांचे श्रमदान करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरी भागातील स्वच्छता अभियानाने गती घेतली आहे. ग्रामीण तसेच नागरी भागातील स्वच्छता अभियानात जिल्हा कुठल्याही परिस्थितीत मागे राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रीया जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी व्यक्त केली आहे. डिसेंबर 2016 अखेर भोकर, हदगाव, मुदखेड, अर्धापूर व माहूर या सहा नगरपरीषदा तर जानेवारी 2017 अखेर देगलूरसह, बिलोली, धर्माबाद, कंधार, किनवट व कुंडलवाडी व लोहा नगरपरीषदा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले. नायगाव व हिमायतनगर नगरपंचायतीच्या हागणदारीमुक्तीसाठी मार्च 2017 पर्यंतचा कालावधी निर्धारीत केला आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नगरपरीषद प्रशासन विभागाच्या अधिकारी विद्या गायकवाड यांच्यासह, सर्वच नगरपरीषद-नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या प्रयत्नांचेही कौतूक केले आहे. या नागरी भागातील नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन, नांदेड जिल्ह्याला नागरी स्वच्छता अभियानातही अग्रेसर ठेवण्यात योगदान द्यावे, असे आवाहनही केले आहे.
हागणदारीमुक्त महाराष्ट्राच्या निर्धारात नांदेडही आघाडीवर...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानात 2 आँक्टोंबर 2017 पर्यंत पुर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील या कार्यक्रमात व्यक्त केला. कार्यक्रमासाठी उपस्थित गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, नगरपालिका (प्रशासन) संचालनालयाचे आयुक्त विरेंद्रसिंग यांनीही या निर्धाराच्या फलकावर स्वाक्षऱ्याही केल्या. त्याचप्रमाणे नांदेड जिल्हाच्यावतीने जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनीही स्वाक्षरी केली. नांदेड जिल्हयातील नागरीक नेहमीच सकारात्मक प्रयत्नांना साथ देतात. या त्यांच्या पाठबळावरच नांदेड जिल्हाही स्वच्छतेत आघाडीवर राहील याच विश्वासाने स्वाक्षरी केल्याचे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नमूद केले.

0000000

Monday, October 10, 2016

वाहन नोंदणीसाठी आज
परिवहन कार्यालय सुरु राहणार
नांदेड, दि. 10 :- नविन वाहन नोंदणीसाठी दसरा निमित्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मंगळवार 11 ऑक्टोंबर 2016 रोजी नवीन वाहन नोंदणी कामकाजासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड हे चालू राहणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी , असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे 12 नोव्हेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 10 :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून बुधवार 12 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दिवाणी, फौजदारी, भूसंपादन, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, कामगारांची प्रकरणे तसेच विविध बॅंकांची तसेच विविध मोबाईल कंपन्यांची दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच चेक अनादरित झाल्याबाबतचे खटले देखील मोठया प्रमाणात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
 विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, विमा कंपनी, विविध मोबाईल कंपनीचे अधिकारी, पक्षकार यांनी या लोकन्यायालयात जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढून पैसा, वेळ वाचवावा व राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
            मागील महालोकन्यायालयातमध्ये मिळालेले यश पाहता यावर्षी देखील बऱ्याच मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर. कुरेशी यांनी व्यक्त केला असून पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात व दाखलपूर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड या कार्यालयाकडे अर्ज देवून आपले प्रकरण लोकन्यायालयामध्ये ठेवण्याची विनंती करावी. यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नाहीत. आपसातील वाद मिटविण्याची या लोकन्यायालयाच्या रूपाने सुवर्ण संधी चालून आली आहे. याचा फायदा सर्वांनी घ्यावा, असेही आवाहन न्या. कुरेशी यांनी केले आहे.

00000000 
जागतिक मानसिक स्वास्थ दिनानिमित्त शिबीर संपन्न
नांदेड, दि. 10 :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड कार्यालयातर्फे राजस्थानी एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचलित आर.आर. मालपाणी निवासी मतिमंद विद्यालय मगनपुरा नवामोंढा नांदेड येथे जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त शिबीराचे आज आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.  ए. आर. कुरेशी होते.  
यावेळी न्या. कुरेश यांनी मानसिक आणि शारिरीक विकलांग लोकांच्या संबंधित विविध कायद्याबाबत माहिती दिली. न्या. एन. एम. बिरादार यांनी मानसिक व शारिरीक विकलांग व्यक्तींचे अधिकार याबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच आंबेडकरनगर नांदेड येथील प्रसिध्द शाहिर शेषेराव वाघमारे यांनी गीत गायनातून मतिमंद मुलांच्या समस्या विषद केल्या.  
यावेळी  अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधीश न्या. जे. आर. पठाण, न्या. श्रीमती बी. ए. तळेकर, न्या. एन. एम. बिरादार अॅड. नईमखान पठाण, अॅड. एम. एल. गायकवाड यांची उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी केले. शाळेचे सचिव विजय मालपाणी यांनी आभार मानले.
000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...