Wednesday, December 24, 2025

वृत्त क्रमांक 1324

महाविस्तार एआय अॅप : शेतकऱ्यांसाठी ‘चालते-बोलते कृषी विद्यापीठ’

शेतीविषयक कोणताही प्रश्न विचारा, त्वरित मिळेल तज्ज्ञ सल्ला

नांदेड दि.२४ डिसेंबर:- शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अचूक, वेळीच व विश्वासार्ह कृषी माहिती मिळावी, या उद्देशाने कृषी विभागाने राज्यभर ‘महाविस्तार एआय’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅप सुरू केले आहे. या अॅपमधून शेतीविषयक सल्ला, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, खतांच्या शिफारशी तसेच बाजारभावाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या सहकार्यातून विकसित करण्यात आलेले हे अॅप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून, त्यामध्ये मराठी भाषेतील चॅटबॉट सुविधा देण्यात आली आहे. शेतकरी या चॅटबॉटवर शेतीसंबंधी कोणताही प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे शेतीकामात निश्चितच मोठी मदत होणार आहे.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर उभी राहिलेली आव्हाने लक्षात घेऊन या अॅपच्या माध्यमातून हवामान अंदाज, पीक लागवडीच्या पद्धती, कीड व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था तसेच डीबीटीवरील विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय ऑडिओ व व्हिडीओ स्वरूपातही शेतीपूरक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

महाविस्तार एआय अॅपमध्ये फार्मर आयडी वापरून लॉगिन करता येते. फार्मर आयडी नसल्यास मोबाईल नंबरच्या सहाय्यानेही लॉगिनची सुविधा उपलब्ध आहे. खरीप पेरणीपासून ते शेतीमाल विक्रीपर्यंतची सर्व आवश्यक माहिती या अॅपवर मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.

शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘महाविस्तार एआय’ अॅप जास्तीत जास्त संख्येने डाउनलोड करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

०००००

Tuesday, December 23, 2025

वृत्त क्रमांक 1323

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

नांदेड दि. 23 डिसेंबर :- सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपूरी नांदेड येथील वसतीगृहामध्ये कंत्राटी पध्दतीने माजी सैनिक संवर्गातून पद भरावयाचे आहे. माजी सैनिक उपलब्ध नसल्यास नागरी सिवीलीन संवर्गातून पद भरण्यात येतील. 

पदाचा तपीशील - साहेयक वसतीगृह अधिक्षक पद संख्या 1 पात्रता शिक्षण 10 वी पास, वय 1 जानेवारी 2026 रोजी 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. तरी आपण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे 31 डिसेंबर 2025 पर्यत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधीक्षक अर्जून जाधव – 8380873985 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

0000



 वृत्त क्रमांक 1322

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी

शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

नांदेड दि. 23 डिसेंबर :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी माहे जानेवारी  ते जून 2026 या महिन्यात तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट महिना सुरुवात होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. तरी अपॉईटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी यांची नोंद घेवून शिबिर कार्यालयास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय शिवराम अहिरे यांनी केले आहे.

तालुकानिहाय कॅम्पचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 2 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 4 मार्च, 3 एप्रिल, 4 मे, 3 जून 2026 यादिवशी आहे. धर्माबाद येथे 5 जानेवारी, 5 फेब्रुवारी, 6 मार्च, 6 एप्रिल, 6 मे, 5 जून 2026 यादिवशी करण्यात आले आहे. किनवट येथे 9 जानेवारी, 9 फेब्रुवारी, 9 मार्च, 9 एप्रिल, 11 मे, 10 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. मुदखेड येथे 13 जानेवारी, 13 फेब्रुवारी, 13 मार्च, 13 एप्रिल, 13 मे, 12 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. माहूर येथे 16 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 16 मार्च, 15 एप्रिल, 15 मे, 15 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. हदगाव येथे 19 जानेवारी, 18 फेब्रुवारी, 18 मार्च, 17 एप्रिल, 18 मे, 18 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. धर्माबाद येथे 23 जानेवारी, 23 फेब्रुवारी, 23 मार्च, 23 एप्रिल, 22 मे, 22 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. हिमायतनगर येथे 28 जानेवारी, 25 फेब्रुवारी, 27 मार्च, 27 एप्रिल, 26 मे, 25 जून 2025 रोजी करण्यात आले आहे. किनवट येथे 30 जानेवारी, 27 फेब्रुवारी, 30 मार्च, 29 एप्रिल, 29 मे , 29 जून  2026 रोजी करण्यात आले आहे. शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वरील शिबिराच्या दिवशी स्थानिक सुटटी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेमध्ये बदल होवू शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1321

न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात येणार मोबाईल व्हॅन

नांदेड, दि. 23 डिसेंबर :- ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचता यावे व त्यांनी न्यायापासून वंचित राहू नये याकरिता नांदेड जिल्हामध्ये ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत 3 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 पर्यंत फिरते लोकअदालतीचे मोबाईल व्हॅन नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील खेडोपाडी पोहोचणार आहे. 3 जानेवारी 2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष सुनिल वेदपाठक यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय नांदेड येथून मोबाईल व्हॅनच्या प्रवास कार्यक्रमास हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न होईल. त्यानंतर तालुक्यातील पुढील प्रवास पुढीलप्रमाणे राहील.

दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी लोहा तालुक्यात मारतळा येथे, 5 जानेवारी 2026 रोजी कंधार तालुक्यात कौठा, 6 जानेवारी 2026 रोजी मुखेड तालुक्यात बाऱ्हाळी, 7 जानेवारी 2026 रोजी देगलूर तालुक्यात हानेगाव, 8 जानेवारी 2026 रोजी नायगाव तालुक्यात सावरखेड, 9 जानेवारी 2026 रोजी बिलोली तालुक्यात बडुर, 12 जानेवारी 2026 रोजी धर्माबाद तालुक्यात मंगनाळी, 13 जानेवारी 2026 रोजी उमरी तालुक्यात गोरठा, 14 जानेवारी 2026 रोजी मुदखेड तालुक्यात डोणगाव, 15 जानेवारी 2026 रोजी अर्धापूर तालुक्यात शेलगाव, 16 जानेवारी 2026 रोजी हदगाव तालुक्यात तामसा, 17 जानेवारी 2026 रोजी माहूर तालुक्यात वझरा शे.फ., 19 जानेवारी 2026 रोजी किनवट तालुक्यात मांडवी, 20 जानेवारी 2026 रोजी हिमायतनगर तालुक्यात मंगरुळ, 21 जानेवारी 2026 रोजी भोकर तालुक्यात हळदा येथे तर 22 जानेवारी 2026 रोजी नांदेड तालुक्यातील मौजे बळीरामपुर येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कायदेविषयक शिबीर व फिरते लोकअदालतीच्या माध्यमातून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विविध योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या गावांच्या पोलीस स्टेशन हद्यीतील तडजोडपात्र दिवाणी, फौजदारी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पक्षकार, ग्रामस्थ-नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे यांनी केले आहे.
00000

Monday, December 22, 2025

वृत्त क्रमांक 1320

बालविवाहासाठी सेवा पुरवाल तर कारवाई होणार - अपर जिल्हाधिकारी 

बालविवाहमुक्त समाजासाठी सर्वांचे योगदान आवश्यक

बालविवाह होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधा

विवाहसेवा पुरवठादार यांच्यासोबत बैठक संपन्न

नांदेड, दि. 22 डिसेंबर :- बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालविवाह करणे, त्यास परवानगी देणे, प्रोत्साहन देणे किंवा कोणत्याही प्रकारे चालना देणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. अधिनियमातील कलम 10 व 11 नुसार बालविवाह घडवून आणण्यासाठी मदत किंवा परवानगी देणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंत सश्रम कारावास व एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर बालविवाहासाठी कोणत्याही प्रकारची सेवा पुरवाल तर कारवाई होईल, असे निर्देश जिल्ह्यातील विवाहासंबंधित सेवा पुरवठादार यांना अपर जिल्हाधिकारी डॉ.रत्नदीप गायकवाड यांनी दिले.

बालविवाहमुक्त नांदेड जिल्हा करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ, एसबीसी 3 मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विवाहासंबंधित सेवा पुरवठादारा सोबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली.  बैठकीस महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ, पर्यवेक्षक गजानन जिंदमवार, युनिसेफच्या मोनाली धुर्वे, जिल्हा समन्वयक निलेश कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील विविध विवाहसेवा पुरवठादार संघटनांचे अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

बालविवाह निर्मूलनासाठी विवाहसेवा पुरवठादारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करताना अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड म्हणाले की, भटजी, मौलवी, भंते यांच्यासह हॉल मालक, मंडप डेकोरेशन मालक, केटरर्स, प्रिंटिंग प्रेस मालक, फोटोग्राफर्स, ब्युटीशियन, कापड दुकानदार, सराफा, किराणा दुकानदार, बँड पथक, वाहनसेवा तसेच इतर संबंधित घटकांनी विवाहासंबंधी सेवा देताना योग्य ती खबरदारी घ्यावी यामुळे बालविवाहास निश्चितच आळा बसेल.

विवाहसेवा पुरवठादारांनी आवश्यक दक्षता न घेतल्यास तसेच बालविवाहात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड व दोन वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून बालविवाह न करण्याचा व आपल्या आजूबाजूला होऊ न देण्याचा तसेच कायद्याचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचा संकल्प करावा, असे महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ यांनी प्रास्ताविकात सांगितले. विवाहसेवा पुरवठादार बैठकीत माहितीचे युनिसेफच्या मोनाली धुर्वे यांनी सादरीकरण केले. 

यावेळी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा उपस्थिताना देण्यात आली. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा-2006 च्या पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले. हे पोस्टर्स सर्व पुरवठादार अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी यांच्या व्हॉटसअपवरुन जास्तीत पुरवठादार यांना पाठवावे. याची जास्तीतजास्त जनजागृती करण्यात यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 

तसेच आपल्या आजूबाजूला बालविवाह होत असल्याचे लक्षात आल्यास किंवा तशी माहिती मिळाल्यास तात्काळ चाईल्ड लाईन हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधावा. यामध्ये तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येते, त्यामुळे या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने  करण्यात आले आहे. 

00000









Friday, December 19, 2025

 फोटो कॅप्शन : दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट देऊन पशुप्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी डॉ शितल मुकणे, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन विभाग पुणे, राजकुमार पडिले, प्रवीण घुले, आदी उपस्थित होते.






 वृत्त क्रमांक 1319

माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी 

नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पशुप्रदर्शन स्पर्धेत मराठवाड्याचे भूषण मानल्या जाणाऱ्या देवणी जातीच्या वळूंनी बाजी  मारली आहे . लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील उजळंब येथील शेतकरी विनायक श्रीमंतराव थोरात यांच्या देवणी जातीच्या वळूंनी या स्पर्धेत बाजी मारली. 

या स्पर्धेत एक वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक तसेच एक वर्षावरील गटात द्वितीय क्रमांक असे दोन्ही पारितोषिके विनायक थोरात यांच्या देवणी जातीच्या वळूंनी पटकावून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. देवणी जातीची वैशिष्ट्ये, उत्तम बांधा, चांगले आरोग्य व शुद्ध वंश या गुणांच्या आधारे परीक्षकांनी या वळूंना विशेष गुण दिले. 

या यशामुळे देवणी जातीच्या गोवंश संवर्धनाला चालना मिळाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माळेगाव यात्रेतील या पशुप्रदर्शन स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील देशी गोवंशाच्या जतन व संवर्धनाला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.या यशाबद्दल शेतकरी विनायक श्रीमंतराव थोरात यांनी यासाठी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे पशुपालक, ग्रामस्थ तसेच शेतकरी बांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

मालेगाव यात्रा  ही नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात खंडोबा देवाची मोठी यात्रा असते जी दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला भरते आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. 

कोट

शेतकरी विनायक श्रीमंतराव थोरात

वळूची काळजी लहान मुलांप्रमाणे घ्यावी लागते. दररोज दोन वेळा शेंगदाण्याची पेंड भिजवून द्यावी लागते. तसेच मका, ज्वारी-बाजरीचा भरडा, पौष्टिक खुराक आणि हिरवा चारा खाऊ घालावा लागतो. रोज सकाळी व संध्याकाळी योग्य असा व्यायाम करून घ्यावा लागतो आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागते. दररोज शाम्पू व साबणाने नीट स्वच्छ करून घ्यावे लागते.

00000










पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...