Monday, July 22, 2024

 वृत्त क्र. 622

आर्थीकदृष्टया दुर्बल घटक, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया
मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलत
 
नांदेड, दि. 22 जुलै :- आर्थीकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागास वर्ग या प्रवर्गातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात 50 टक्के ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थींनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाने सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा 8 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानीत अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानीत (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानीत महाविद्यालये,तंत्र निकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभीमत विद्यापीठे (खाजगी अभीमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहायीत विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठे अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायीक अभ्यासक्रमास, शासनाच्या सक्षम प्राधिकारामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रकियेद्वारे (Centralized Admission Process - CAP ) (व्यवस्थापन कोटयातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून) व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थीकदृष्टया दुर्बल घटकातील (EWS), इतर मागास प्रवर्गातील (OBC), सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास प्रवर्गातील (SEBC) मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 100 टक्के सवलत देण्यात आलेली आहे. उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या (नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली) विद्यापीठ/महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक, उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
00000

  वृत्त क्र. 621

 वृत्त क्र. 620 

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  19.40  मि.मी. पाऊस

 

नांदेड दि. 22 जुलै :- जिल्ह्यात सोमवार 22  जुलै रोजी सकाळी  संपलेल्या गत 24 तासात सरासरी  19.40  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 361.80  मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

जिल्ह्यात सोमवार 22 जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 15.40 (336.20), बिलोली-16.60 (408.70), मुखेड- 39.50(408.40), कंधार-24.10 (381), लोहा-21.70 (366), हदगाव-9.90 (284.80), भोकर-14.10 (312.90), देगलूर-42.70 (321.60), किनवट-13.20(462.20), मुदखेड- 20.40 (379.90), हिमायतनगर-12.20 (331.40), माहूर- 2.10 (349.20), धर्माबाद- 12.20 (429.30), उमरी- 10.90 (301.70), अर्धापूर- 16.80 (401), नायगाव-16.40 (257.70) मिलीमीटर आहे.

0000

 वृत्त क्र. 619

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

·    या आर्थिक वर्षासाठी 628 शेततळयाचा लक्षांक प्राप्त

नांदेडदि. 22 जुलै :- राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्याबाबत 29 जून 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा अर्ज पुढील तपशिलाप्रमाणे करावा. या योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतूसुविधा केंद्रगावातील कृषि सहाय्यकतालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

लाभार्थी पात्रता

अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्टया योग्य असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थी निवड

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडती नुसार लाभ देण्यात येईल.

अर्ज सादर करण्याची पध्दत

महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

शेततळयासाठी आकारमान

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयासाठी कमाल मर्यादा रुपये 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. शेततळयाच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम निश्चीत करण्यात आली आहे. तथापि देय अनुदानाची कमाल रक्कम 75 हजार रुपये इतकी राहील. रक्कम 75 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरिक्त खर्च संबधित लाभार्थ्याने स्वत: करणे अनिवार्य राहील. जिल्ह्यात आजपर्यत सन 2024-25  या आर्थिक वर्षात अनुसूचित जातीसाठी 61 अनुसूचित जमातीसाठी 39 व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 528 असे एकूण 628 शेततळयाचा लक्षांक प्राप्त झाला असून आर्थिक लक्षांक 418 कोटी 66 लाख रुपये इतका आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  या योजनेचा लाभ घ्यावा असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000


Saturday, July 20, 2024

 वृत्त क्र. 618

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती

नांदेडदि. 20 जुलै :- सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथील वसतीगृहामध्ये कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक व अवलंबितांमधून पदे भरावयाची आहेत. माजी सैनिक/अवलंबित उपलब्ध नसल्यास पदे नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात येणार आहेत.

स्वयंपाकी (महिला) या एका पदासाठी पात्रता किमान एक वर्ष अनुभव तर वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे आवश्यक आहे. अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे 25 जुलै 2024 पर्यंत दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षक यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 व 8707608283 वर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000

 वृत्त क्र. 617

फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न

नांदेड दि. २0 जुलै : सहकार व पणन  विभाग अंतर्गत आशिया विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस   नेटवर्क( मॅग्नेट )प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड  व  प्रकल्प संचालक,आत्मा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय  फुलशेती उत्तम कृषी पद्धती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड, भाऊसाहेब बराटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक,आत्मा,नांदेड महादेव बरडे, प्रकल्प उपसंचालक,मॅग्नेट लातूर, गणेश पाटील, विभागीय प्रकल्प अधिकारी, मॅग्नेट, लातूर, हेमंत जगताप, मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल,शिवाजीनगर , गजेंद्र नवघरे  , कन्सल्टंट  , मॅग्नेट प्रकल्प, लातूर, अक्षय हातागळे, GESI अधिकारी,मॅग्नेट, लातूर* इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 उद्घाटन प्रसंगी अभिजीत राऊत यांनी  नांदेड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले. फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेती केली तर त्याचे मार्केटिंग करण्यास अतिशय सोपे होईल व त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा शेतकऱ्यांना पुरवल्या जातील असे आश्वासित केले. तसेच फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी भविष्यामध्ये शेतकऱ्यांचा ग्रुप केला जाईल व त्यामार्फत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले. 

भाऊसाहेब बराटे यांनी फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या येऊन फक्त फुल शेतीचीच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी असे सुचवले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले. महादेव बरडे यांनी मॅग्नेट प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती उपस्थित शेतकरी बंधूंना दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मॅग्नेट प्रकल्पाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.श्री. हेमंत जगताप यांनी प्रास्ताविकामध्ये  मॅग्नेट प्रकल्पाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला नांदेड येथे फुल शेती पीक कार्यशाळा घेण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मॅग्नेट प्रकल्पातील अधिकारी वर्गाचे अभिनंदन मानले. फुल शेती पिकाबरोबरच इतरही पिकांसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन भविष्यामध्ये  या ठिकाणी करण्यात येईल असे सांगितले.  कार्यशाळेमध्ये खुल्या वातावरणातील फुल शेती लागवड  याविषयी डॉ. गणेश कदम, शास्त्रज्ञ, पुष्प अनुसंधान निदेशालय,पुणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. फुल पिकांची नियंत्रित वातावरणातील शेती  याविषयी श्री. राजन निफाडकर, तांत्रिक अधिकारी, केएफ बायोप्लांट्स,पुणे यांनी माहिती सांगितली. फुल पिकांसाठी संरक्षित वातावरणातील तंत्रज्ञान याविषयी श्री हेमंत जगताप मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. फुल पिकांचे मार्केटिंग तंत्रज्ञान याविषयी  गणेश पाटील, विभागीय प्रकल्प अधिकारी, मॅग्नेट प्रकल्प कार्यालय लातूर यांनी माहिती दिली. महिलांसाठी लैंगिक व सामाजिक विषमता याविषयी अक्षय हातागळे, मॅग्नेट प्रकल्प लातूर  यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे आयोजन विनायक कोकरे,प्रकल्प संचालक,मॅग्नेट प्रकल्प पुणे, मिलिंद आकरे, व्यवस्थापकीय संचालक एमसीडीसी पुणे डॉ. अमोल यादव,सह प्रकल्प संचालक मॅग्नेट पुणे,  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.सदर कार्यशाळेमध्ये नांदेड जिल्ह्यातील २२८ प्रगतशील शेतकऱ्यांनी आपला  सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री हेमंत जगताप मनुष्यबळ विकास व वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ,साखर संकुल, शिवाजीनगर,पुणे यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड व प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय नांदेड  व एम सी डी सी पुणे येथील अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभले.

0000






 वृत्त क्र. 616

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परीसरात

जवळपास 300 झाडांचे वृक्षारोपण मियावाकी पद्धतीने 

 

नांदेड दि. 20 जुलै : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड परिसरात जवळपास 300 झाडांचे वृक्षारोपन मियावाकी पध्दतीने अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अधिष्ठाता यांनी मियावाकी वृक्षलागवड ही पध्दत जपानमधील वनस्पती पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. अकीरा मियावाकी यांनी शोधून काढली असुन मियावाकी पध्दतीने वृक्षारोपन केल्यामुळे कमी जागेत जास्त झाडे लावता येतात ज्यामुळे सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी वृक्षांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्यांची वाढ जोमाने होते. या पद्धतीमुळे जैवविविधता जोपासण्यास हातभार लागुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते व आपल्या भावी पिढीचे जगणे सुखकर होईल असे मत व्यक्त केले. तसेच अधिष्ठाता यांनी वृक्षांचे संगोपन हा फार महत्त्वाचा भाग असल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.

 

सदर वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत वड, कडूनिंब, पिंपळ, चिंच, आवळा, बांबू, जांब, हिरडा इत्यादी प्रकारचे वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमास डॉ. वाय. एच. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. एस. आर. मोरे, प्राध्यापक व विभाग प्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, डॉ. राजेश अंबुलगेकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख, अस्थीव्यंगोपचारशास्त्र विभाग, डॉ. किशोर राठोड, प्राध्यापक व विभाग प्रमुख, बालरोगचिकित्साशास्त्र विभाग, डॉ. सुधा करडखेडकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरिरक्रियाशास्त्र विभाग, डॉ. वैशाली इनामदार, प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरिररचनाशास्त्र विभाग, डॉ. भावना भगत, प्राध्यापक व विभाग प्रमुख, दंतशास्त्र विभाग, डॉ. अनिल देगांवकर, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र विभाग, डॉ. अतिष गुजराती, सहयोगी प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र विभाग, डॉ. मुकुंद कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक, शरिरक्रियाशास्त्र विभाग, डॉ. आय. एफ. इनामदार, सहयोगी प्राध्यापक, जन औषधवैद्यकशास्त्र विभाग, डॉ. सलिम तांबे, सहयोगी प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र विभाग, डॉ. अभिजित देवगरे, उप वैद्यकीय अधीक्षक व  संयज वाकडे, प्रशासकीय अधिकारी महाविद्यालय विभाग व  के. बी. विश्वासराव, प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय विभाग, श्रीमती अलका जाधव, अधिसेविका यांचेसह विविध विभागाचे वैद्यकीय अध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी व कर्मचारी वृंद हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन हे डॉ. आर. डी. गाडेकर, सहयोगी प्राध्यापक, जन औषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी केले.

00000



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...