Tuesday, December 3, 2019


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सन 2020
स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर  
नांदेड दि. 3 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव यांनी जाहीर केले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून पूर्व परीक्षा 5 एप्रिल रोजी तर मुख्य परीक्षा 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे.
आयोगाच्या या वेळापत्रकानुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा शनिवार 8 ते 10 ऑगस्ट 2020 हे तीन दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवार 28 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात येणार असून उर्वरित सर्व पूर्व तसेच मुख्य परीक्षा रविवारी घेण्याचे नियोजित आहे. राज्य सेवा परीक्षेची जाहिरात डिसेंबर 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार 8 ऑगस्ट ते सोमवार 10 ऑगस्ट अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी जानेवारी 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा 1 मार्च 2020 रोजी तर मुख्य परीक्षा रविवार 14 जून 2020 रोजी घेण्यात येणार आहे. तर सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेची जाहिरात जानेवारी 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा 15 मार्च 2020 रोजी तर मुख्य परीक्षा 12 जुलै 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी 2020 मध्ये तर पूर्व परीक्षा 3 मे 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1 साठी 6 सप्टेंबर 2020 रोजी, पेपर क्र. 2 (पोलीस उपनिरीक्षक) 13 सप्टेंबरला, पेपर क्र. 2 (राज्य कर निरीक्षक) 27 सप्टेंबर रोजी, पेपर क्र. 2 (सहायक कक्ष अधिकारी) 4 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र वन सेवा परीक्षेसाठी मार्च 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा 10 मे 2020 रोजी, तर मुख्य परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च 2020 मध्ये जाहिरात, तर 17 मे 2020 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 18 ऑक्टोबर 2020 रोजी होईल.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेची जाहिरात एप्रिल 2020 मध्ये प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा 7 जून 2020 रोजी घेण्यात येणार आहे. कृषी सेवा परीक्षेची जाहिरात मे 2020 महिन्यात, तर पूर्व परीक्षा 5 जुलै रोजी आणि मुख्य परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 ला घेण्याचे नियोजित आहे. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा सप्टेंबर 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून परीक्षा शनिवार 28 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ  शकतो, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
000000


जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली संपन्न
नांदेड, दि. 3 :- जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर निमित महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड, श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे,  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निळकंठ भोसीकर, मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ अजयसिंह बिसेन, मनपा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बदीदयोदिन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. दिपक हजारी, जि. प. चे प्रशासकीय अधिकारी डॉ. रुईकर, नर्सिंग विद्यालयाचे प्राचार्य एस. ए. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनचे संचालक डॉ. बोडके, सायन्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी. डी. पवार, प्रा. डॉ. अरुणा शुक्ल, लिंकवर्कर प्रकल्प, विहान प्रकल्पाचे पदाधिकारी, विविध विद्यालयाचे एनएसएस प्रमुख, विद्यार्थी व विद्यार्थीनी, आरोग्य कर्मचारी, आयसीटीसी विभाग, सक्षम सेवाभावी संस्था सिडको नांदेड व विविध सेवाभावी संस्थेेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थीतीत रॅलीस सुरुवात झाली.
रॅली श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक नांदेड जिल्हा रुग्णालय येथून सुरुवात करुन गांधी पुतळा मार्गे हनुमानपेठ वजिराबाद, मुथा चाै, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे पथनाटय सादर करुन सांगता करण्यात आली.
याशिवाय नांदेड जिल्ह्यातील एड्स पंधरवाडा निमित्त विविध स्पर्धा घेण्यात येणार असन तसेच पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अंकशे कुलदिप यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयसीटीसीचे समुदेशक माधव वायवळे यांनी केले तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी एचआयव्ही, एड्सबाबत माहिती देन जागतिक एड्स दिनाचे महत्व स्पष्ट केले. यावेळी डॉ. कुलदिप अंकुशे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डापकू यांनी आभार मानले. कार्यक्रम यस्वी करण्यासाठी श्रीनिवास अमिलकंठवार, अजय मवाडे, हषवर्धन पंडागळे, आयसीटीसी समुदेक दिपाली पेठकर, संतोष वाडीकर यांनी परिश्रम घेतले.
000000

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन

शुभारंभ कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

            नांदेड, दि. 3 :- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2019 संकलन शुभारंभ कार्यक्रम शनिवार 7 डिसेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन  येथे  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10.30 वा. होत आहे. या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, इतर मान्यवर  उपस्थितीत राहणार आहे.

            या कार्यक्रमा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2018 उत्कृष्ट संकलन करणाऱ्या कार्यालय प्रमुख, कर्मचाऱ्यांचा, सहसंस्था यांना प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात येणार आहे.  जिल्हयातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, विशेष गौरव पुरस्कार प्राप्त पाल्यांचा सत्कार  माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हयातील सर्व वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, विधवा पत्नी व त्यांचे अवलंबितांनी  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन, नांदेडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. 

00000

Monday, December 2, 2019



देगलूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या
निवडणूक गणांची 10 डिसेंबरला आरक्षण सोडत  
नांदेड, दि. 2 :- देगलूर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक बाजार क्षेत्रातील आरक्षण सोडत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार 10 डिसेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन नांदेड येथे सकाळी 11 वा. काढण्यात येणार आहे. सर्व संबंधितांनी या आरक्षण सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
देगलूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रातील लोकसभा / राज्यासभा सदस्य , विधानसभा / विधान परिषद सदस्य , जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती पदाधिकारी, संबंधीत बाजार समितीचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत गणांचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.
सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या निर्देशानूसार देगलूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यात देगलूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात 110 एकुण गावे समाविष्ट आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशान्वये गावनिहाय खातेदारांची संख्या विचारात घेऊन या गावांचे एकूण 15 गणांत (विभाग) विभाजन करुन महाराष्ट्र् कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 13 (1) मधील तरतूदीनूसार 15 गणांपैकी महिलांसाठी- 2 गण, इतर मागासवर्गीयांसाठी- 1 गण, विमुक्त (जाती/भटक्याह जमातीसाठी– 1 गण, अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीसाठी- 1 गण असे एकूण 5 गणांचे आरक्षण लॉटरी पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
00000

Saturday, November 30, 2019


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यात शनिवार 7 डिसेंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 7 डिसेंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे
यांच्या उपस्थितीत बाल कल्याण समितीची बैठक संपन्न
नांदेड दि. 30 :- महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बाल न्याय मंडळ बाल कल्याण समिती, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, अधिक्षक मुलांचे निरीक्षण गृह नांदेड यांच्या सोबत गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी बैठक संपन्न झाली.
बैठकीबाल न्याय मंडळाचे अध्यक्षा श्रीमती गवई, डॉ. हरदीपसिंग, डॉ.समता तुमवाड (सदस्य बाल न्याय मंडळ) तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती आर.पी.काळम, ॲड. गणेश जोशी, ॲड. सावित्री जोशी, डॉ. लटुरिया (सदस्य, बाल कल्याण समिती ) श्री. खानापुरकर जिपअ, श्री. दवणे अधिक्षक, निरीक्षण गृह नांदेड, श्रीमती राठोड हे उपस्थित होते.
बालकांसंबंधी विविध विषयावर चर्चा करुन अध्यक्ष श्री. घुगे म्हणाले, जे अनाथ बालके आहेत त्यांच्यासाठी Sponsorship शोधणे, पालकत्व मिळवून देणे, बालकांना दत्तक घेण्यास इच्छुक पालक शोधणे, ज्या मुलास कुटूंबच माहिती नाही अशा बालकांना सुट्यात कौटुंबिक वातावरण निर्माण करुन देण्यासाठी इच्छुक कुटूंब मिळवून देणे आदी बाबीवर मोलाचे मार्गदर्शन केले. बाल कल्याण समिती बाल न्याय मंडळ यांच्या कामकाजाशी संबंधीत काही अडचणी असल्यास सोडवण्याचा निश्चीतपणे प्रयत्न करु असे ही ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी मुलांचे निरीक्षणगृह नांदेड येथील प्रवेशितांशी संवाद साधला स्वत: बालक होऊन त्यांच्याशी मनसोक्त गप्पा केल्या आणि निरीक्षण गृहातील सोयी-सुविधाबाबत समाधान व्यक्त केले.
शेवटी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम यांनी आभार मानले.
00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...