Tuesday, June 26, 2018

कृषि विभागाच्यावतीने
1 जुलै रोजी कृषि दिनाचे आयोजन
        नांदेड , दि. 26:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त कृषि विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कै . यशवंतराव चव्हाण सभागृह , जिल्हा परिषद, नांदेड येथे दिनांक 1 जुलै, 2018 रोजी सकाळी 11- 00 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            तरी या कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
****
सामाजिक न्यायासाठी प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव असावी
-- प्रा.किरण सगर
नांदेड दि. २६:- दिनदुबळ्या व वंचित घटकांच्या सामाजिक न्यायासाठी प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावीअसे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस व मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर यांनी केले आहे. 
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवनात आयोजित राजर्षी शाहू महाराज यांच्या 144 व्या जयंती निमित्त व्याख्यान प्रसंगी प्रा. सगर बोलत होते. अध्यक्षस्थानी समाज कल्याण उपायुक्त शेख जलील हे होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवारबापू दासरी रामचंद्र देठे यांची उपस्थिती होती.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा पाया रचला असे सांगून प्रा.किरण सगर पुढे म्हणाले कीराजर्षी शाहू महाराज कृतीशील विचारवंत असल्याने त्यांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षण जाहीर केलेत्यामुळे त्यांच्यावर टिकाही झाली. जातीनिहाय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढलीघोड्याच्या तबेल्यात जसे सशक्त घोडे दुर्बल घोड्याना चारा खाऊ देत नाहीत तशीच स्थिती बहुजन समाजातील उपेक्षित घटकांची झाली होती हे चित्र राजर्षी शाहूनी बदलून दाखवले होतेया उपेक्षित समाजासाठी त्यांनी उन्नतीच्या योजना राबवल्या. 
राजर्षी शाहू महाराजांच्या राजवटीत शेतकरी सुखी होतातो आत्महत्या करत नव्हतासमाजाचे हक्क व कर्तव्याप्रती योग्य समुपदेशन झाले पाहिजेसद्सदविवेक पध्दतीने न्याय मिळवता आला पाहिजे असेही ते म्हणाले.
अध्यक्षपदावरून बोलतांना समाज कल्याण उपायुक्त शेख जलील म्हणाले की,  शासनाकडून आवश्यक त्या योजना राबवून सामाजिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जात असून राजर्षी शाहू महारांजाचे विचार अंमलात आणले जात आहेत 
समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी प्रास्ताविकात राजर्षी शाहू महाराजांवर प्रकाश टाकून व्याखानाचा विषय "राजर्षी शाहू महाराज  यांचा शैक्षणिक व समतावादी दृष्टिकोण " हा असल्याचे सांगितले.
जयंती निमित्त आयोजित निबंध आणि वक्तत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली.
प्रारंभी दीप प्रज्वलित करून महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराजडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन बापू दासरी यांनी केलेव्याखानास शहरातील नागरिकविद्यार्थीसमतादूत उपस्थित होते. 
****
मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड येथे आयोजन
नांदेड, दि. 26:- मा. मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई यांच्यावतीने व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्यायाधीश तथा अध्यक्ष प्रमुख जिल्हा श्री. एस. पी. कुलकर्णी यांचे आदेशान्वये दि. 26 जुन 2018 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड येथे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अध्यक्षास्थानी न्या.श्री. डी. टी. वसावे हे होते.
न्या.श्री. डी. टी. वसावे अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले की, प्रत्येकाने आपले प्रकरण मध्यस्थी व तडजोड करणे महत्वाचे आहे, कारण कोर्टामध्ये प्रकरणांसाठी वेळ व पैसा जात असतो. त्यासाठी मध्यस्थीने वाद मोकळया मनाने मिटविण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर आपले आयष्य भांडणात जाईल.
जो माणुस माफ करतो, तोच मोठा होतो. मध्यस्थीसाठी जे प्रकरण तडजोड करण्यासाठी येतात त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मदत करण्याचे आश्वासनही दिले. तसेच पक्षकारानी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या व त्यांच्या शंकाचे निरसन न्या. वसावे यांनी केले.
दिनांक 14 जुलै 2018 रोजी होणऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त तडजोड पात्र प्रकरणे
मध्यस्थीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच लोकअदालतीच्या पॅनलवर काम करीत असतांना नियमांचे, वेळेचे पालन करणे आवश्यक आहे. पॅनल सदस्यांनी वेळेवर हजर राहुन लोकअदालत यशस्वी करण्यात सहकार्य करणे आवश्यक आहे.
यावेळी न्यायाधीश श्री. डी. टी. वसावे यांनी सहयोग योजनेबाबत उपस्थित विधीज्ञांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण केले. तसेच विधी सेवा प्राधिकरणतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरजू घटकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपल्या हातून समाजसेवा करण्याची ही एक संधी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी विधीज्ञ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे कर्मचारी उपस्थित होते.
****


Monday, June 25, 2018



राजर्षी शाहु महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
समता दिंडीस उत्स्फुर्त सहभाग
नांदेड, दि. 25 :- राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या 144 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने " समता दिंडी "चे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला व राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.
समाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकणारा चित्ररथ आणि सामाजिक न्याय बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या घोषणांमुळे दिंडी लक्षवेधी ठरली. या दिंडीत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, तसेच विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते आय.टी.आय. नांदेड येथून समता दिंडीची सुरुवात करण्यात आली. समता दिंडीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आला.  
यावेळी समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अशोक गोडबोले , शिक्षणाधिकारी (माध्य) अशोक देवकरे, समता दूतचे प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदिंची यावेळी उपस्थिती होती.
*****

क्रीडा प्रबोधिनी सरळ प्रवेश आणि
 क्रीडा कौशल्य चाचणी (फुटबॉल-मुली) आयोजन 
नांदेड, दि. 25 :- राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत मुलींना फुटबॉल खेळासाठी क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे प्रवेश देण्याकरीता सरळ प्रवेश प्रक्रीया व खेळ निहाय कौशल्य चाचण्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील जास्तीतजास्त फुटबॉल (मुली) खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार  यांनी केले आहे.
सरळ प्रवेशाकरीता पात्रता पुढील प्रमाणे आहे. राज्यस्तरावर पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरसहभाग असलेल्या खेळाडूंची सबंधीत खेळाच्या अधिकृत कौशल्य चाचणीद्वारे गुणानुक्रमे अंतिम निवड केली जाणार आहे. वयोमर्यादा 19 वर्षे. 
क्रीडा कौशल्य चाचणी पात्रता- राज्यस्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंची सबंधित खेळाच्या अधिकृत कौशल्य चाचणीद्वारे गुणानुक्रमे अंतिम निवड केली जाणार आहे.वयोमर्यादा 19 वर्षे. 
खेळाडुची उपस्थिती :-27 जून 2018 रोजी सायं 5 वाजेपर्यंत, वसतिगृह शिवछत्रपती क्रीडा   संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे. खेळाडूंची निवास व्यवस्था- क वसतिगृह वसतिगृह शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे. फुटबॉल सरळ प्रवेश चाचणी तसेच फुटबॉल कौशल्य चाचणी व प्रवेश चाचणी- 28 जून 2018 मुख्य स्टेडीयम, शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळुंगे  बालेवाडी येथे होईल असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 00000

सामाजिक न्याय दिनानिमित्त
समता दिंडी व कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड, दि. 25 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून जिल्हा, तालुका व गाव पातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्याकडून जिल्हास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यापासून आयटीआय नांदेड येथून समता दिंडीची सुरुवात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन येथे समता दिंडीचा समारोप होईल. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथील सांस्कृतिक सभागृहात खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक,  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
या कार्यक्रमास प्रा. डॉ. किरण सगर, प्रख्यात विचारवंत व उपाध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी दिली आहे. 
0000


आराखड्यानुसार जलयुक्तची

कामे वेळेत पूर्ण करावीत  

 --- जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड, दि. 25 :- जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार मनरेगाची कामे आराखड्यानुसार कामे वेळेत व नियोजनबद्ध पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज दिले. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

या बैठकीस उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) महेश वडदकर, जिल्‍हा परिषदेचे उपजिल्‍हा कार्यक्रम समन्‍वयक नरेगा श्रीमती कल्‍पना क्षिरसागर, सामाजिक वनविभागाचे विभागीय वन अधिकारी सुर्यकांत मंकावार, कृषी उपसंचालक माधुरी सोनवणे तसेच जिल्‍ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार , गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी , वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल, उपविभागीय अभियंता तसेच विविध विभागांच्‍या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे म्‍हणाले की, सन 2017-2018 मधील जिल्ह्यात 183 गावांची निवड करण्यात आलेली आहेत. एकूण 5 हजार 424 कामे प्रस्तावित आहेत. 4 हजार 85 कामे पूर्ण तर 343 कामे प्रगतीपथावर आहे. रुपये 27.76 कोटी खर्च झाला आहे. जून, 2018 अखेरपर्यंन्त सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गतची 82 टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. 40 टक्के गावे जलपरिपुर्ण झाली आहेत.

सन 2018-2019 मध्ये 216 गावांची निवड करण्यात आली आहे. शिवार फेरी पूर्ण झालेली आहे. आराखड्यास तालुकास्तरीय समितीची मान्यता देण्यात आलेली आहे. प्रत्येक गावातील पाच व्यक्तींचे प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात आलेले आहेत. आराखड्यास जिल्हास्तरीय मान्यताही दिली आहे. सन 2018-2019 मधील कामांबाबत तालूका कृषि अधिकारी, किनवट व जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, नांदेड यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

उपजिल्हाधिकारी रोहयो महेश वडदकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...