Friday, May 10, 2024

 वृत्त क्र. 416

उन्हाळयात प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 10 :- प्राण्याचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि अनावश्यक वेदना टाळण्यासाठी सर्व वाजवी उपाययोजना करण्याची जबाबदारी प्राणी मालकांची आहे. ही जबाबदारी व कर्तव्य टाळल्यास प्राण्यांतील क्रुरता अधिनियम 1960 मधील कलम 11 (1) च्या तरतुदीनुसार ही बाब क्रुरता ठरते. तसेच हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे उन्हाळयात वाढत्या उच्च तापमानात प्राण्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होवू नये यासाठी त्यांची योग्य काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त  डॉ. राजकुमार पडीले यांनी केले आहे.

 

उच्च तापमानामुळे प्राण्यांच्या शरीर व चयापचय प्रक्रीयेत बदल घडून येतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते व त्यामुळे शरीर व चयापचय प्रक्रीयेत बदल घडून येतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते व रक्त प्रवाहावर परिणाम होतो. यामुळे जनावरे कमी खाद्य खातात व पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. त्याचा प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो. तसेच स्त्रीबीज आणि माजाच्या प्रक्रीयेवर सुध्दा परिणाम होतो. त्यामुळे विर्य गुणवत्ताबिजांड व गर्भधारणेचे प्रमाण कमी होवून प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. याबाबी टाळण्यासाठी उन्हाळयात प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

पुरेसा निवारा 

प्राणी दिवसभर सावली असलेल्या भागात राहतील याची खातरजमा करण्यासाठी पर्यावरणास अनुकूल साहित्यापासून निवारा तयार करावा.  प्राण्यांना नैसर्गिक सावली उपलब्ध व्हावी व त्यांचे थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी निवाऱ्याची सभोवताली वृक्षारोपन करावे.

 

पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करुन देणे

उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण राखणे ही गुरुकिल्ली आहे. प्राण्यांना उन्हाळयात सहजगत्या पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पुरेशा प्रमाणात व नियमितपणे स्वच्छ पाणी द्यावे.

 

उष्णतेच्या तणावाची लक्षणे

थकवा येणेजास्त श्वासोश्वासाची गरज भासणेआळस येणेलाळ गाळणेहद्याचे ठोके  वाढणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. प्राण्यामध्ये ही लक्षणे दिसून आल्यासतात्काळ पशुवैद्यकीय उपचार करावेत. प्राण्याच्या काळजीसाठी जबाबदार असलेल्या सर्व व्यक्ती संस्थानी अत्यंत उष्णतेच्या प्रतिकूल परिणामापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय उपाययोजना कराव्यातअसेही आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 415

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 10 :- नांदेड जिल्ह्यात 21 मे 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 21 मे 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

Thursday, May 9, 2024

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

वृत्त क्र. 414

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

 

नांदेड दि. 9 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26-सीएन ही नविन मालिका 14 मे 2024 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेल सह) अर्ज 13 मे 2024 रोजी दुपारी 2.30 पर्यत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 14 मे 2024 रोजी दुपारी 4 वाजता टेक्स्ट मॅसेज द्वारे, दूरध्वनीद्वारे संबंधित अर्जदारास कळविण्यात येईल. याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक  परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

0000

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 वृत्त क्र. 413

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात

बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         बाल विवाह होणार नाहीत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले विभागांना निर्देश

·         ग्रामीणसाठी ग्रामसेवक तर शहरात बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अधिकार

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :-   अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्वाचा समजला जाणारा मुहूर्त उद्या 10 मे रोजी आहे. या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह लावले जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. तसेच बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास चाईल्ड हेल्प लाईन 1098 ला तात्काळ माहिती देण्याचेही आवाहन त्यांनी केले.

 

भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक प्रक्रीया आहे. साहजिकच शुभ मुहूर्तावर विवाह समारंभ  आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठया प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात प्रशासनाकडून सर्व संबंधित विभागांना निर्देश जारी केले आहेत. बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे विवाह बेकायदेशिर ठरतात. या विरोधात गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महिला व बाल विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक नियुक्त असून शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागात अंगणवाडी पर्यवेक्षिका नियुक्त केल्या आहे. बालविवाह रोखणे आणि बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न सर्वांनी करणे आवश्यक आहे.बालविवाह उघडकीस आल्यास पालकांपासून तर सर्वच सहभागी आरोपी ठरविले जातात त्यामुळे अशा प्रकरणात समाजातील सर्व सुशिक्षितांनी लक्ष वेधून असावे. समाजातील ही प्रथा बंद करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

आपल्या अधिकार क्षेत्रात बालविवाह होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात व असे बालविवाह होत असल्याचे लक्षात आल्यास त्यावर तातडीने आवश्यक ती कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील संबंधित विभागांना दिले आहेत.

00000

Wednesday, May 8, 2024

 वृत्त क्र. 412

पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कुठेही पाणी टंचाई नसून  केवळ जलवाहिनीच्‍या तांत्रिक बिघाडामुळे शहरात काही दिवस पाणी पुरवठा खंडित झाला होता. येणाऱ्या काळात नांदेड शहराला पुरवठा करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी आरक्षित असून नागरिकांनी पाणी टंचाईबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

नांदेड जिल्‍हयातील पाणी टंचाई संदर्भात नांदेड शहरासाठी विष्‍णुपूरी प्रकल्‍पातून 43 दलघमी व उर्ध्‍व पैनगंगा प्रकल्‍पातून 06 दलघमी पिण्‍याचे पाणी आरक्षित करण्‍यात आले आहे. मागील आठवड्यामध्‍ये नांदेड शहरासाठी विष्‍णुपूरी प्रकल्‍पातून काबरानगर जलशुद्धीकरण केंद्राला जाणारी पाण्‍याची मुख्‍य जलवाहिनी जीर्ण होवून फुटल्‍यामुळे व विद्युत मोटारीमध्‍ये तांत्रीक बिघाड झाल्‍यामुळे शहरासाठी काही दिवस पाणी पुरवठा बंद झाला होता. जलवाहिनी दुरुस्‍तीचे काम अंतिम टप्‍प्‍यात असून साधारणपणे दोन दिवसात शहराचा पाणी पुरवठा सुरुळीत होईल, असे मनपा प्रशासनाने कळविले आहे. 

तसेच शहराच्‍या पाणी पुरवठा करण्‍याच्‍या दृष्‍टीने अतिरिक्‍त उपाययोजना म्‍हणून उर्ध्‍व पैनगंगा प्रकल्‍पातील आरक्षित पिण्‍याच्‍या पाण्‍यापैकी 02 दलघमी पाणी सांगवी बंधाऱ्यामध्ये सोडण्‍याबाबत आदेश केले होते. त्‍यानुसार आता नांदेड महापालिकांतर्गत सांगवी बंधाऱ्यातून आवश्‍यकतेनुसार पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा सुरुळीत झाला आहे. सध्‍या नांदेड शहरामध्‍ये 25 टॅंकरव्‍दारे व 250 बोअरवेल व्‍दारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. 

ग्रामीण भागातील 15 वाडी, गावांमध्‍ये 15 खाजगी टॅंकरव्‍दारे व 141 खाजगी विहीर अधिग्रहणपैकी साधारणपणे मुखेड तालुक्‍यात 10, कंधार 4 व माहूर तालुक्‍यात 1 टॅंकरव्‍दारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. तसेच भोकर-11, हिमायतनगर-16, नायगाव-43, मुखेड-29, लोहा-13 व किनवट 16 या तालुक्‍यात विहीर अधिग्रहण प्रस्‍ताव मंजूर करण्‍यात आले आहेत.  टंचाईग्रस्‍त गावातील टंचाई निवारणासाठी जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत हे तालुक्‍याच्‍या ठिकाणी आढावा बैठक घेत आहेत. तसेच तालुक्‍यातील टंचाईग्रस्‍त गावामध्‍ये टंचाई निवारण संदर्भात इतर संबंधित अधिकारी आढावा बैठका घेवून प्रत्‍येक बाबींबर लक्ष ठेवून आहेत.

0000

  वृत्त क्र. 411

अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार  

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, अत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते.  

तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी, पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गाने न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधिक्षक माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्यगृहचे अधीक्षक वर्ग-2 एस. एम. पुजलवार यांनी केले आहे.

00000

Tuesday, May 7, 2024

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

 वृत्त क्र. 410

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

नांदेड दि. 7 :- सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप्त रेती साठ्याचा सहाशे रुपये दराने लिलाव 8 मे 2024 रोजी सकाळी 11 तहसिल कार्यालयनायगाव येथे करण्यात येणार आहे.

जप्त रेती साठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय, नायगाव (खै.) च्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छूकांनी लिलावात सहभाग घ्यावाअसे तहसिलदार नायगांव (खै.) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...