Monday, February 5, 2024

वृत्त क्र. 103

 मुक्त वातावरणात निवडणुकांसाठी

पोलीस यंत्रणा कटिबद्ध

-         विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर

 

·   शेजारील निजामाबाद, बिदर, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद येथील

     पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- आदर्श आचारसंहितेत निर्भयतेने मतदान याला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक मतदाराला आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी भयमुक्त वातावरण सहाय्यभूत ठरते.  निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया आदर्श आचारसंहितेप्रमाणे पार पाडाव्यात यासाठी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याची जबाबदारी प्रशासन व पोलीस विभागावर आहे. तेलंगणा, कर्नाटक या दोन राज्यांच्या 200 कि.मी. सीमा असलेल्या नांदेड जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील भयमुक्त वातावरणासाठी निर्मल, आदिलाबाद, कामारेड्डी, बिदर, निजामाबाद या जिल्ह्यातील पोलीस विभागाचा परस्पर समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी केले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या चार जिल्ह्यातील पोलीस विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, निजामबादचे पोलीस आयुक्त कमलेश्वर शिंगेनावर, नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निर्मलच्या पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. जी. जानकी शर्मिला, कामारेड्डीच्या पोलीस अधिक्षक सिंधू शर्मा, बिदरचे पोलीस अधिक्षक एस. एल. चेन्ना बसवन्ना, आदिलाबादचे पोलीस अधिक्षक गौस आलम, नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, भोकरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक खंडेराव धरने व जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिक्षक उपस्थित होते.  

 

कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टिने शेजारच्या तेलंगणा व कर्नाटक राज्यातील निजामाबाद, बिदर, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद या जिल्ह्यातील प्रशासन व पोलीस विभागाशी परस्पर समन्वय हा महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारीला आळा घालण्याची दक्षता पोलीस प्रशासन घेते आहे. शेजारील जिल्ह्यांच्या सीमावर विशेष पोलीस चौकी तयार करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना सर्व पोलीस यंत्रणेला दिल्या असून नेहमीसाठीच ही दक्षता घेत आहोत असे नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी सांगितले.

 

नुकत्याच झालेल्या तेलंगणाच्या निवडणुकीत शेजारील जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून एक चांगला अनुभव आपण घेतला आहे. या अनुभवाला अधोरेखीत करून पुढील निवडणुका अधिक चांगल्या भयमुक्त वातावरणात पार पडतील असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी निजामबादचे पोलीस आयुक्त कमलेश्वर शिंगेनावर यांनी सीमेवरील गावांचा आढावा सादर केला. याचबरोबर निर्मल, आदिलाबाद, बिदर, कामारेड्डी या जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी सीमावर्ती गावातून गुटखा, इतर बंदी असलेल्या पदार्थांची छुपी होणारी वाहतूक, निवडणूक काळात घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीचे संचलन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सादरीकरणाद्वारे नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती गावांचा आलेख ठेवला.

0000 










Saturday, February 3, 2024

 वृत्त क्र. 102

 

सारथी 4.0 संगणकीय प्रणाली

अद्ययावत करण्याचे काम सुरू  

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- सारथी प्रणाली 4.0 च्या सर्व्हरचे तांत्रिक कामकाज लवकरच पूर्ण होणार असून तद्नंतर अर्जदारांना सारथी प्रणालीवरून अर्ज करणे सुलभ होईल. सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागातर्फे नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

 

नागरिकांना अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्ती विषयक इतर सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4.0 प्रणालीवर अर्ज करणे व शासकीय शुल्क भरणे आवश्यक असते. परंतु मागील दोन दिवसपासून सारथी 4.0 प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे देखभाल / दुरुस्तीचे काम राष्ट्रीय सूचना केंद्रातर्फे सुरू आहे. त्यामुळे परिवहन विभागाची संगणकीय सारथी 4.0 प्रणाली संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अर्जदारांना काही अर्ज व तद्षनुंगीक शासकीय शुल्क भरताना अडचणी निर्माण होत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 वृत्त क्र. 101 

हौशी छायाचित्रकारांसाठी

क्लिक नांदेड छायाचित्र स्पर्धा

 

·    महासंस्कृती महोत्सवानिमित्त आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा च्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान व्हावे या उद्देशाने दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत "महासंस्कृती महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून महोत्सवाचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील विविध जैवविविधता, पर्यटनस्थळ, पशु-पक्षी, वनसंपदा, धबधबे, नदी, शिल्प, ऐतिहासिक स्थळे आदी विषयांना प्रतिबिंबीत करणारे क्लिक नांदेड छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

छायाचित्र स्पर्धेत पुढील विषय देण्यात येत आहेत. यात निसर्ग, पशु-पक्षी, शिक्षण, कला, स्थापत्य, जीवनशैली, खेळ, पर्यटन, खाद्यसंस्कृती, जैवविविधता, परंपरा, संस्कृतीवरील छायाचित्रांचा समावेश असावा. हे छायाचित्र  जानेवारी 2023 ते दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत काढलेले छायाचित्र असावेत. यासाठी पुढील नियमावली, अटी ठेवण्यात आल्या आहेत.

 

छायाचित्र नांदेड जिल्ह्यातीलच असावीत. प्रती छायाचित्र (IMAGE) जास्तीत जास्त 10 एमबी व कमीत कमी 03 एमबी ची छायाचित्रे ग्राह्य धरल्या जातील. स्पर्धकाने आपली छायाचित्रे clicknanded@gmail.com या ईमेलवर पाठवावीत. प्रत्येक छायाचित्रासोबत दोन ते तीन वाक्यात छायाचित्राबाबत मराठी भाषेत माहिती युनिकोड फॉन्टवर टाईप करुन पाठवावी. एका छायाचित्रकाराला स्पर्धेत दिलेल्या विषयासाठी एकुण 10 छायाचित्र देता येतील. आयोजकांतर्फे मुळ थीमशी जुळणारी त्यांची मूळ डिजिटल छायाचित्रे मागणी केली गेल्यास, स्पर्धकास ती सादर करावी लागतील. स्पर्धेत जानेवारी 2023 ते फोटो स्पर्धा सामिल होण्याच्या अंतिम तारखे पर्यंत काढलेली छायाचित्रच ग्राह्य धरल्या जातील. ब्लर झालेली छायाचित्रे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. DSLR आणि Mobil फोटोग्राफी या दोन्ही फॉर्ममध्ये स्पर्धक भाग घेऊ शकतात. ड्रोन द्वारे काढलेली छायाचित्र स्वीकारली जाणार नाही. छायाचित्र उच्च-रिझोल्यूशनचे जेपीजी JPEG किंवा पीएनजी PNG मध्ये असने आवश्यक आहे. फोटोवर कोणत्या प्रकारचा लोगो, वॉटर मार्क, कॉपीराईटमार्क,ओळखीचे चिन्ह, अथवा कोणतीही अन्य दृष्य स्वरुपाची बाब टाकता येणार नाही.

 

रंग, कॉन्ट्रास्ट, ब्राइटनेस ऍडजस्टमेंट आणि फोटो (चे) क्रॉप करणे यासह मूलभूत संपादन स्वीकार्य आहे, परंतु असे कोणतेही संपादन फोटोच्या सत्यतेवर आणि/किंवा वास्तविकतेवर परिणाम करत नाही. स्पर्धा सर्व वयोगटातील सर्व फोटोग्राफी प्रेमींसाठी खुली आहे. जिल्हा प्रशासन नांदेड यांना स्पर्धा आणि त्याच्या थिमशी सादर केलेली छायाचित्रे भविष्यात संबंधित प्रचारात्मक हेतूंसाठी वापरण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा अधिकार असेल. त्याबाबत भविष्यात कुठलीही आर्थिक अथवा मानधन स्वरुपाची मागणी, स्पर्धकास करता येणार नाही. छायाचित्रकार आणि कलाकारांचे तज्ञ पॅनेल सर्जनशीलता, तांत्रिक गुणवत्ता, रचना आणि थिमसह संरेखन यावर आधारित निवड करेल. निवड झालेल्या विजेत्यांना थेट जिल्हा प्रशासनाकडून निवडी बाबतकळविले जाईल. सर्व विषयातून प्रत्येकी एका विजेत्यांना जिल्हा प्रशासनाकडून गौरविण्यात येईल. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. अयोग्य वाटली जाणारी किंवा नमूद केलेल्या स्पर्धेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही प्रवेशास अपात्र ठरवण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे. स्पर्धक वय वर्षे 18 खालील असल्यास वरील अर्जावर पालकांची स्वाक्षरी त्यांचा आधार कार्ड नंबर सह नोंदविणे क्रमप्राप्त आहे. छायाचित्राचा मुळ हक्क हा छायाचित्र स्पर्धकाचा असून, संबंधीतछायाचित्र इतरत्र वापरण्याची मुभा छायाचित्रकारास असेल. छायाचित्रे पाठवण्याची अंतिम मुदत 12 फेब्रुवारी 2024 असेल. परिक्षेच्या निकालाबाबत सर्व अधिकार निवड समिती व जिल्हा प्रशासनाकडे राखीव राहतील. सर्व सहभागी छायाचित्र स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र प्राप्त होईल.

 

छायाचित्र स्पर्धेतील निकाल अंतीम करण्याचे / नाकारण्याचे सर्व हक्क आयोजन समितीचे राहतील. स्पर्धेचा विहित नमुन्यातील अर्ज नांदेड जिल्हाचे https://nanded.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात हौशी छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

निवड झालेल्या 100 छायाचित्रांचा समावेश प्रशासनामार्फत आयोजीत प्रदर्शन कालावधीत महासंस्‍कृती महोत्‍सवात लावण्यात येणाऱ्या प्रदर्शनीमध्ये करण्यात येईल. महोत्सव प्रदर्शनी पश्चात निवडक 100 छायाचित्रे विविध कार्यालयात प्रदर्शनी भागात लावण्यात येतील. निवड झालेल्या 100 छायाचित्रांना गौरविण्यात येईल व त्यामधील सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना विविध पारितोषिके देण्यात येतील.

00000

Friday, February 2, 2024

 वृत्त क्र. 100 

प्रादेशिक परिवहन कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान-2024 हे अभियान 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे आज रक्तदान शिबीराचे आयोजन केले होतेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी स्वत:रक्तदान करून उपस्थित नागरिकांना रक्तदान व रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. या शिबीरा कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व इतर नागरिक यांच्यासह जवळपास 41 जणांनी रक्तदान केले. 


डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेमूद व डॉ. जागृती यांनी उपस्थित नागरिकांना रक्तदानाचे महत्व सांगितले व सर्वांना स्वखुशीने रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी रक्तदात्यांना रक्तपेढीतर्फे प्रमाणपत्र व प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चहा-बिस्कीट व केळीचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मोटार वाहन निरीक्षक श्रीमती एस. एल. पोतदारश्रीमती रेणूका राठोडनिलेश चौधरीअमोल आव्हाड व कर्मचारी गाजुलवाडकेंद्रेकंधारकरशिंदे यांनी परिश्रम घेतले.

00000



वृत्त क्र. 99 

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे

17 फेब्रुवारी रोजी आयोजन

 

बेरोजगार महिला उमेदवारांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन    

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड या कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी शनिवार 17 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 10 वा. या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांनी या विशेष रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवावाअसे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

या रोजगार मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध नामांकित कंपन्यांनी आपली रिक्तपदे अधिसूचीत केली आहे. नांदेड जिल्हयातील ज्या काही इतर आस्थापनांना रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे अशा आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.in या वेबसाईटवर आपली रिक्त पदे अधिसूचित करावीम. याबाबत काही अडचण आल्यास 8830807312  या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

पुढील काही कंपन्यांनी आपली रिक्तपदे महास्वयम पोर्टलवर अधिसूचीत केली आहेत. मदुरा मायक्रो फायनान्स लि. नांदेड कंपनीत ट्रेनी केंद्र मॅनेजरच्या 10 पदांसाठी इयत्ता बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहेत. या पदांसाठी वेतन हजार रुपये असून नोकरीचे ठिकाण नांदेड राहील.

 

परम स्किल छत्रपती संभाजीनगर कंपनीत ट्रेनीच्या 150 पदासाठी इयत्ता दहावी/बारावी/आयटीआय/पदवी शैक्षणिक पात्रता असून 17 हजार रूपये वेतन राहील. या  पदांसाठी नोकरीचे ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे राहील.  

 

धृत ट्रान्समीशन छत्रपती संभाजीनगर कंपनीत ट्रेनी ऑपरेटरच्या 500 पदांसाठी इयत्ता दहावी/बारावी/ आयटीआय/पदवी ही शैक्षणिक पत्रता आवश्यक आहे. या पदांसाठी 12 हजार 500 रुपये वेतन असून नोकरीचे ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे राहील.

 

एल.आय.सी.ऑफ इंडिया नांदेड येथे इन्शुरन्स ॲडव्हायझरच्या 83 पदांसाठी इयत्ता दहावी/बारावी/पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी 15 हजार रुपये वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुके राहील.

 

जगदंबा सेंद्रीय कृषी सेवा केंद्र हदगाव येथे सेल्स एक्सुकेटिव्हच्या 15 पदांसाठी पदवी व संगणक उत्तीर्ण आवश्यक आहे. या पदांसाठी हजार रूपये वेतन असून नोकरीचे ठिकाण हदगाव राहील.

 

कैलास फर्टिलायझर नांदेड येथे डाटा ऑपरेटरच्या 20 पदांसाठी इयत्ता दहावी/बारावी/पदवी/संगणक उत्तीर्ण उमेदवारांसाठी हजार रुपये मानधन असून नोकरीचे ठिकाण नांदेड राहील.  

 

या रोजगार मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार महिला उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 98

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील

प्राप्त अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुषंगाने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांच्या रजिस्टर नोंदणी मोबाईल नंबरवर त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सदरचे करेक्शन असलेले मेसेज आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी सोमवार 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सदरच्या त्रुटीची पुर्तता करावी. दिलेल्या विहीत कालावधीनंतर त्रुटीची पुर्तता करुन घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजननिवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्थता उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी दिनांक 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000

वृत्त क्र. 97

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- अनुसुचित जमातीच्या विद्यार्थांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये सन 2024-2025 या वर्षात इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 पर्यंत राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनी अर्ज सादर करावेतअसे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले आहे.

 

प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड कार्यक्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत सन 2024-25 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यासाठी इच्छुक पालकांकडुन इंग्रजी माध्यम नामांकित निवासी शाळेत प्रवेश इयत्ता पहिली व दुसरीसाठी दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पासुन विद्यार्थ्यांचे अर्ज प्रकल्प कार्यालय किनवट (माहिती सेतु सुविधा केंद्र) व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांवर विनामुल्य उपलब्ध आहेत. येथुन अर्ज प्राप्त करुन घ्यावे. अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पुर्ण करुन परिपूर्ण अर्जच सादर करावेत. तसेच वरीष्ठ कार्यालयाकडुन मंजुरी दिलेल्या शाळांना व मंजुर संख्येनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

 

अर्जासोबत पुढील कागदपत्राच्या अटी व शर्ती पूर्ण करुन परिपूर्ण अर्ज सादर करावेत. सदर योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीच्या असावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे/विद्यार्थ्याचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या सांक्षांकित दाखल्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.जर विद्यार्थी दारिद्ररेषेखालील असेल तर यादीतील अनु.क्रमांकासह मुळप्रमाणपत्राचे प्रत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा दारिद्र रेषेसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न लक्ष इतके राहील. (तहसिलदार यांचे चालु वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडावे).

 

इयत्ता ली मध्ये प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय वर्ष पुर्ण असावे. पालकाचे संमतीपत्र व विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो व जन्मतारखेचा दाखला (अंगणवाडीग्रामसेवक) यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. विद्यार्थ्याचे वैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्याची तसेच विधवाघटस्फोटनिराधारपरितक्त्या व दारिद्र रेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाचे विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाईल. घटस्फोटीत यांनी कार्यालयीन निवाडयाची प्रत सोबत जोडावी.

 

विद्यार्थ्यांचे पालक शासकीय व निमशासकीय नोकरदार नसावेत. (नोकरदार नसल्याचे पालकांनी लेखी लिहुन द्यावी लागेल.) विद्यार्थ्याना वर्ग दुसरी प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्ज सादर करावयाचा दिनांक 15 फेब्रुवारी 2024 ते अर्ज स्विकारण्याचा शेवट दिनांक 15 मार्च 2024 पर्यतच राहील त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यास एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थित पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येत नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. या सर्वच अटीची पुर्तता करत असलेल्या पालकांनीच अर्ज सादर करावेत.

 

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे

अर्जदार विद्यार्थ्याचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो. पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र. पालकाचे जातीचे प्रमाणपत्र. उत्पन्नाचा दाखला. अंगणवाडीचा दाखला (पहिली इयत्तेसाठी) / ग्रामसेवकाचा दाखला. विद्यार्थ्याचा आधार कार्ड. विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दारिद्ररेषेखालील असल्यासबाबतचा दाखला/ग्रामसेवक दाखला. महिला पालक विधवा/घटस्फोटीत/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळाले आहे त्याच शाळेमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यत शिक्षण घेत असल्याबाबत हमीपत्र. याप्रमाणे प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड या कार्यालयात व या कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांवर विनामुल्य उपलब्ध आहेत. तेंव्हा आवश्यक कागदपत्रासह अचुक माहिती भरुन अर्ज दिनांक 15 मार्च 2024 पर्यंत या कार्यालयात (माहिती सेतु सुविधा केंद्र) येथे सादर करण्यात यावे. या निकषामध्ये बसणाऱ्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण घेण्याकरिता या कार्यालयाकडुन अर्ज मागवुन विद्यार्थ्यांची निवड करुनवरीष्ठ कार्यालयाकडुन प्रवेश देण्याबाबत शाळा नावाचे यादीसह आदेश प्राप्त होताच नामांकित निवासी शाळेत विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येईलअसेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी कळविले आहे.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...