Friday, September 16, 2022

 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा 

नांदेड, दि. 16 (जिमाका) :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 8.10 नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 8.15 वा. मोटारीने माता गुजरीजी विसावा उद्यान, नांदेडकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे आगमन व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 74 वा वर्धापन दिन समारंभास उपस्थिती. सकाळी 11.10 वा. मोटारीने नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 11.15 वा. विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

0000

 19 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड, दि. 16 (जिमाका) :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार दिनांक 19 सप्टेंबर 2022  रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 19 सप्टेंबर 2022  रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

***** 

 ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने

जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश 

नांदेड, दि. 16 (जिमाका) :- जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3, एफएल / बीआर-2 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहे. 

जिल्ह्यात  मतदानाचा पूर्वीचा दिवस शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 सपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 18 सप्टेंबर 2022 मतदानाच्या दिवशी सपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे.मतमोजणीचा दिवशी सोमवार दिनांक 19 सप्टेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. 

नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र देशी दारू नियमावली, 1973 चे नियम 26 (1) (सी) (2) व मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या ) नियमावली, 1969 चे नियम 9 ए (2) (सी) (2) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे.सदर आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.

00000

 मतदान व मतमोजणी क्षेत्रातील

आठवडी बाजार 18 व 19 सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश  

नांदेड (जिमाका) दि. 16 :- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक मतदानाच्या दिवशी रविवार 18 सप्टेंबर  रोजी निवडणूक हद्दीत व मतमोजणीच्या दिवशी सोमवार 19 सप्टेंबर 2022  रोजी मतमोजणी असलेल्या गावी / ठिकाणी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्टर, 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी निर्गमीत केले आहेत.  अशा गाव / ठिकाणांचे आठवडी बंद ठेवण्यास आणि अन्य दिवशी भरविण्यात यावेत असे आदेशात म्हटले आहे.

000000

Thursday, September 15, 2022

लम्पी रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी

लम्पी रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

-         जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी

 

§  पशुपालकांनी घाबरुन न जाता सूचविलेल्या उपाययोजनावर भर द्यावा

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- लम्पी साथरोगाचा शिरकाव जिल्ह्यातील नायगाव, देगलूर, नांदेड तालुक्यातील काही गावात झाला आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना व साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी मुबलक प्रमाणात लसीची मात्रा व जनजागृतीवर भर दिला आहे. पशुपालकांनी घाबरुन न जाता बाधा झालेल्या जनावरांना गोठयापासून दूर ठेवणे, गोठा स्वच्छ ठेवणे यावर भर देण्यास सांगितले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर पशूसंवर्धन विभाग लक्ष ठेवून असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष खुशालसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील मौजे कुंचली, देगलूर तालुक्यातील देगलूर शहर, नांदेड तालुक्यातील नांदेड शहर, गुंडेगांव, वडगांव, बोंढार तर्फे हवेली या गावातील पशुधनामध्ये लम्पी स्कीन आजार लागण झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील लम्पी स्कीन आजार लागण झालेली ही ठिकाणे बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. जिल्ह्यात लम्पी रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे पुढीलप्रमाणे मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या आहेत.

लम्पी रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून 5 कि. मी. त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करीत आहे. या परिसरातील गावांमध्ये बाधित जनावरे वगळता इतर जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. तसेच बाधीत गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चराईसाठी पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधित व अबाधित जनावरांना वेगळे बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त पशुधनाचा मृत्यु झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पध्दतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी. बाधित परिसरामध्ये स्वच्छता व निर्जंतूक द्रावणाची फवारणी करुन निर्जंतूकीकरण करावे. रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा, गोचिड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी. लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. बाधित पशुधनाची काळजी घ्यावी. कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक व्यक्ती, संस्था, प्रतिनिधी यांच्या विरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. सर्व खाजगी पदवीधारकांनी/पशुपालकांनी लम्पी स्कीन रोगाची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक राहील. लम्पी स्कीन रोगाचा उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसारच करण्यात यावा. खाजगी पदवीधारकांनी लम्पी स्कीन आजाराचा परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकिय संस्थानी लम्पी स्कीन रोगाच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधे वरिष्ठांशी चर्चा करुन उपलब्ध करुन घ्याव्यात, असेही प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000  

Wednesday, September 14, 2022

वृत्त क्र. 852

 विशेष गौरव पुरस्कारासाठी

माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिक / विधवा व त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विशेष गौरव पुरस्कारासाठी रविवार 18 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नर्तन, इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच देश / राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य इत्यादींना विशेष गौरव पुरस्कार आर्थिक स्वरूपात देण्यात येतो. 

राष्ट्रीय पातळीवर कामगिरीसाठी 10 हजार रुपये तर आंतरराष्ट्रीय पातळीसाठी 25 हजार रूपयांचा पुरस्कार, शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतूद माजी सैनिकांसाठी असलेल्या कल्याणकारी निधीमध्ये आहे. इयत्ता दहावी, बारावी परीक्षामध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून विभागात पहिल्या पाच मुलांमधून येणाऱ्या पाल्यासांठी व पदवी व पदव्युत्तरमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम येणाऱ्या माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्याना एक रक्कमी गौरव पुरस्कार 10 हजार रुपयासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व पात्र माजी सैनिकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क करावा असे, आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

Tuesday, September 13, 2022

 वृत्त क्र.  850 

उद्योग केंद्रातील विविध योजनेबाबत

मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवार / युवक व युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजनेबाबत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्यावतीने गुरुवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वा. मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. शेप स्किल अकॅडमीनृसिंह मंदिराजवळ कौठा रोडकौठानांदेड येथे जिल्हा उद्योग केंद्राचे लेखापरिक्षक बालाजी जायभाये हे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील युवक व युवतीनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02462-251674 क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

00000 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...