Wednesday, June 22, 2022

 माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

नांदेड (जिमाका) 22 :-  माजी सैनिकविधवा व सेवारत सैनिकांच्या पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली  आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/विधवा यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 वर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी  केले आहे. 

 

सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते.  सध्या हे प्रवेश फक्त सैनिक/माजी सैनिकांच्या पाल्यांकरिता उपलब्ध आहेत.  प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृहविष्णुपुरी, नांदेड येथे विक्रीस उपलब्ध आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावीअसेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.

0000 

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 12.8 मि.मी. पाऊस 


नांदेड (जिमाका) दि. 22:- जिल्ह्यात बुधवार 22 जून  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 12.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 87.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 


जिल्ह्यात बुधवार 22 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 37.3 (83.3), बिलोली- 0.6 (58.1), मुखेड- 1.4 (105), कंधार-1.5 (107.7), लोहा-1.2 (69.5), हदगाव-28.3 (74.5), भोकर- 3.7 (69.9), देगलूर-0.3 (128), किनवट- 18.5 (100), मुदखेड- 27.3 (130.7), हिमायतनगर-42.2 (96.3), माहूर- 4.5 (89), धर्माबाद- 7.6 (50.3), उमरी- 19 (100.7), अर्धापूर- 17.8 (64.5), नायगाव- 1.0 (51.4) मिलीमीटर आहे.

0000

 माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

नांदेड (जिमाका) 22 :-  माजी सैनिकविधवा व सेवारत सैनिकांच्या पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली  आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/विधवा यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 वर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी  केले आहे. 

 

सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते.  सध्या हे प्रवेश फक्त सैनिक/माजी सैनिकांच्या पाल्यांकरिता उपलब्ध आहेत.  प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृहविष्णुपुरी, नांदेड येथे विक्रीस उपलब्ध आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावीअसेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.

0000 

Tuesday, June 21, 2022

 श्री गुरूग्रंथसाहिब भवन येथे

भव्य प्रमाणात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा  

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- निरोगी आयुष्यासाठी योगाची साधना आवश्यक असून हा संदेश सर्व सामान्यापर्यत पोहचावा व नागरिकांनी अधिकाधिक आपल्या निरोगी आरोग्यासाठी योगाकडे वळावे या उद्देशाने आज श्री गुरूग्रंथसाहिब भवन नांदेड येथे आठवा आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नांदेड जिल्हा प्रशासन, पतंजली योग समिती, विविध संस्था यांच्या सहभागातून भव्य प्रमाणात साजरा झालेल्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, सौ. सविता बिरगे, गुरुद्वाराचे सहाय्यक अधिक्षक हरजितसिंग कडेवाले, डॉ. हंसराज वैद्य, जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस. मारावार, पंतजली योग समितीचे योग प्रसारक अनिल अमृतवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हा योगदिन अधिकाधिक व्यापक करण्यात आला. जिल्हाभर योगाभ्यासाच्या माध्यमातून सुदृढ आरोग्याचा संदेश पोहचावा व सहज करता येण्या योग्य अशा या महत्वपूर्ण आरोग्य साधनेशी लोक जुळावेत या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने या योग दिवसासाठी भव्य तयारी करण्यात आली होती. पंतजली योग समिती यांनी पुढाकार घेतलेल्या या समारंभास गुरुद्वारा बोर्डने सहकार्य केले. योगअभ्यासक अनिल अमृतवार यांनी उपस्थितांकडून योगाप्रात्याक्षिकाचे धडे दिले. आयुष मंत्रालयाने दिलेल्या शिष्टाचारानुसार योगक्रियेचा समावेश करण्यात आला होता. या समारंभात गुजराथी हायस्कुल, राष्ट्रीय गांधी हिंदी विद्या मंदिर, जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल, मनपा प्राथमिक शाळा, खालसा हायस्कूल, सचखंड पब्लिक स्कूल, आंध्रा समिती हायस्कूल या शाळेचे विद्यार्थी, एनसीसी स्काउट गाईडचे विद्यार्थी, विविध क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महारुद्र माळगे यांनी केले.

0000 







 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक 

दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची 23 जून 1894 रोजी स्थापना झाली. या दिवसाच्या स्मरणात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस व सप्ताह साजरा केला जातो. खेळाडूंना सर्वोकृष्ट बनविण्यासाठी ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात येतो. चालू वर्षे हे भारताचे अमृत महोत्सवी वर्षे म्हणुन साजरा करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका व ऑलिंपिक असोसिएशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन व सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

 

नांदेड जिल्हयात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन व सप्ताह 23 जून ते 28 जून या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहानिमित्त 23 जून रोजी सदृढ भारत ऑलिंपिक दौड, 24 जून रोजी सायकल रॅली, 25 जून  रोजी निबंध स्पर्धा- भारत ऑलिंपिकमध्ये काल, आज आणि उद्या, 26 जून रोजी चित्रकला स्पर्धा- भारतीय पुरातन खेळ व ऑलिंपिक, 27 जून,2022 रोजी विविध खेळांच्या जिल्हास्तर स्पर्धाचे आयोजन, 28 जून 2022 वक्तृत्व स्पर्धा- भारतीय ऑलिम्पीयन भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ, 29 जून रोजी ऑलिंपिक मशाल रॅली व या उपक्रमात सहभागी झालेल्या खेळाडूंना बक्षिस वितरण, प्रमाणपत्र वितरण, पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार व समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

नांदेड शहरातील शाळा / महाविद्यालयातील प्रत्येकी 50 खेळाडू मुले / मुली, विद्यार्थी शारीरिक शिक्षकासह या कार्यक्रमास उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी बालाजी जोगदंड पाटील 9420673394, 7020815826 व श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) 9657092794 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

 00000

 हमखास नोकरीची संधी देणाऱ्या तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरु 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन प्रथम वर्ष व बारावी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी थेट व्दितीय वर्ष तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असुन ही प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.  दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर हमखास यशाचा मार्ग म्हणजे तंत्रनिकेतन होय त्यातुन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या व उद्योगाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत, म्हणुन विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घ्यावा, असे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे. 

 

दहावीच्या गुणांवर तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्षास व बारावी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट व्दितीय वर्षास प्रवेश दिला जातो. त्यामुळे कमी कालावधीमध्ये एक उत्तम करिअर निर्माण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. तंत्रनिकेतन मधील व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय सुरु करता येतो. रेल्वे, संरक्षण दले, आरटीओ, भेल, महावितरण, दुरसंचार विभाग, पाटबंधारे विभाग, तंत्र शिक्षण विभाग इ. सरकारी, निमसरकारी क्षेत्राबरोबरच वाढत्या औद्योगिकीकरणाच्या आधुनिक काळात तंत्रनिकेतनमधुन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना खाजगी उद्योगक्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. तसेच बी.टेक, बी.ई., बी.आर्किटेक्चर, बी.एस्सी व्होकेशनल, बीबीए अशा  व इतर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासही विद्यार्थी पात्र ठरतो. अंतिम वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांना परिसर मुलाखती मधुन विविध नामांकित कंपन्यातर्फे नोकरीची संधी दिली जाते. मागील वर्षी मराठवाडयातील ग्रामीण व शहरी भागातील जवळपास 1130 विद्यार्थ्यांची निवड परिसर मुलाखती मार्फत झालेली आहे, अशी माहिती सहसंचालक श्री.उमेश नागदेवे, तंत्रशिक्षण विभाग, औरंगाबाद यांनी दिली आहे. 

          

औरंगाबाद विभागात शासकीय व अशासकीय असे एकुण 57 तंत्रनिकेतने असुन त्यांची 15,040 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. तंत्रनिकेतन मध्ये  प्रवेश घेणारा विद्यार्थी हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील तसेच मराठी माध्यमातील असल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा व अध्ययन अध्यापनासाठी मराठी माध्यमाचाही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासुन नियमात केलेल्या बदलानुसार कोणत्याही शाखेतुन आयटीआय उत्तीर्ण झालेला विद्यार्थी हा तंत्रनिकेतनमधील थेट द्वितिय वर्षाच्या सर्व शाखांसाठी पात्र राहील. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी तिस-या अतिरिक्त प्रवेश फेरीचा अंतर्भाव या वर्षी पासून प्रवेश प्रक्रिेयेत करण्यात आला आहे. कोव्हिडमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले आई व वडील गमावले आहेत व ज्यांच्याकडे " पीएम केअर्स  प्रमाणपत्र " आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन अतिरिक्त जागा अभ्यासक्रमनिहाय राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 

 

तंत्रनिकेतनमध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेतुन प्रवेश मिळणा-या विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेता येईल. प्रवेशासाठी लागणा-या विविध कागदपत्रांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने डॉ.अभय वाघ संचालक तंत्रशिक्षण यांनी प्रत्येक जिल्हातील जिल्हाधिकारी यांना पत्राव्दारे प्रवेशासाठी आवश्यक ती कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी विनंती केली आहे. 

 

या वर्षीची तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असुन विद्यार्थ्यांना ई-स्क्रुटीनी आणि प्रत्यक्ष स्क्रुटीनी पैंकी एका सुविधेचा पर्याय निवडून अर्ज भरता येईल. औरंगाबाद विभागात शहरी व ग्रामीण भागात 50 प्रवेश सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असुन त्याठिकाणी विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन तसेच नोंदणी अर्ज भरण्याची मोफत सुविधा करण्यात आली आहे. या सुविधांचा पालक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक श्री.उमेश नागदेवे, तंत्रशिक्षण विभाग, औरंगाबाद यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहिती व प्रवेश नोंदणी अर्जासाठी https://poly22.dte.maharashtra.gov.in/diploma22/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0240-2334216, 2334769 या क्रमांकावर संपर्क साधावा., असे आवाहन करण्यात आले आहे.

00000                                            

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा   

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय नांदेड येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  उत्साहात योगाभ्यास करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई  यांच्या आदेशान्वये प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी 7 वा. हा योगाभ्यास वर्ग घेण्यात आला. या कार्याक्रमासाठी योग शिक्षीका श्रीमती नंदीनी व प्रा. सुरेखा  घोगरे यांनी योगाभ्यास घेतला.

 

जिल्हा न्यायाधीश-1 एस. ई. बांगर, अति. जिल्हा न्यायाधीश ए.आर.धामेचा साहेब, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती के. पी. जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज, 4 थे दिवाणी न्यायाधीश क.स्तर श्रीमती बी.एम.एन.देशमुख मॅडम, यांनी यात सहभाग घेऊन योगाभ्यास केला. योगसाधक श्रीमती नंदीनी व घोगरे यांनी योग दिनाच्या निर्देशानुसार योगाभ्यास घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एम. गायकवाड यांनी केले तर आभार मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती के. पी. जैन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योग शिक्षक विधीज्ञ एच.आर.जाधव, विधीज्ञ कानोटे, नयुमखान पठाण, एस. ए. सौंदनकर, डी. जी. राठोड व न्यायालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

0000





पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...