Monday, April 27, 2026

 वृत्त क्रमांक 

नांदेड तालुका महसूल  प्रशासनाचा "शोध वंचित लाभार्थ्यांचा" विशेष उपक्रम

30 एप्रिल रोजी वाजेगाव येथे 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

नांदेड दि. 27 एप्रिल : नांदेड तालुक्यात महसूल विभागाने महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून "शोध वंचित लाभार्थ्यांचा" या नावीन्यपूर्ण विशेष उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ होणार आहे. नांदेड तालुक्यातील हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात लक्षवेधी ठरू शकतो.  

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्या सूक्ष्म नियोजनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नांदेड तालुक्यातील वाजेगाव महसूल मंडळातील वाजेगाव येथे राष्ट्रमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येत्या 30 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे. सदर शिबिराचे उद्घाटन नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिरात महसूल विभागाबरोबरच शासनाच्या विविध विभागाकडून लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. 

सदर शिबिराच्या माध्यमातून "शोध वंचित लाभार्थ्यांचा" या नावीन्यपूर्ण विशेष उपक्रम राबविला जात आहे.  शासनाच्या विविध योजनेची माहिती गाव पातळीवर देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही वंचित असणाऱ्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निराधार विधवा, दिव्यांग , वयोवृद्ध, दुर्धर आजार ग्रस्त, अत्याचारित महिला, परितक्त्या, अनाथ मुले, एकल महिला, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, घटस्फोटीत महिला आदी लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे अर्ज भरून घेऊन लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या उपक्रमात नायब तहसीलदार महसूल सुनील माचेवाड, स्वप्नील दिगलवार तसेच महसूल विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच अनुलोम, विहान या सामाजिक संस्था प्रयत्नशील असून विशेष कॅम्प आयोजित करून योजनेसाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. राज्यात महाराजस्व समाधान शिबिर सध्या चालू असून नांदेड मधील या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याने सदर उपक्रम लक्षवेधी ठरणार आहे.

00000

 वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 27 एप्रिल : नांदेड जिल्ह्यात 27 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 11 मे 2026 मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 27 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 11 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

वृत्त क्रमांक 

बुधवारी हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 27 एप्रिल :- नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून वैराग्यमूर्ती दत्ताबापू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय प्लेसमेट ड्राईव्ह/ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक तसेच शाळा व महाविद्यालय तसेच इतर खाजगी आस्थापनांमध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 29 एप्रिल 2026 रोजी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,  आनंदनगर रोड,  बाबा नगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674  यावर संपर्क साधावा, असेही आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

Saturday, April 25, 2026

 वृत्त क्रमांक 

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा नांदेड जिल्हा दौरा 

नांदेड दि. 25 एप्रिल :- राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे रविवार 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

रविवार 26 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 11.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने हदगावकडे प्रयाण. दुपारी 1.01 वा. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित सामुहिक विवाह मेळावा येथे उपस्थिती. स्थळ- पंचशिल माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा हदगाव. दुपारी 1.45 वा. हदगाव येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि. नांदेड येथे सदिच्छा भेट. स्थळ- तरोडा नाका पुर्णा रोड नांदेड. दुपारी 3.30 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 वृत्त क्रमांक 

खत टंचाई, लिकींग व काळा बाजार रोखण्यासाठी ‍जिल्हाधीकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर धडक तपासणी

नांदेड, २५ नांदेड:- खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नवीन मोंढा, नांदेड येथील वसुंधरा फर्टीलायझर्स कृषी निविष्ठा विक्री केंद्रास तसेच गोदामास भेट देवून साठा केलेल्या खताची तपासणी केली तसेच  श्री फर्टीलायझर्स कृषी सेवा केंद्र येथे अचानक भेट देऊन बाजारातील खते व बियाणे पुरवठा व विक्री संदर्भात माहिती घेतली. कृषी निविष्ठा विक्रेते यांचे परवाने, साठा रजिस्टर, इ-पॉस मशीनची तपासणी करून प्रत्यक्षात खताचा किती साठा आहे हे तपासले.

याबाबत कृषी निविष्ठा विक्रेते यांना इ-पॉस मशीन शिवाय खत विक्री करू नये तसेच खताची साठेबाजी करू नये अशा सूचना दिल्या. युरिया व डीएपीच्या विक्री बाबत जिल्ह्यातील सर्व कृषि क्रेंदाची खरीप हंगामपूर्व 100 टक्के तपासणी पूर्ण करण्याबाबत कृषि अधिकारी गुणनियत्रण तालुका नांदेड श्रीमती चातरमल यांना सुचना देण्यात आल्या. तसेच दर्शनी भागात फलक लावण्याबाबत सुचना दिल्या. ई-पॉस वरून खतांचा अहवाल काढून प्रत्यक्ष भौतीक साठ्यासोबत व साठा रजीस्टर सोबत जुळतो किंवा कसे याची पडताळणी केली. खत विक्रीच्या भौतीक बीलांची तपासणी केली व शेतकरी बांधवांनी प्रत्यक्षात ते खरेदी केल्याची खातरजमा केली. 

शेतकऱ्यांना दर्जेदार व योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध होत आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खत टंचाई, कृत्रीम साठेबाजी, लिकींग पद्धत व काळा बाजार होणार नाही यासाठी कडक सूचना दिल्या. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, खतांचा साठा लपून किंवा कृत्रीम टंचाई निर्माण करण्याऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. लिकींग पद्धतीने विक्री केल्यास व शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास तात्काळ परवाने निलंबीत करण्यात येतील असे स्पष्ट निर्देश दिले. ज्यादा दराने खत विक्री केल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले. शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. बनावट व निकृष्ट दर्जाच्या निविष्टा विरूद्ध शून्य सहनशिलता धोरण राबवीण्याचे स्पष्ट केले. कृषी निविष्टा गुणवत्ता नियंत्रणासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणेबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विकास अधिकारी अनिल कुमार ऐतवाडे विभागीय तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम तालुका गुणनियंत्रण निरीक्षक श्रीमती पुनम चातरमल, आरसीएफ जिल्हा प्रतिनिधी श्री. कापसे व इफको जिल्हा प्रतिनिधी श्री. घाडगे हजर होते.

००००००




 वृत्त क्रमांक 

जागतिक हिवताप दिन नांदेड येथे साजरा 

नांदेड :- आज दि.२५ एप्रिल " जागतिक हिवताप दिन " निमित्त नांदेड येथे जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ श्री अमृत चव्हाण,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत रिठे,शहर क्षयरोग अधिकारी डॉ बद्दीओदीन सर यांच्या हस्ते " जागतिक हिवताप दिन " महात्मा गांधी पुतळा पासुन ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. 

यावेळी सहाय्यक अधिक्षक विजय चव्हाण,आरोग्य पर्यवेक्षक संजय भोसले,गंगाधर गनलेवार, आरोग्य निरीक्षक माधव कोल्हे,सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, बालाजी निलपत्रेवार,अरुण आळणे, सुरेश आरगूलवार, मनोहर खानसोळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विलास नाईक, सचिव दळवी,राजु शेट्टे, वैभव कौशल्ये,आरोग्य कर्मचारी पुष्पराज राठोड, गणेश भुसा, प्रभाकर मुंगल, व्यंकटी बकाल,भारत हांम्पले, उत्तम कराड, व्यंकट मोरे, अनिल सुर्यवंशी,यासीन शेख,चंद्रभान धोंडगे,सुनिल बगाटे, विष्णूदास गलपवाड, संजय कळसे,रणखांब,पवार, देविदास पेंढारकर,भिमराव राठोड, शेख खलील, कैलास कुंटुरवार,परमेश्वर स्वामी मठदेवरु, लिपिक पांडुरंग बोरकर, क्षेत्र कर्मचारी यांच्यासह असंख्य कर्मचारी रॅलीत सहभागी होते. व्यंकटेश पुलकंठवार यांनी डास निर्मुलन प्रतिज्ञा देऊन रॅलीचा समारोप केला.
00000

 वृत्त क्रमांक 

उष्णेतेपासून कामगार वर्गाचे संरक्षण करणे ही मालकाची प्राथमिक जबाबदारी

नांदेड दि. 25 एप्रिल :- सध्या वाढत्या तापमानामुळे (Heat Wave परिस्थिती) दुपारी 12 ते सायं. 4 या वेळेत उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या तसेच कारखान्यातील, दुकानातील, हॉटेल्स मधील, खाद्यागृहे, आय टी कंपन्या, शॉपिंग मॉल्स, किरकोळ विक्रीची दुकाने, एमआयडीसी मधील उद्योगातील कामगार व इतर ठिकाणी काम करण्याऱ्या कामगारांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व आस्थापनांना याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णेतेपासून कामगार वर्गाचे संरक्षण करणे ही मालकाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना तात्काळ राबविणे सर्व आस्थापनांना बंधनकारक आहे.

दुपारी 12 ते 4 यावेळेत कामगारांकडून कष्टाची, शारीरिक श्रमाची कामे करून घेण्यात येऊ नयेत, यास्वरूपाच्या कामाच्या  वेळापत्रकात बदल करण्यात यावा किंवा अशी कामे बंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी.  कामगारांसाठी सावली (Shade), विश्रांती कक्ष उपलब्ध करून देण्यात यावा. कामाच्या ठिकाणी स्वच्छ थंड व मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता संबंधी सूचना तसेच  आपत्कालीन नंबर स्पष्टपणे प्रदर्शित करण्यात यावा. स्थानिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय ठेऊन उष्माघात सारखी प्रकरणे आढळल्यास तातडीने उपचार करण्याची सोय करावी.

या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा सहायक कामगार आयुक्त आशिष दिलीप ढवळे यांनी दिला आहे.

00000

  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ची प्रमुख वैशिष्ट्ये... #महाराष्ट्रशासन #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #MahaDGIP...