Saturday, April 18, 2026

वृत्त क्रमांक

नांदेडचा मथुरा- लभान गोवंश महाराष्ट्राचे पशुवैभव 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रा. डॉ. पंडित नांदेडकर यांचा गौरव   

नांदेड दि. 18 एप्रिल :- पशुवैद्यक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पंडित नांदेडकर यांना हरियाणातील करनाल येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत 'मथुरा-लभान गोवंश: महाराष्ट्राचा अभिमान' या विषयावरील सादरीकरणासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक नुकतेच मिळाले. या यशाबद्दल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आज गौरव करण्यात आला. 

पालकमंत्री अतुल सावे यांनी पशुसंवर्धन विभाग, परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व पशुपालक यांना मथुरा लभान गोवंश संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, डॉ.प्रवीणकुमार घुले व अधिकारी यांची उपस्थिती होती. 

याप्रसंगी डॉ. नांदेडकर यांनी नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीद्वारे 'मथुरा लभान गोवंशास राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पाची माहिती व त्यासंदर्भात किनवट तालुक्यात चालू असलेले कार्याचा आढावा सादर केला. 

डॉ.नांदेडकर यांनी मथुरा-लभान गोवंशाचे प्रजनन क्षेत्र हे महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर तालुक्यांमध्ये तसेच लगतच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळून येते. मथुरा-लभान गोवंश हा मथुरा, लभानी व बंजारा समुदायाकडे 300 पेक्षा अधिक वर्षापासून असल्याचे समजते. या गायी बहुतांशी पांढऱ्या रंगाच्या असून क्वचितच हलक्या राखेरी रंगामध्ये पहावयास मिळतात. त्वचा चमकदार व शरीराला घट्ट चिटकलेली असते. डोळे काळे व पाणीदार असतात. कपाळ रुंद व सपाट असते. चेहरा निमुळत्या आकाराचा असतो. सदर गायी या मध्यम बांध्याच्या असून शिंगे बाहेरच्या दिशेने वर जाऊन पुन्हा आतल्या बाजूने वळलेले असतात. कान मध्यम आकाराचे असून बाहेरील पृष्ठभाग राखाडी रंगाचा असतो. दोन्ही पायांमधील छातीचा भाग अरुंद असतो. छाती पोळ मध्यम आकाराची लटकलेली असते. शेपटी पायाच्या घोट्यापर्यंत लांब असून शेपटीचा गोंडा काळा व झुपकेदार असतो. गायीमध्ये कास मध्यम आकाराची शरीरास घट्ट चिकटलेली असून दुधाची शीर ठळक व सरळ असते. स्तन हे दंडगोलाकार असतात. गायी साधारणतः दिवसाकाठी १.५ - २ लिटर दुध देतात. या गायीचे तुपास अतिउच्च मागणी असून रुपये 3 हजार प्रती किलो प्रमाणे चढ्या दराने विकल्या जाते.

सर्व गायी वळूद्वारे नैसर्गिक पद्धतीने फळवल्या जातात व त्यामुळे या जातीचे शारीरिक गुणधर्म टिकून आहेत. या गोवंशाचे नर हे मादी पेक्षा आकाराने मोठे असतात. मथुरा लभान बैल हे प्रामुख्याने शेती व ओढकामासाठी वापरले जातात. हे गोवंश सूर्योदयापूर्वी जंगलात चराईसाठी एकत्र कळपाने सोडली जातात व सूर्यास्तापूर्वी वापस आणली जातात. चारा व पाणी यांच्या अभावामुळे उन्हाळ्यामध्ये हे गोवंश स्थलांतरित करून जून महिन्यात परत आणली जातात, असे सांगितले.  

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत असलेल्या पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय परभणी येथील पशु अनुवंश व पैदास विभागाचे प्राध्यापक डॉ. नांदेडकर यांना 8 एप्रिल रोजी हरियाणा राज्यातील करनाल येथील भा.कृ.अ.प.-राष्ट्रीय प्राणी अनुवंशिक संसाधन ब्युरो येथे आयोजित ‘राष्ट्रीय परिषद व पाळीव पशु संवर्धन सोसायटी’ च्या XXIII व्या वार्षिक अधिवेशनामध्ये ‘मथुरा लभान गोवंश-महाराष्ट्राचा अभिमान या विषयावर मौखिक सादरीकरणासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 

0000





No comments:

Post a Comment

विशेष लेख   ‘ सखी’ वन स्टॉप सेंटर माध्यमातून नांदेड येथे १ हजार १७५ महिलांना मिळाली मदत   घरगुती हिंसाचारापासून सामाजिक अन्यायापर्यंत ...