Thursday, February 12, 2026

 वृत्त क्र. 200



वृत्त क्र. 199

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

14 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

नांदेड दि. 12 फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रासाठी आपले सरकार सेवा केंद्र (सेतू) सुरू करण्याचा निर्णय जिल्हा सेतू समिती, नांदेड यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण 1 हजार 322 ग्रामपंचायतींमध्ये 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्रांना मंजुरी देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज प्रक्रिया 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 23 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

तसेच इच्छुकांनी दिलेल्या लिंकवर जाऊन आवश्यक माहिती अचूक भरून अर्ज सादर करावा. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवा सुलभ, पारदर्शक आणि जलदगतीने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आपले सरकार सेवा केंद्र मार्फत विविध दाखले, प्रमाणपत्रे, परवाने, शासकीय अर्ज, तसेच विविध ऑनलाईन सेवा गावपातळीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात वारंवार जावे लागणार नाही. यामुळे वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होणार आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवक-युवती तसेच दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. रिक्त गावांच्या एकूण जागांपैकी 5 टक्के जागा दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने देण्यात येणार आहेत. सदर जाहिरात, रिक्त गावांची यादी तसेच अटी व शर्तींबाबत सविस्तर माहिती नांदेड जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://nanded.gov.in उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

 

वृत्त क्र. 198

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

तांड्यांचा प्रवास समृद्धीच्या दिशेने’ प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

नांदेड, दि. 12 फेब्रुवारी : बंजारा व लमाण तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 24 तांड्यांना यापूर्वीच महसूली गावांचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आणखी 125 बंजारा/लमाण तांड्यांना महसूली गावांचा दर्जा देण्याची कार्यवाही सध्या जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या पुढाकारातून प्रगतीपथावर आहे.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे या योजनेकडे विशेष लक्ष असून त्यांच्या पुढाकारातून आतापर्यंत 24 तांड्यांना महसूली गावाचा दर्जा मिळाला आहे. संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना सातत्याने कार्यप्रवण करून या प्रक्रियेला गती देण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आयोजित कार्यशाळेत तांड्यांचे प्रस्ताव सादर करण्यापासून ते स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यापर्यंत करावयाच्या विविध कामांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. येत्या आठ दिवसांत 125 तांड्यांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, तहसीलदार विपीन पाटील, आनंद रहाटीकर, समन्वय अधिकारी उषा कदम तसेच विविध तालुक्यांतील नायब तहसीलदार, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्राम विकास अधिकारी असे 300 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

तांड्यांचे महसूली गावात रूपांतराचे फायदे :

मूलभूत सुविधा : रस्ते, अंतर्गत रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता सुलभ होणार.

स्वतंत्र ग्रामपंचायत : लोकसंख्येचा निकष पूर्ण करणाऱ्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळणार असून विकास प्रक्रियेत स्थानिक सहभाग वाढणार.

निधीची उपलब्धता : महसूली गावाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर विविध योजनांतर्गत निधीची मुबलक तरतूद होणार असून तांड्यांची समृद्धीकडे वाटचाल वेगाने होईल.

०००००






वृत्त क्र. 197

जिल्हा वार्षिक योजना 2026-27 च्या 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

जिल्ह्यासाठी 294 कोटींची अतिरिक्त निधी मागणी

नांदेड, दि. 12 फेब्रुवारी : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 अंतर्गत 506 कोटी 38 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्र व उपक्षेत्रांसाठी 294 कोटी रुपयांची अतिरिक्त निधी मागणी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही मान्यता देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार राजेश पवार, आमदार आनंदराव तिडके, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण आणि विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 506.38 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देताना अतिरिक्त मागणीबाबत शक्य तितका जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.

पालकमंत्री अतुल सावे यांनी नांदेड हा राज्यातील मोठा जिल्हा असून मागील वर्षी अतिवृष्टीमुळे रस्ते व पूल यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे नमूद केले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.

खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरातील विद्युत वाहिन्यांचे अंडरग्राऊंड केबलिंग, सामान्य शिक्षण, स्मशानभूमी आदी विकासकामांसाठी निधीची आवश्यकता अधोरेखित केली. मागील वर्षाच्या तुलनेत अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. आमदार राजेश पवार, श्रीजया चव्हाण, आनंदराव तिडके व बालाजी कल्याणकर यांनीही आपल्या मतदारसंघातील प्राधान्याच्या विकासकामांसाठी निधीची मागणी मांडली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सामान्य शिक्षण, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, लघु पाटबंधारे, परिवहन (रस्ते व पूल), विद्युत विकास, अपारंपरिक ऊर्जा, नगरविकास, वन पर्यटन/इको-टुरिझम तसेच मागासवर्गीय कल्याण या क्षेत्रांसाठी 294 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीबाबत सविस्तर सादरीकरण केले.

०००००









वृत्त क्र. 196

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत 

संसाधान व्यक्ती पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड दि. 12 फेब्रुवारी :- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत जिल्हा संसाधन व्यक्ती यांची सेवा विविक्षित कामांसाठी घेण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुकांनी अर्ज मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, आयजी कार्यालयाजवळ पद्मजासिटी रोड नवीन कौठा नांदेड येथे प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

संसाधान व्यक्ती या पदासाठी शैक्षणिक अर्हता सर्वप्रकारच्या पदवीधारकांना व ज्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे (डीपीआर) ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन वृद्धी, नवीन उत्पादन विकसित करणे, उत्पादांच्या गुणवत्तेची हमी, अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंर्भात तीन ते 5 वर्षाचा अनुभव किंवा बँकिंगक्षेत्रातील उमेदवारास प्राधान्य राहील. यासाठी एकुण 25 जागा भरण्यात येणार आहेत.

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासुची तयार करण्यात येणार आहे.   

संसाधन व्यक्तींना त्यांनी प्रत्येक लाभार्थ्यांना बँक कर्ज मिळवून देण्याच्यादृष्टीने जे सहाय्य केले त्यानुसार मोबदला दिला जाईल. संसाधन व्यक्तीस मंजुरीनंतर प्रती बँक कर्जासाठी 20 हजार रुपये देण्यात येतील. त्यापैकी 50 टक्के रक्कम ही बँक कर्ज मंजुरीनंतर व उर्वरीत 50 टक्के रक्कम संबंधित उद्योगास उद्योग आधार, जीएसटी नोंदणी, आधार नोंदणी, एफएसएसएआयची उत्पादन मानके दर्जा पूर्तता, उद्योगाची कार्यवाही व लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर अदा केली जाईल. याव्यतिरिक्त मार्गदर्शक सुचना, सविस्तर पात्रता परिश्रमिक व इतर (मानधन) अटी व शर्ती या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयात तसेच या योजनेच्या www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

वृत्त क्र. 195


जिल्ह्यात 14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

नांदेड दि. 12 फेब्रुवारी :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्यातर्फे   14 मार्च 2026 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्हयातील सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, धनादेश अनादरीत झाल्याबाबत प्रकरणे तसेच कौटूंबिक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे ईत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

याशिवाय सदर लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅकांचे कर्ज वसुली प्रकरणे, थकीत पाणीबिल ईत्यादी प्रकरणे तडजोडीव्दारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

 या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरूद्ध अपील नाही. प्रलंबित प्रकरणात भरलेली कोर्ट फीची रक्कम 100 टक्के परत मिळते. नातेसंबधात कटुता निर्माण होत नाही अशा प्रकारे लोक न्यायालयाच्या माध्यमातुन सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो. तरी सदर राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्मे यांनी केले आहे.

तसेच सर्व पक्षकारांना कळविण्यात येते की, त्यांनी तडजोडीसाठी येताना आपले अधिकृत ओळखपत्र सोबत  घेवून यावे. तरी सर्व संबंधित पक्षकारांनी दिनांक 14 मार्च 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा.

000000

वृत्त क्र. 194

राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

नांदेड दि. 12 फेब्रुवारी : प्रयोगशाळा सहाय्यकांचे तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक कौशल्ये, आरोग्यविषयक जाणीव, कार्यालयीन संवाद, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच सेवा नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच पार पडला.

शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथील प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. जानराव यांनी, आज येथे मिळालेले ज्ञान उद्या प्रत्यक्ष सेवेत उतरले, तरच या प्रशिक्षणाचा खरा उपयोग होईल, असे प्रतिपादन केले.

प्रशिक्षण शिबिरात आर्थिक साक्षरता, मानवी मूल्यांचे महत्त्व, जडसंग्रह नोंदवही, भावनिक, मानसिक व सामाजिक आरोग्य, शाश्वत विकास, प्रयोगशाळा सहाय्यकांची भूमिका, जबाबदाऱ्या व गुणवत्तापूर्ण सेवा, आरोग्यदायी जीवनशैली, आहार नियंत्रण व शिस्तबद्ध दिनचर्या यावर डॉ.मोहन मैड यांनी मार्गदर्शन केले. प्रभावी व कार्यालयीन संवाद कौशल्यांवर डॉ.योगिनी सातारकर, भावनिक, मानसिक व सामाजिक आरोग्य व प्रथमोपचार या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉ.मोहित सोलापुरकर, जडसंग्रह नोंदवही, भांडार पडताळणी व निर्लेखन या विषयावर प्रा.विजय उश्केवार, आरोग्यावर कामाचा ताण या विषयावर फिनिक्स हॉस्पीटलचे डॉ. अनंत सूर्यवंशी, कौशल्य विकासावर प्रा.अब्दुल हदी, तर संगणकाचा वापर व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर डॉ. संतोष चौधरी, प्रा. शीतल भोकरे व प्रा.नजमा इनामदार यांनी सखोल मार्गदर्शन केले. महाराष्ट्र नागरी सेवा नियम, कर्तव्ये, जबाबदाऱ्या व निवृत्ती लाभ याबाबत लक्ष्मण मु. जाधव यांनी सविस्तर माहिती दिली.

या प्रशिक्षणामुळे प्रयोगशाळा सहाय्यकांमध्ये आत्मविश्वास वाढला असून आरोग्य, शिस्त, वेळ व्यवस्थापन, तंत्रज्ञान व संगणक वापराबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाल्याचे प्रशिक्षणार्थींनी मनोगतातून व्यक्त केले. तसेच सेवा नियम, कर्तव्ये व निवृत्ती लाभ याबाबत स्पष्टता मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

सदर प्रशिक्षण शिबिर हे केवळ माहिती देणारे नसून प्रयोगशाळा सहाय्यकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, सेवाभाव वृद्धिंगत करण्यासाठी व कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरावे, अशी अपेक्षा प्रा. सुर्यकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली. सहभागी प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणातील मार्गदर्शन प्रत्यक्ष कामकाजात अंमलात आणण्याचा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयोगशाळा सहायक संघटनेचे अध्यक्ष बालाजी सरोदे, प्रा. सुर्यकांत कुलकर्णी, डॉ.संतोष चौधरी, गणेश नंदे, माधव हिवरे, प्रा.संजय कंधारे, प्रा.अभय  आढावे, प्रा.गणपत  डक, डॉ. अनघा जोशी, प्रा.अनुराधा साळुंके, डॉ.जयंत माळाकोळीकर, राहूल पोहरे, गणेश मंचेवार, ज्योती गलांडे, शंकर परोडवाड, सुभाष मुनेश्वर, विजय फुलवळकर, वैशाली पाशिमे, ज्ञानेश्वर वानखेडे, सुबोध झडते, श्रीमती पंचफुला कुरुडे, बाबाराव हुरदूके आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी सरोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सुर्यकांत कुलकर्णी यांनी केले. सदर प्रशिक्षणामुळे शिक्षण संस्थांमधील प्रयोगशाळा व्यवस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हा संपूर्ण कार्यक्रम तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, डॉ.सुनील भामरे, सहसंचालक डॉ. धनपाल कांबळे, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र, डॉ.किरण लाढाणे, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच प्रा.विजय उश्केवार यांच्या प्रेरणा व सहकार्यामुळे यशस्वीरीत्या साकार झाला. 

00000

  "    वृत्तपत्रीय टिप्पणी    "   "   शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य  चाच...