Sunday, March 29, 2026
विशेष लेख
डिजिटल प्रशासनाची नवी दिशा : नांदेड पोलीस परिक्षेत्राचा राज्यात अव्वल ठसा
महाराष्ट्र शासनाने प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविलेला 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम हा राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या उपक्रमात नांदेड पोलीस परिक्षेत्राने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत केवळ यश मिळवले नाही, तर आधुनिक प्रशासनाचा एक आदर्श नमुना निर्माण केला आहे.
मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात आलेल्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या मुल्यमापनात नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने राज्यातील सर्व परिक्षेत्रांत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. याबाबत शनिवार 28 मार्च रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झालेल्या बक्षीस वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे.
आजच्या डिजिटल युगात प्रशासनाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून सेवा अधिक जलद, अचूक आणि सुलभ पद्धतीने मिळाव्यात ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली नांदेड परिक्षेत्राने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणले.
ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये संकेतस्थळाचे आधुनिकीकरण हा एक महत्त्वाचा भाग ठरला. नव्याने विकसित केलेले संकेतस्थळ अधिक सुरक्षित, सुलभ आणि नागरिकाभिमुख बनविण्यात आले. विविध शासकीय योजना व सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आल्या, ज्यामुळे नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली.
‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यावर विशेष भर देण्यात आला. तक्रार नोंदणीपासून ते तिच्या निकाली काढण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यात आली. यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला.
ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करून कागदविरहित कामकाजाला चालना देण्यात आली. फाईल निपटारा जलद गतीने होऊ लागला, तसेच निर्णयप्रक्रियेत विलंब कमी झाला. इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्डच्या माध्यमातून अद्ययावत व अचूक माहिती उपलब्ध करून देण्यात आली, ज्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामकाजावर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य झाले.
नांदेड परिक्षेत्राची खासियत म्हणजे केवळ पारंपरिक सुधारणा न करता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. ‘संवेदना’ ही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित संगणकीय प्रणाली अर्ज चौकशीसाठी सुरू करण्यात आली, ज्यामुळे नागरिकांना तत्काळ माहिती मिळू लागली. ‘Eagle Eye’ प्रणालीद्वारे गुन्हे तपासावर बारकाईने लक्ष ठेवता येऊ लागले, तर ‘खबर’ हेल्पलाईनमुळे गैरप्रकार आणि अवैध व्यवसायांविरोधात नागरिकांना थेट तक्रार नोंदविण्याचे सशक्त माध्यम मिळाले.
याशिवाय तक्रारदारांच्या समाधानाची पातळी जाणून घेण्यासाठी फीडबॅक प्रणाली सुरू करण्यात आली, हीदेखील एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली. यामुळे सेवांची गुणवत्ता सातत्याने सुधारण्यास मदत झाली.
या सर्व उपक्रमांमुळे प्रशासन अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि कार्यक्षम बनले आहे. नागरिकांना सेवा देण्याची प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी झाली आहे. डिजिटल माध्यमातून संवाद वाढल्यामुळे प्रशासन अधिक विश्वासार्ह बनले आहे.
या यशामागे सक्षम नेतृत्वासोबतच संघभावना आणि सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले. पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी तसेच तांत्रिक तज्ज्ञ यांच्या समन्वयातून हा बदल शक्य झाला. सॉफ्टवेअर अभियंत्यांनी विकसित केलेल्या प्रणालींमुळे प्रशासनाच्या डिजिटल परिवर्तनाला गती मिळाली.
यापूर्वी 100 दिवसांच्या कृती आराखड्यात नांदेड परिक्षेत्राने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला होता. त्यामुळे सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्याची परंपरा या परिक्षेत्राने जपली आहे. 150 दिवसीय कार्यक्रमात मिळालेला प्रथम क्रमांक ही त्या प्रवासातील महत्त्वाची पायरी आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्राची ही यशोगाथा इतर शासकीय विभागांसाठी प्रेरणादायी ठरावी, अशी अपेक्षा आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर, प्रभावी नियोजन आणि नागरिककेंद्रित दृष्टीकोन यांच्या मदतीने प्रशासन अधिक सक्षम कसे होऊ शकते याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
भविष्यात अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि जनतेच्या अपेक्षांना पूरक ठरेल यात शंका नाही. नांदेड परिक्षेत्राने घालून दिलेला हा आदर्श राज्याच्या डिजिटल प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.
अलका पाटील
उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
000000
Saturday, March 28, 2026
विशेष वृत्त
150 दिवसीय ई - गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र अव्वल
मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सन्मान
नांदेड, दि.२८ मार्च:-मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात आलेल्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या मुल्यमापनात नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने राज्यातील सर्व परिक्षेत्रांत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
दिनांक 28 मार्च रोजी, मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झालेल्या बक्षीस वितरण समारंभात, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. तत्पूर्वी, श्री उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात केलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती आयोजित समारंभात दिली.
दिनांक 7 मे, 2025 रोजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन सुधारणा घडवून आणण्यासाठी 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते. सदर कार्यक्रमांतर्गत प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित व्हावे, या उद्देशाने विविध स्तरांवर व्यापक सुधारणा अपेक्षिल्या होत्या. यामध्ये संकेतस्थळ सुधारणा, आपले सरकार पोर्टल, ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, सोशल मीडिया एकत्रीकरण, व्हॉट्सॲपद्वारे सेवा वितरण तसेच नाविन्यपूर्ण वेब ॲप्लिकेशन या विषयांवर विशेष भर देण्यात आला होता.
त्यानुसार, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रासाठी संकेतस्थळ नव्याने तयार करून ते अधिक सुरक्षित व नागरिकाभिमुख केले होते. संकेतस्थळावर विविध शासकीय योजना व सेवांचे केलेले एकत्रीकरण, आपले सरकार पोर्टल अंतर्गत तक्रारींची विहित वेळेतील सोडवणूक, ई-ऑफिस प्रणालीद्वारे कागदविरहित व जलद फाईल निपटारा, इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्डद्वारे अचूक व अद्ययावत माहितीची उपलब्धता, याशिवाय, परिक्षेत्रातील अर्ज चौकशीच्या कामकाजासाठी सुरू केलेली ‘संवेदना’ ही AI आधारित संगणकीय कार्यप्रणाली, तक्रारदारांचे समाधान अजमावण्यासाठी दिलेली Feedback सुविधा, नांदेड परिक्षेत्रातातील गुन्हयांच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सुरू केलेली Eagle Eye ही प्रणाली व परिक्षेत्रातील गैरप्रकार व अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी सुरू केलेली हेल्पलाइन ‘खबर’ ( 91 50 100 100) या बाबी महत्त्वपूर्ण ठरल्या.
150 दिवसांच्या सदर कार्यक्रमाची मुदत दिनांक 10 जानेवारी, 2026 रोजी पूर्ण झाल्यानंतर, परीक्षेत्रीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन प्रथमतः पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात येऊन, त्यातून (4) परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक कार्यालयांची निवड करण्यात आली होती. यात, नांदेड परिक्षेत्रीय कार्यालयाची देखील निवड करण्यात आली होती. त्यानंतर परिक्षेत्र कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांनी केले होते. परिषदेने पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने केलेल्या उपरोक्त कामकाजाची दखल घेऊन परिक्षेत्रास प्रथम क्रमांक बहाल केला होता.
यापूर्वी, मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात देखील नांदेड परिक्षेत्र कार्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता.
परिक्षेत्र कार्यालयातील पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांचेसोबतच Rythmbytes कंपनीचे सॉफटवेअर इंजिनिअर हर्षानंद शर्मा, SETTribe कंपनीचे संचालक सारंग वाकोडीकर व सॉफटवेअर इंजिनिअर शहेबाज खान, पोलीस अंमलदार दिपक पवार यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमामुळेच हे यश शक्य झाले असून, या यशामध्ये नांदेड परिक्षेत्रातील प्रत्येक अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा वाटा आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे.
000000
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक / उपमहानिरीक्षक यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
वृत्त क्रमांक
जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस एजन्सीधारक व सेल्स ऑफिसर्स यांच्यासोबत बैठक संपन्न
गॅस वितरकांना महत्वाचे निर्देश ; प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
नांदेड दि. 28 मार्च:- जिल्ह्यातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गॅस कंपन्यांचे सेल्स ऑफिसर्स आणि गॅस एजन्सी धारकांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत गॅस वितरकांना अत्यंत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहे.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि सूचना:
होम डिलिव्हरी बंधनकारक: सर्व गॅस एजन्सी धारकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत
ग्राहकांना एजन्सीवर बोलावून गॅस देऊ नये. ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर 'होम डिलिव्हरी' देणे बंधनकारक आहे.तसेच ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर 'होम डिलिव्हरी' साठी काही अडचण आल्यास त्यांनी त्यांच्या तालुक्यातील खालील प्रमाणे निरीक्षण अधिकारी ( नायब तहसीलदार पुरवठा ) यांचेशी संपर्क करावा.
संपर्क मो.क्रं.:- नांदेड-७०३०७७३०४०, अर्धापूर-८८०५०६८९५४, मुखेड- ९३५६८०६४०५, धर्माबाद-९४२१८४१४४७,मुदखेड- ९४४५११२७८२,उमरी- ८८०५४४७८३७,बिलोली- ७६२०७७९७०६,लोहा-९६५७२२४०४२,हिमायतनगर- ८३०८०७३०८९, हदगांव-८८०५०६८९५४, कंधार-९८२३७५७३४५, माहूर-९४०३१८४४७३, किनवट-९८५०२९६०९६, भोकर- ९४२११८३६०२, देगलूर-९४२३८०५०६४,नायगांव- ७०५७००२८६५
एजन्सीवर गर्दी टाळा: ग्राहकांनी गॅस सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीवर गर्दी करू नये. बुकिंग केल्यानंतर लवकरात लवकर सिलिंडर घरपोच मिळेल, अशी चोख व्यवस्था करण्याचे आदेश वितरकांना देण्यात आले आहेत.
ग्राहकांना आवाहन: जिल्ह्यातील सर्व गॅस ग्राहकांना आणि लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी गॅस एजन्सीवर गोंधळ न घालता संयम राखावा. आपण गॅस बुक केल्यानंतर तो आपल्या दारात पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची आहे. प्रशासनाच्या या नियोजनाला नागरिकांनी सहकार्य करावे.
घरबसल्या करा e-KYC:ज्या ग्राहकांची बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (e-KYC) प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी गॅस एजन्सीवर जाण्याची आवश्यकता नाही. ग्राहक आपल्या मोबाईलवरून खालील पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात:
मोबाईल ॲपद्वारे: १. सर्वप्रथम प्ले-स्टोअरवरून 'Aadhaar Face RD (Early Access)' हे ॲप डाऊनलोड करा.
२. त्यानंतर तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप डाऊनलोड करा:
* Indane: IndianOil ONE
* Bharat Gas: Hello BPCL
* HP Gas: HP Pay
या ॲपमधील 'Aadhaar e-KYC' पर्यायावर जाऊन आपला चेहरा स्कॅन करून पडताळणी पूर्ण करा.
थेटलिंक: ग्राहक https://www.pmuy.gov.in/e-kyc.htmlया लिंकवर जाऊनही माहिती घेऊ शकतात.
तसेच बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करतांना काही अडचण आल्यास आपण खालील कंपनीच्या सेल्स ऑफिसर यांचे संपर्क साधावा.
मनोजकुमार राणा, सेल्स ऑफिसर BPCL, मो.क्रं. 9130084746
जय सिंघ, सेल्स ऑफिसर IOCL, मो.क्रं. 9561366893
सचिनकुमार, सेल्स ऑफिसर HPCL, मो.क्रं. 9594820665
तरी जिल्ह्यातील गॅस पुरवठा साखळी पूर्णपणे कार्यान्वित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक
विविध कृषि पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अर्ज करण्यासाठी ३१ मार्च अंतिम मुदत
नांदेड दि.२८ मार्च :- महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्य शासनातर्फे दरवर्षी कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट/संस्थेला पुरस्कार देण्यात येतो. उल्लेखनिय, अतिउल्लेखनिय कार्य करणारे तसेच राज्य, जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारे शेतकरी,व्यक्ती,संस्था, गटांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्यात दरवर्षी शेती, फलोत्पादन व पुरकक्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार, जिजामाता कृषीभुषण पुरस्कार, कृषीभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.
यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) कृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे.
सदर संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे.यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे विहित कालावधीत अर्ज करावा.
शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी दाखला प्राप्त करून घेण्यास १५-२० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे, त्याबरोबर Network issue, तांत्रिक अडचण यांमुळे शेतकऱ्यांना विहित मुदतीत अर्ज सादर करण्यास अडचण येत आहे. तसेच मार्च महिन्यात आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने कामकाज असल्यामुळे क्षेत्रीय यंत्रणाना प्रत्यक्ष पडताळणीसाठी देखील कालावधी आवश्यक आहे. यामुळे शेतकरी स्तरावरून व क्षेत्रीय स्तरावरून दूरध्वनीद्वारे सदरची मुदत वाढवून मिळणेबाबत होत असलेल्या विनंतीच्या अनुषंगाने केवळ सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार सादर करणेसाठी सुधारीत नियोजन पुढीलप्रमाणे राहील.
सन 2025 सुधारित कालावधी
अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरणे. सहाय्यक कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा ऑनलाईन अर्जाची छाननी करून, समक्ष भेट देऊन अनुषंगिक बाबींची पूर्ततेची कार्यवाही करून तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे.तालुका कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा ऑनलाईन अर्ज छाननी, समक्ष भेट, सहाय्यक कृषी अधिकारी यांचे अभिप्राय यांची प्रत्यक्ष पडताळणी करून जिल्हास्तर समितीकडे अर्ज सादर करण्याचा सुधारित कालावधी 31 मार्च 2026 अखेर राहील.
जिल्हास्तर समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, समक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारशीसह अर्ज विभागस्तरीय समितीकडे सादर करण्याचा कालावधी 10 एप्रिल 2026 अखेर असेल.
विभागस्तरीय समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, समक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारस केलेले परिपूर्ण व निकषाप्रमाणे पात्र प्रस्ताव विभागस्तरीय समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तासह कृषी आयुक्तालयास सादर करण्यासाठी कालावधीत 25 एप्रिल 2026 अखेर पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.
आयुक्त कृषी यांनी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गटांना सन 2025 पासूनचे विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करण्याबाबत आवाहन केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ आपला अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
00000
" वृत्तपत्रीय टिप्पणी " " शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाच...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...

.jpeg)


.jpeg)