Wednesday, April 1, 2026

वृत्त क्रमांक  

किनवट तालुक्यातील थारा येथे ‘महारेशीम अभियान’ नोंदणीचा शुभारंभ; 

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - जेनीत चंद्रा दोन्तुला

नांदेड, दि. 1 एप्रिल :- किनवट तालुक्यातील थारा येथे ‘महारेशीम अभियान’ नोंदणीचा शुभारंभ सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रेशीम शेतीसाठी नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर न थांबता वस्त्रोद्योगाशी जोडले जाणे आवश्यक आहे. शेतीत उद्योगाचा समावेश करून शेतकऱ्यांना उद्योजक बनविणे हे शासनाचे धोरण असून, रेशीम उद्योग हा त्यासाठी अत्यंत फायदेशीर पर्याय आहे.

कार्यक्रमास जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, क्षेत्र सहायक रेशीम कांचन जाधव, सहायक संचालक प्रवीण भुरके, प्रगतशील शेतकरी कपील सोनटक्के तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला पुढे म्हणाले की, या अभियानाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास शासनस्तरावर अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. वैयक्तिक स्तरावरही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात व आवश्यक त्या अनुदानासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.

नगदी पीक म्हणून रेशीम शेतीकडे वळा – अशोक वडवळे

जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी सांगितले की, पोकरा, मनरेगा व ‘सिल्क समग्र’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकरी चार लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. समूहाच्या माध्यमातून रेशीम शेती केल्यास अधिक फायदा होऊन बाजारपेठेतही स्थिर उत्पन्न मिळू शकते.

शेतकऱ्यांनी 5 एप्रिल 2026 पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी. उत्पन्नवाढ व वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रेशीम शेतीसाठी लागणारी सर्वतोपरी मदत रेशीम संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व अनुदानाबाबत माहिती दिली.

00000




वृत्त क्रमांक  

अनुज्ञप्तीविषयक शिबिराचे 3 ऐवजी 2 एप्रिलला कंधार येथे आयोजन

शिबिराच्या दिवशी अनुज्ञप्तीधारकांनी आपली कामे करुन घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 01 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियोजीत एक दिवशीय अनुज्ञप्तीविषयक कामकाजाचे शिबिर कंधार येथे 3 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेले होते. परंतु शुक्रवार 3 एप्रिलला गुड फ्रायडे निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे अनुज्ञप्तीविषयक शिबिर गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सर्व नागरिक, अनुज्ञप्तीधारक अर्जदार यांनी यांची नोंद घ्यावी व कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे. 

तरी कंधार येथील एक दिवशीय अनुज्ञप्ती विषयक कामकाजाचे शिबिर 2 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. सर्व नागरिकांनी/अनुज्ञप्तीधारकांनी आपली सर्व कामे शिबिराच्या दिवशी उपस्थित राहून करुन घ्यावीत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे. 

00000

वृत्त क्रमांक  

सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका ; अर्ज 30 एप्रिलपर्यंत करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 01 एप्रिल :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 83 व 88 अन्वये सहकारी संस्थांच्या चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यात येत आहे. यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेले (वय 70 वर्षे पूर्ण न झालेले) अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, वकील तसेच सनदी लेखापाल यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, लातूर येथे तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर/धाराशिव/बीड/नांदेड व संबंधित जिल्ह्यांतील सर्व उपनिबंधक व सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत.

हे अर्ज 01 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्राप्त होऊ शकतात. संबंधित पात्र व्यक्तींनी परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत संबंधित कार्यालयात सादर करावेत.

याबाबतची सविस्तर सूचना संबंधित कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे आवाहन प्रवीण फडणवीस, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी केले आहे.

००००००

वृत्त क्रमांक  

मोटार सायकल वाहनांसाठी नवीन मालिका सुरु

पसंतीक्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 01 एप्रिल :- परिवहनेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26- डीबी ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे. त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक व ईमेलसह अर्ज 2 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2.30 पर्यत स्विकारण्यात येणार आहेत. अर्जासोबत संबंधीत पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डीडी) सुध्दा सादर करावा. विहित केलेल्या दिनांक व वेळेनंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत यांची नोंद घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

ज्या पसंतीक्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्‍त झाल्यास 2 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता दुरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 

00000

वृत्त क्रमांक  

दहावी-बारावी विद्यार्थ्यांना एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्र; दुरुस्तीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

नांदेड, दि. 01 एप्रिल :- फेब्रुवारी-मार्च 2026 पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता एकत्रित स्वरूपात देण्यात येणार आहेत.

या एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे पहिले नाव, वडिलांचे नाव व आडनाव यामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित दुरुस्ती ऑनलाईन पद्धतीने करून घेणे आवश्यक आहे. जर अशी दुरुस्ती अद्याप केलेली नसेल, तर ती मंडळामार्फत तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, फेब्रुवारी/मार्च 2026 च्या प्रवेशपत्रावरील छायाचित्र अस्पष्ट असल्यास त्यावर योग्य फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी घेण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांचे फोटो दुरुस्त करण्यात आले आहेत, त्यांची माहिती अचूकपणे एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर छापण्यासाठी संबंधित फोटो पुन्हा अपलोड करणे आवश्यक आहे.

यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर “फोटो करेक्शन” ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या लिंकद्वारे फोटो दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी.

निर्धारित कालावधीनंतर कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक   किनवट तालुक्यातील थारा येथे ‘महारेशीम अभियान’ नोंदणीचा शुभारंभ;  शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - जेनीत चंद्रा दो...