Saturday, January 31, 2026

📍लोकभवन, मुंबई 


#शपथविधी सोहळ्याचे #थेटप्रसारण ...

#LIVE


खालील लिंक्सद्वारे थेट प्रसारण पाहा..


YouTube - https://youtu.be/TNN09Gj0NA8


X (Twitter) – https://x.com/i/broadcasts/1ypKdqkBRenGW 


Facebook – https://www.facebook.com/share/v/16LxkvWA6z/


Friday, January 30, 2026

वृत्त क्र. 153

पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व विक्रीचे ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान आयोजन

लोकमान्य मंगल कार्यालयात सकाळी ११ ते सायं. ७ पर्यंत प्रदर्शन खुले

नांदेड, दि. ३० जानेवारी :- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथील लोकमान्य मंगल कार्यालय येथे दि. ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांकडे पीएम विश्वकर्मा आयडी असणे अनिवार्य असून, पात्र लाभार्थ्यांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रदर्शन व विक्री उपक्रमातून १८ प्रकारच्या पारंपारिक कारागीर व शिल्पकारांना लाभ मिळणार आहे. यामध्ये कारपेंटर, नाव बनविणारे कारागीर, शस्त्र बनविणारे, मूर्तिकार, मोची, कुंभार, लोहार, कुलूप बनविणारे, हातोडा व टूलकिट तयार करणारे, सोनार, राजमिस्त्री, डाळ बनविणारे, चटई व झाडू बनविणारे, मालाकार, धोबी, टेलर, बाहुली व खेळणी बनविणारे तसेच मासोळीचे जाळे तयार करणारे कारागीर यांचा समावेश आहे. या कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री येथे करण्यात येणार आहे.

या प्रदर्शनासाठी नागरिकांसाठी प्रवेश पूर्णतः मोफत असल्याची माहिती एमएसएमई विकास कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या माहिती शाखेने दिली आहे.

अधिक माहितीसाठी

गौरव यादव – ८६००८४२६०१,

नीरज कुमार देशपांडे – ७०५३१२५५९१,

के. जे. कांबळे – ८४२१५९२९९५,

राजकुमार – ८२९८६३२१४५

यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

0000




 वृत्त क्र. 152

शासकीय तंत्रनिकेतन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त परिसंवाद संपन्न

नांदेड, दि. ३० जानेवारी :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त परिसंवाद कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनुश्री केंद्रे, मोटार वाहन निरीक्षक हेमंत साळुंखे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रेणुका राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व, प्रशासकीय जबाबदाऱ्या तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत सखोल माहिती देण्यात आली. रस्ता सुरक्षा, नागरिकांशी संवाद, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रामाणिक प्रशासन यांचे महत्त्व अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले.

तसेच स्पर्धा परीक्षा, प्रत्यक्ष कामातील अनुभव आणि भविष्यातील करिअर संधी यावरही विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समाधानकारक उत्तरे दिली.

या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एल. कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. बैठक व्यवस्था प्रा. एस. जी. अन्नमवाड यांनी केली, तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. बी. बी. कपूर यांनी केले.

कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या क्विझ स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना आरटीओ कार्यालयाकडून मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने मार्गदर्शक अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

00000

Thursday, January 29, 2026

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंत्यदर्शन थेट प्रक्षेपण (Live)

लिंक | क्लिक👉 https://www.youtube.com/live/dy5Td1fzJ-w

वृत्त क्र. 150

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड दि. 29 जानेवारी :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,  पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.

00000

Wednesday, January 28, 2026

 वृत्त क्र. 151

भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेत

 इच्छुक शेतमालकांनी शेत विक्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 29 जानेवारी :- जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत भुमिहीन दारिद्ररेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती (कोरडवाहु) किंवा २ एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करुन देणे ही योजना राबवायची आहे. 

तेव्हा नांदेड जिल्ह्यातील (प्राधान्याने किनवट व माहूर तालुका) येथील इच्छूक शेतमालकांनी आपला  शेत विक्रीसाठी आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. भुवायो-2018/प्र.क्र.127/का-14 दि. 28 जुलै 2021 मधील परिच्छेद क्र. 02 व परिशिष्ठ-ब नुसार शेती विकणेसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जि. नांदेड येथे माहिती सुविधा केंद्रामध्ये परिपूर्ण अर्ज, आवेदन पत्र भरणा करावे तसेच आपले अर्ज, आवेदन सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनितचंद्रा दोन्तुला यांनी केले आहे. 

इच्छूक शेत मालकांना शेत विक्रीसाठी अर्ज, आवेदन करण्यासाठी असून, या योजनेअंतर्गत शेत मिळविण्यासाठी लाभार्थ्यांसाठी अर्ज, आवेदन नाही याची नोंद घ्यावी असेही प्रसिध्दीप्रत्रकात कळविले आहे. 

00000

 राज्याचे 'खंबीर नेतृत्व', मराठवाड्याचा 'आधारवड' कोसळला!

प्रशासनावरील ज्यांची ‘वचक’, कामाचा ‘उरक’ पाहून अधिकारीही थक्क व्हायचे, असे संपूर्ण राज्याचे खंबीर नेतृत्व आज हरपले. अजित (दादा) पवार केवळ एका जिल्ह्याचे मर्यादित नेतृत्व नव्हते, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून राज्याचा गाडा समर्थपणे हाकत. ते राज्याचे नेते होतेच, पण त्याही पलीकडे जाऊन मराठवाडा विभागावर त्यांचा विशेष लोभ होता. दादा मूळचे पश्चिम महाराष्ट्राचे, पण धाराशिव त्यांचे सासर. त्यामुळे मराठवाड्याचे 'जावई' म्हणून त्यांचा या भागावर जीव होताच, पण बीड जिल्ह्याचे 'पालकमंत्री' म्हणून त्यांनी जिल्ह्याला पितृवत प्रेम दिले.

तखत श्री हजूर अबचलनगर साहिब जी गुरुद्वारातील ती 'अखेरची' भेट 

अवघ्या दोन दिवसांपूर्वी, २५ जानेवारीला दादा मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर, नांदेडच्या पवित्र भूमीत होते. नांदेड येथील 'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब'  गुरुद्वारात ते नतमस्तक झाले.  सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पवित्र गुरुद्वारात अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेतले. 'कडा प्रसाद' ग्रहण केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. दर्शन झाल्यानंतर ते गुरुद्वारा परिसरात थांबले.  'तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब'जीं चे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेऊन, बाहेर येईपर्यंत दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाट पाहत होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर सर्व मंत्री महोदय यांनी पवित्र गुरुद्वारातून एकत्रितपणे ऐतिहासिक 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शताब्दी समागम कार्यक्रमासाठी मोदी मैदानाकडे प्रस्थान केले. राज्याचे नेतृत्व म्हणून ज्येष्ठता आणि पदाचा मान राखण्याची त्यांची ही कृती सर्वांनाच भावली. गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सन्मान केला.

पालकमंत्र्यांचा 'धडाका' आणि 'विश्वविक्रम' 

एकीकडे नांदेडमध्ये ते अध्यात्मात रमले होते, तर दुसरीकडे बीडमध्ये त्यांनी विकासाचा विक्रम रचला होता. १ जानेवारी २०२६ ला वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बीडमध्ये एकाच वेळी १३६३ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून प्रशासनालाही अवाक केले होते.

केवळ इमारती नाहीत, तर निसर्गाशी नाते जोडत त्यांच्याच उपस्थितीत बीडमध्ये एकाच दिवशी ३० लाखांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. याची नोंद 'वर्ल्ड रेकॉर्ड' (India Book of Records) मध्ये झाली. तरुणांवर त्यांचे विशेष प्रेम होते, म्हणूनच खेळाडूंसाठी क्रीडा विभागाचा २५ कोटींचा निधी मंजूर करून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'टर्फ ग्राउंड' बीडकरांना दिले.

सहकार आणि अर्थाची जोड 

प्रशासकीय शिस्तीचे भोक्ते असलेल्या दादांनी बीडमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विभागाच्या भव्य 'सहकार संकुला'चे भूमिपूजन केले. सर्व सहकारी कार्यालये एकाच छताखाली असावीत, हा त्यांचा आग्रह होता. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री या नात्याने त्यांनी बीडच्या विकासाला कधीच निधी कमी पडू दिला नाही. १७ सप्टेंबर २०२५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अहिल्यानगर-बीड’ रेल्वेचे उद्घाटन झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २ हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणि ऐनवेळी दिलेले १५० कोटी रुपये, ही अर्थमंत्री म्हणून दादांनीच मंजूर केले होते.

 हृदयाची काळजी घेणारे 'दादा' 

बीड जिल्हा रुग्णालयात 'कार्डियाक कॅथलॅब' देऊन त्यांनी गोरगरिबांच्या हृदयाची सोय केली. दुर्दैवाने, बीडकरांच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या पालकमंत्र्यांचे हृदय मात्र आज थांबले.

एकीकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे सुकाणू समर्थपणे सांभाळणारे 'वित्त व नियोजन मंत्री' आणि दुसरीकडे बीडच्या प्रत्येक प्रश्नावर बारकाईने लक्ष घालणारे 'पालकमंत्री'... अशी दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पेलली. धाराशिवचे जावई आणि बीडचे पालक असलेल्या या विकासपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली!

- डॉ. श्याम टरके

सहायक संचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय, लातूर.








वृत्त क्र. 149

एमएच २६ - डीए नवीन मोटारसायकल नोंदणी मालिका लवकरच सुरू

पसंती क्रमांकासाठी 29 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार

नांदेड, दि. २८ जानेवारी:- परिवहनेतर संवर्गातील मोटारसायकल वाहनांसाठी MH26-DA ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेअंतर्गत पसंती क्रमांक घेण्यासाठी अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पसंती क्रमांकासाठी इच्छुक अर्जदारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्ज 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जासोबत संबंधित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डी.डी.) सादर करणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

विहित केलेल्या दिनांक व वेळेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच एखाद्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, संबंधित अर्जदारांना 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात येईल.

तरी पसंती क्रमांक घ्यावयाच्या इच्छुक वाहनधारकांनी वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

०००००

वृत्त क्र. 148

हमीभावाने तूर खरेदीसाठी २० जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी

नांदेड जिल्ह्यात २३ खरेदी केंद्रे निश्चित - जिल्हा पणन अधिकारी

नांदेड, दि. 28 जानेवारी:- केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ साठी तूर पिकाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची २० जानेवारी  ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात एकूण २३ खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तरी शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी आर. जी. गव्हाणे यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात खालील खरेदी केंद्रांवर मार्केटिंग फेडरेशनमार्फत तूर पिकासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

तालुका खरेदी-विक्री संघ मुखेड / हदगाव / बिलोली (कासराळी) / लोहा, कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कुंडलवाडी, नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी संस्था, अर्धापुर, पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सहकारी संस्था, देगलूर, बळीराम पाटील फळे व भाजीपाला सहकारी खरेदी-विक्री संस्था, बेरळी, मुखेड फळे व भाजीपाला सहकारी खरेदी-विक्री संस्था, उमरदरी, किनवट तालुका कृषीमाल प्रक्रिया सहकारी संस्था, गणेशपूर (ता. किनवट), जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी-विक्री सहकारी संस्था, कौठा, स्वामी विवेकानंद अभिनव सहकारी संस्था, शेळगाव थडी (ता. धर्माबाद), अष्टविनायक शेतीमाल खरेदी-विक्री सहकारी संस्था, मानवाडी फाटा (ता. हदगाव), महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ, बापशेटवाडी (मुक्रामाबाद), शेतकरी उत्पादक कंपनी, रातोळी / बेटमोगरा, पांडुरंग फळे व भाजीपाला सहकारी संस्था, धामनगाव, बळीराजा पणन अभिनव सहकारी संस्था, कोठारी (ता. किनवट), श्रीराम जानकी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ, सगरोळी (ता. बिलोली), चक्रधर फळे व भाजीपाला सहकारी संस्था, बिल्लाळी (ता. मुखेड), स्वामी विवेकानंद अभिनव नाविन्यपूर्ण सहकारी संस्था, देगलूर, स्व. प्रमोद महाजन अभिनव नाविन्यपूर्ण सहकारी संस्था, पाळा (ता. मुखेड), जगदंबा विद्याप्रसारक मंडळ, बाऱ्हाळी (ता. मुखेड)याप्रमाणे आहेत. 

तरी शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणीसाठी चालू हंगामातील तूर पिकाची ऑनलाईन नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक ही आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर सादर करावीत. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने POS मशीनद्वारे करण्यात येणार असल्याने नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी आर. जी. गव्हाणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

०००००

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

दादा गेले !

जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.

मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. 

थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन
राज्यात तीन दिवस दुखवटा

मा. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र यांचे आज दिनांक 28.01.2026 रोजी विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे, त्यामूळे दिनांक 28.01.2026 ते दिनांक 30.01.2026 या कालावधीत राज्यभर दुखवटा पाळण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी दररोज नियमीत राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो त्या ठिकाणी दिनांक 28.01.2026 ते दिनांक 30.01.2026 या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्यात आला आहे.

सदर कालावधीत नांदेड जिल्हयात कोणतेही मनोरंजनाचे शासकीय कार्यक्रम आयोजीत करण्यात येवु नयेत. दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. दिनांक 31.01.2026 रोजीपासुन राष्ट्रध्वज पुर्ण फडकविण्यात यावा , असे कळविण्यात आले आहे.
00000

Tuesday, January 27, 2026

वृत्त क्र. 147

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार ‘महा पाणलोट प्रकल्प’
नांदेड, कंधार, किनवट, लोहा, मुखेड, हदगाव तालुक्यांचा समावेश

नांदेड दि. 27 जानेवारी :- जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, त्यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पनात भर पडावी. तसेच ग्रामपंचायतींचे बळकटीकरण व्हावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात प्रभावशाली ‘महा पाणलोट प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्यातील नांदेड, कंधार, किनवट, लोहा, मुखेड, हदगाव तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ॲक्सिस बँक फाऊंडेशन, भारत ग्रामीण जीविका फाऊंडेशन व मनरेगा यांच्यात परस्पर सहकार्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यातील 26 तालुक्यांमध्ये प्रभावशाली महा पाणलोट प्रकल्प (हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प महाराष्ट्र) राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश, ग्रामपंचायतींनाचे बळकटीकरण करून कामांचे नियोजन, संनियत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीना सहयोग करण्यासाठी भारत ग्रामीण जिविका फाऊंडेशनच्या वतीने 10 नागरी सामाजिक संघटनांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक संघटना दोन तालुक्यांमध्ये काम करणार आहे. हे प्रकल्प 5 वर्षापर्यंत राबविण्यात येईल.

या प्रकल्पांतर्गत 26 तालुक्यांमध्ये एकूण 878 मायक्रो वॉटरशेडचा विकास करणे आहे –त्या माध्यमातून 4.39 लक्ष हेक्टर जमिनीचे उपचार करणे त्याचबरोबर खालील प्रमाणे उद्दिष्टे ठरविण्यात आले आहेत.
यात कमीत कमी एक लक्ष शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, जवळपास 1.77 लक्ष हेक्टर असिंचित जमीन सिंचीत करणे, 800 ग्रामरोजगार सेवक व 6 हजार बचत गट सदस्यांना जिल्हा नियोजन अहवाल व जिविका प्लॉनच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करीता प्रशिक्षण देणे, मृदा व जलसंधारणाच्या व्यवस्थापनाद्वारे जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे तसेच पावसाच्या पाण्यावर कमी अवलंबून राहणे, बहुपीक प्रणालीला प्रोत्साहन देणे, मनरेगाच्या निधीचा उपयोग करून टिकाऊ व उत्पादक संरचनांची निर्मिती करणे, प्रकल्पाचे यशस्वी व प्रभावीपणे प्रशासकीय नेतृत्वासह संबंधित विभागासोबत अभिसरण करणे.

या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यांकडून 1) जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यास मदत करणे. 2) जिल्हास्तरीय समन्वय समिती निर्मिती व मासिक बैठकांचे आयोजन करण्यास सहकार्य करणे 3) तालुकास्तरीय समन्वय समितीची निर्मिती करणे 4) विविध विभागासोबत समन्वय साधण्यासाठी जसे कृषी विभाग, वन विभाग, जलजीवन मिशन, पशु संवर्धन विभाग, सिंचन विभाग जि.प. व इतर विभागासह जिल्हास्तरावर समन्वय साधण्यासाठी प्रत्येक विभागाचा एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करणे.
सदर प्रकल्प 5 वर्षामध्ये पूर्ण करायचा असल्यामुळे सर्व विभागासोबत परस्पर सहकार्य आणि समन्वयासाठी जिल्हा प्रशासनाची भुमिका अत्यंत महत्वाची आहे, असे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त यांनी कळविले आहे.

00000 

वृत्त क्र. 146

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या

लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकामार्फत फेर पडताळणी

नांदेड दि. 27 जानेवारी :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांकडून इकेवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी लाभार्थी महिलाकडून विनंती करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार लाभार्थी पात्र, अपात्र आहेत, याची फेरपडताळणी अंगणवाडी सेविकामार्फत करण्याचे शासनाने 20 जानेवारी 2026 च्या पत्रान्वये निर्देश दिले आहेत. सदर योजनेंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्याच्या नोकरी/सेवानिवृत्ती संदर्भातील विहित निकषानुसार अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे.

शासन निर्देशानुसार e-KYC मध्ये अपात्र ठरलेल्या लाभार्थ्याची यादी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत अंगणवाडी सेविका यांना देण्यात आलेली आहे. तरी लाभार्थी महिलांनी गोंधळून न जाता, आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा.  लवकरच सदर फेरपडताळणीची कार्यवाही करण्यात येणार असून, सहकार्य करण्याचे आवाहन महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ जिल्हा यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 145

राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेची जय्यत तयारी 

29 जानेवारी रोजी स्पर्धेचे उदघाटन

राष्ट्रीय शालेय नेटबॉल क्रीडास्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराची सांगता 

नांदेड दि. 27 जानेवारी :- नांदेड येथे राष्ट्रीय शालेय नेटबॉल (14 वर्षेमुले-मुली व 17 वर्षेमुली) क्रीडास्पर्धा सन 2025-26 चे आयोजन 27 जानेवारी ते 01 फेब्रुवारी,2026 या कालावधीत श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातून जवळपास एक हजार ते 1 हजार 200 खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. 

या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आयोजन समिती, राष्ट्रीय नेटबॉल् क्रीडा स्पर्धा राहुल कर्डिले यांचे अध्यक्षतेखाली विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्पर्धा आयोजन- नियोजन समिती, खेळाडू स्वागत समिती, निवास व भोजन समिती, मैदान, तांत्रीक, वाहतूक, वैद्यकीय सेवा, पोलीस बंदोबस्त, स्थानिक पर्यटन, सांस्कृतीक कार्य समिती, स्वच्छता व इतर समिती गठीत करण्यात आली असून स्पर्धेची जय्यत तयारी पुर्ण झालेली आहे. 

या राष्ट्रीय स्पर्धेचा उदघाटन कार्यक्रम 29 जानेवारी, 2026 रोजी सकाळी 11 वा. श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे बाबा बलविंदरसिंघजी व इतर मान्यवर यांचे हस्ते होणार आहे. ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र व नांदेडकरांसाठी एक मेजवानीच राहणार आहे. तरी या स्पर्धेसाठी जिल्हयातील खेळाडू व क्रीडाप्रेमी यांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय नेटबॉल (14 वर्षे मुले-मुली व 17 वर्षे मुली) क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीर 2 ते 26 जानेवारी, 2026 या कालावधीत इंदिरा गांधी मैदान, नांदेड येथे संपन्न झाले आहे. 

या खेळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सहभाग होणार आहे. सदर संघाची जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे. यासाठी क्रीडा मार्गदर्शक 14 वर्षे मुले- मुलीसंघाकरीता समिर सिखीलकर- पुणे व प्रवीण कुपटीकर- नांदेड तर संघव्यवस्थापक म्हणुन संजय चव्हाण-नांदेड व रुकसाना मुलानी- सांगली हे आहेत. तर 17 वर्षे मुली संघाकरीता क्रीडा मार्गदर्शक म्हणुन निखील पोटदुखे- चंदप्रूर हे तर संघ व्यवस्थापक म्हणुन महेशकुमार काळदाते- परभणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्याच्या संघात खालील खेळाडूंचा समावेश असून यामध्ये 14 वर्षे मुले- कार्तिक वाघ-धुळे, निखिल राजपूत-पुणे, यश पावडे-अमरावती, राज वाघ-धुळे, साहिल मुलानी-सांगली, साई गजभारे-नांदेड, अनमोल जाधव-भंडारा, विरोचन शिंदे-छ.संभाजीनगर, अनिरुध्द लंगोटे-सांगली, आयुष येरणे-चंद्रपूर, धनुष झावरे-संगमनेर तर 14 वर्षे मुलीच्या संघात – भावनागावडे-धुळे, सृष्टी गायकवाड-हिंगोली, वेदिकातनपुरे-अहिल्यानगर, मोहिनी पडोळे- अमरावती, नंदिनी जगदेवे-भंडारा, अनुष्का गायकवाड-सांगली, गीताकांबळे-नांदेड, ऋतुजावाघ-धुळे, समृध्दीपवार-भंडारा, दुव्रादापले- मुंबई, रोशनी बनसोडे-सांगली, रक्षितारवीकुमारबकवाड-नांदेड, तसेच 17 वर्षे मुलीच्या संघात अक्षता कोकणे-अहिल्यानगर, विशालाक्षी राठी-अहिल्यानगर, नेत्राकांसरा-मुंबई, अनुष्का चामलाटे-अमरावती, पुर्वश्री योगेश वाघ- नाशिक, सईइजाते-परभणी, कविता नाईक-पुणे, कुशी हलमारे-गोंदिया, अश्विनी व्ही.तांबारे-नांदेड, जिज्ञासा जिवनसिंग चौहाण-छ.संभाजीनगर, आघाव जान्हवी-धुळे, ईशा पाटील-सांगली या खेळाडूंचा समावेश आहे. 

सदर राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर समारोप कार्यक्रम प्रसंगी  जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, गंगालाल यादव, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी किशोर पाठक, तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे, (राज्य क्रीडा मार्गदर्शक), मारोती सोनकांबळे, क्रीडा अधिकारी, बालाजी शिरसीकर, सी.आर.होनवडजकर, (राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन) श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपूल दापके, जिल्हा संघटक गाईड श्रीमती रुपाली मुधोळकर, प्रवीण कुपटीकर (सचिव), कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, कु. रोहीणी घंटेवाड, (संघटना) रवीकुमार बकवाड, सुमेध गायकवाड आदीनी शुभेच्छा दिल्या.

00000

 वृत्त क्र. 144

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांनी

मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा 

13 फेब्रुवारीपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 27 जानेवारी :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांनी तसेच या पूर्वी अर्ज सादर केले आहे, परंतु लाभ न मिळालेल्या बचत गटानी नव्याने अर्ज सादर करावेत. अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्ज बचतगटाच्या नावे देण्यात येईल. एका बचतगटास एकच अर्ज मिळेल. त्यासंबंधी बचतगटाने कागदपत्रे सोबत आणावेत. परिपूर्ण भरलेले आवश्यक असलेली कागदपत्रे व डिमांड ड्राफ्टसह अर्ज 13  फेब्रुवारी 2026 पर्यंत शासकीय सुट्टी वगळुन कार्यालयीन वेळेत सादर करावेत. यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, यांची नोंद घ्यावी असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.          

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सन २०२5-२6 मध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के  अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गंत अर्ज करण्यासाठी मुदत 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी खालील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक राहील.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा नोंदणीकृत बचत गट असावा, बचत गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे. नोंदणीकृत बचत गटामध्ये किमान १० सदस्य असावेत. त्यापैकी ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जातीचे असावेत. बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. बचत गटातील सदस्यांचे जातीचे व रहिवाशी प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचे असणे आवश्यक आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक  खाते बचत गटांचेअध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बचत गटाने व गटातील सदस्यांनी यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या १० टक्के (३५ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट) स्व-हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या १० टक्के (कमाल रुपये ३.१५ लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. तालूका निहाय उद्दिष्ट नुसार कार्यवाही करण्यात येईल.अर्जाची संख्या उद्दिष्ठापेक्षा जास्त आलेली असल्यास पात्र अर्जदारांची निवड ही ड्रॉ (लॉटरी) पध्दतीने करण्यात येईल. बचत गटातील किमान एका सदस्याकडे सदरचे वाहन चालविण्याचा सक्षम अधिका-यांचा परवाना असावा, अथवाप्रशिक्षण घेतले असलेबाबत प्रमाणपत्र असावे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेत अनुज्ञेय असलेल्या किमान ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उप साधने खरेदी करता येतील. मात्र त्याची या योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रुपये ३.१५लाख) पेक्षा जादाची रक्कम संबंधीत बचत गटाने स्वतः खर्च करावी लागेल. प्रस्ताव परीपूर्ण सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी बचत गटांचे अध्यक्ष व सचिव यांची राहील.  रुपये ३५ हजारचा डिमांड ड्राफ्ट Assistant Commissioner Social Welfare Nanded या नावे काढावा.

00000

वृत्त क्र. 143

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 27 जानेवारी :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार 28 जानेवारी 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

बुधवार 28 जानेवारी रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 11.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पिंगळी जि. परभणी कडे प्रयाण करतील.

00000

Monday, January 26, 2026

वृत्त क्र. 142

आज नांदेडमध्ये ‘माहूर गडाची माय रेणुका’ संगीत महोत्सव

नांदेड, दि. २६ जानेवारी:-मंगळवारी २७ जानेवारी रोजी महाकवी संत विष्णूदास यांच्या रसाळ भक्तिरचनांवर आधारित ‘माहूर गडाची माय रेणुका’ हा भव्य संगीत महोत्सव नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.

नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात सायंकाळी ५ वाजता या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमातील रचनांना संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र माहूर हे साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ असून, या निसर्गरम्य परिसरात महाकवी संत विष्णूदास यांची समाधी आहे. त्यांच्या निवडक भक्तिरचनांवर आधारित हा संगीत महोत्सव भक्ती, संस्कृती आणि संगीताचा अनोखा संगम ठरणार आहे.

या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले राहणार असून, मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, आयुक्त महेश कुमार डोईफोडे तसेच संपादक शंतनू डोईफोडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्रातील नामांकित गायक, वादक आणि निवेदक या संगीत महोत्सवात सहभागी होणार असून, रसिकांसाठी हा एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे.

या संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष सुनील वेदपाठक यांनी केले आहे.

०००००



वृत्त क्र. 141

जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडावंदन   

नांदेड दि. 26 जानेवारी : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वा. झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

पोलीस मैदानावरील मुख्य समारंभापूर्वी हे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

0000










 विशेष वृत्त क्र. 140

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे

नूतनीकृत कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन व वॉर रूमची पाहणी

नांदेड, दि. 26 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. हे अभियान गावांच्या सर्वांगीण विकासासाठीची ऐतिहासिक संधी असून लोकसहभागातूनच ते यशस्वी होईल, असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या नूतनीकृत कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन राज्याचे इतर बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी नांदेड जिल्हा परिषदेकडून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावी कामगिरी केली आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार व लोकसहभाग या घटकांवर विशेष भर देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला थेट पाच कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून, पंचायतराजच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या रकमेचे बक्षीस देण्यात येत आहे. प्रशासक म्हणून उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

शाळा स्तरावर सीसीटीव्ही बसविणे, मुलींसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा उपलब्ध करणे, तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या नूतनीकरण व बांधकामासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्री अतुल सावे यांनी दिल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या वॉर रूमला भेट देऊन विविध विभागांच्या योजनांची माहिती असलेले बॅनर, आराखडे तसेच गावकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी उभारलेली प्रणाली पाहून समाधान व्यक्त केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी या अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली असून एका दिवसात हजारो जलतारा खड्डे तयार करण्यात आले आहेत. यासोबतच डिजिटल व स्मार्ट अंगणवाड्या, ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही बसविणे, कर वसुलीसाठी क्यूआर कोडचा वापर, आरोग्य शिबिरे, शाळा व अंगणवाड्यांची दुरुस्ती असे उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉन्फरन्स हॉलचे नियोजनबद्ध नूतनीकरण केल्याबद्दल कार्यकारी अभियंता संजय शिंदे, उपअभियंता बालाजी पवार, शासकीय कंत्राटदार विकी शिकारे व अधिराज चिंचवडकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यावहारे यांनी केले.

या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, मयूर आंदेलवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष देशमुख, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००







विशेष वृत्त क्र. 139

सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना माफक दरात तपासणीची सुविधा : पालकमंत्री अतुल सावे

पालकमंत्र्यांच्या हस्ते सिटीस्कॅन व एमआरआय सेवेचे लोकार्पण

नांदेड, दि. 26 जानेवारी :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे पीपीपी (PPP) तत्त्वावर अत्याधुनिक सिटीस्कॅन व एमआरआय सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेचे उद्घाटन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अतुल सावे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या सेवेमुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना कमी दरात दर्जेदार तपासणीची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री श्री. सावे यांनी सिटीस्कॅन व एमआरआय सेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

या उद्घाटन कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव तिडके बोंढारकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पीपीपी तत्त्वावर नऊ ठिकाणी सिटीस्कॅन व एमआरआय सुविधा सुरू करण्यात येत असून, त्यामध्ये नांदेडला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ही आरोग्य सेवेसाठी ऐतिहासिक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. नव्याने सुरू झालेल्या सिटीस्कॅन व एमआरआय मशीनमुळे रुग्णांना माफक दरात दर्जेदार तपासणी करता येणार आहे.

तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेंतर्गत अनेक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णालयासाठी आणखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयाच्या परिसरात लवकरच सेतू सुविधा केंद्र व पोलीस चौकी सुरू करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन देत पालकमंत्र्यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी, रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या सिटीस्कॅन व एमआरआय सेवेचे आज लोकार्पण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सेवा, आयसीयु, ट्रॉमा सेंटर, डायलेसिस सेंटर, कॅथलॅब यासारख्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

कार्यक्रमात आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर व आमदार आनंदराव तिडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले.

00000













 विशेष वृत्त क्र. 138

जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबध्द : पालकमंत्री अतुल सावे 

 •  पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण

•  देशभक्तीपर गीतावर शालेय मुलांची कवायतीने वेधले सर्वांचे लक्ष

•  पोलीस व विविध पथकाचे लक्षवेधी संचलन  

नांदेड दि. 26 जानेवारी : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे संपन्न झाले. यावेळी त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबध्द असून विविध विकास कामावर भर देण्यात येणार असल्याचे असल्याचे प्रतिपादन केले. आजचा प्रजासत्ताक दिन देशभक्तीपर गीतावर शालेय विद्यार्थ्यांच्या कवायतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव तिडके, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहायक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी,अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी जिल्हाधिकारी किरण अंबेकर, वरिष्ठ अधिकारी,  स्वातंत्र सैनिक, वारसपत्नी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी उपस्थित मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारस पत्नींची भेट घेतली. पालक मंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. आज सकाळी 9.15 वा. पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर पोलीस वाहनातून त्यांनी संचलन करणाऱ्या पथकांचे निरीक्षण केले. 

काल नांदेड येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा 350 वा शहीदी समागम  कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुद्वारा बोर्ड, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन, नामलेवा संगत व इतर 9 समाजाच्यावतीने यशस्वीरित्या केल्यामुळे पालकमंत्री श्री. सावे यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

शासनाच्यावतीने नेहमीच शेतकऱ्यांच्या व सामान्यांसह हिताच्या योजना राबविण्यावर भर देण्यात येत असून जून ते सप्टेंबर 2025 या काळात जिल्ह्याला नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठे नुकसान झाले होते. या नुकसान झालेल्यांना भरपाईसाठी 628 कोटी 98 लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर अनुषंगिक बाबीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे 727 कोटी 93 लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारीत महाविस्तार एआय ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव, हवामानाचे संदेश, इ. माहिती  मिळणार आहे. यामुळे या ॲपचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.  

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात 1 लाख जलतारा तयार करण्यात येणार असून, येत्या काळात नांदेड जिल्हा पाणीदार होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने 150 दिवसांच्या उपक्रमात विविध लोकाभिमुख, गतीमान उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व सुविधा व उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. 

जिल्ह्यातील पंचायतराज संस्थाना अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज हे महत्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करावे असेही आवाहन पालकमंत्री श्री. सावे यांनी केले.    

महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 2025 मध्ये सौर ऊर्जेच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी करत जगात गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. महावितरणने अवघ्या 30 दिवसांत 45 हजार 911 ऑफ-ग्रीड सौर कृषीपंप बसवून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला असल्याची माहिती त्यांनी  दिली.  

नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून एमपीडीए अंतर्गत 41 कारवाया करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला असून, जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा बसविण्यासाठी ऑपरेशन फ्लश ऑऊट राबविण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  

देशभक्तीपर गीतावर शालेय मुलांची कवायतीने वेधले सर्वांचे लक्ष

शिक्षण विभागाच्यावतीने देशभक्तीपर गीतावर शालेय विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द कवायतीचे सादरीकरण पोलीस कवायत मैदानावर केले. या कवायतीत प्रत्यक्ष पालकमंत्र्यासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला. या तालबध्द कवायतीनी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत सर्व वातावरण देशभक्तीमय केले. 

आजच्या परेडचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस अधिक्षक शशांक गौडा यांनी तर सेंकड इन परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक विजयकुमार धोंडगे केले. प्लाटून मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस बलाचे प्लाटून कमांडर केंद्रीय पोलीस उपनिरीक्षक देविदास जाधव, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद बडगिरे, दंगा नियंत्रण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण औटे, पोलीस मुख्यालय पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निखील पोटे, दंगा नियंत्रण महिला पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनिसा सय्यद, गृहरक्षक दल पथक (पुरुष) वरिष्ठ प्लाटून नायक बळवंत अटकोरे, गृहरक्षक दल पथक (महिला) श्रीमती मंगल बराटे, राष्ट्रीय छात्रसेना पथकाच्या आराध्या चव्हाण, स्काऊट व गाईड पथकाच्या प्रतिक्षा मस्के, केंद्रीय विद्यालय चि. वरप्रसाद, पोलीस बँड पथकाच्या श्रेणी पो. उपनिरीक्षक बी. आर. वाघमारे व सहकारी कर्मचारी, डॉग स्कॉर्ड युनिट श्वानाचे नाव डेक्सटर पो.हे.कॉ वाहेद बेग, डॉग हॅडलर, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे राजकिरण सोनकांबळे, वाहन चालक प्रवीण चंदेल, दंगा नियंत्रण वाहन (वज्र वाहन) वामन पारडे, वाहन चालक बालाजी ठाकूर, अग्निशमक वाहनाचे अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, फायरमेन शाहरुख पठाण, चालक एस. पी. तोटावाड, 108 रुग्णवाहिकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन सुर्यवंशी चालक सतीश बेरडे यांचा तर लोकशाहीचा चित्ररथामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने यांचा या संचलनात सहभाग होता.

पालकमंत्री यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कार व निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार

ॲथेलेटीक्स (भालाफेक व गोळाफेक) ऑलम्पीक गेम मध्ये श्रीमती भाग्यश्री माधवराव जाधव, योगासन एशियन योगासन श्रेयस दिलीप मार्कंडेय  यांना, बॅडमिटन राष्ट्रीय पॅरा बॅडमिटन मध्ये विजयी झालेल्यांना प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देवून सन्मान करण्यात आला. संविधान दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील निवड झालेल्या अंजली प्रवेश लोखंडे यांचा प्रथम तर रुमाले प्रियंका गौतम यांचा द्वितीय, प्रतिक्षा विठ्ठल मुनेश्वर यांचा तृतीय क्रमांक आल्याबाबत त्यांना रुपये 3 हजार रुपयांचा धनादेश व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. योगाचार्य सिताराम सोनटक्के यांचा योग प्रसाराबाबत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविंद्र पांडागळे व अक्षय ढोके यांनी केले. 

0000
































वृत्त क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न     शाहिर प्रा. डॉ. शिंदे, प्रा. डॉ. हंबर्...