Saturday, March 21, 2026




जिल्हा सेतू समिती, नांदेड अंतर्गत ग्रामीण भागासाठी 'आपले सरकार सेवा केंद्र' अर्जांची पहिली यादी (First List) प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व अर्जदारांनी आपली नावे तपासून घ्यावीत

 

 विशेष लेख – २२ मार्च : जागतिक जल दिवस 

 डोक्यावरचा हंडा काढा; पाणीपुरवठ्याचे नियोजन करा! 

स्वयंपाकापासून ते सांडपाण्यापर्यंत घरात पाणी आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पिढ्यानपिढ्या महिलांनी सांभाळली आहे. आजही अनेकांना आपली आई, बहीण किंवा आजी डोक्यावर हंडा, कळशी किंवा घागर घेऊन लांबवरून पाणी आणतानाचे प्रसंग आठवते.भारतात आता हे चित्र कालबाह्य झाले तरी जगभरात अधिकही अनेक देशात नागरिक शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्यापासून वंचित आहेत. त्यामुळे यंदा 22 मार्चला जागतिक जल दिवस साजरा करताना संयुक्त राष्ट्राने पाणी व्यवस्थापनात महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे.

भारताने पेयजलाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशन प्रभावीपणे राबविण्यात आले. तरीही काही भागांत पाणीटंचाई कायम आहे आणि त्याचा सर्वाधिक भार महिलांवरच पडतो. ही समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नसून जागतिक पातळीवरही ती तितकीच गंभीर आहे. म्हणूनच यंदाचा जागतिक जल दिवस “पाणी आणि महिला सक्षमीकरण” या व्यापक संकल्पनेशी जोडून साजरा केला जात आहे.

जलसंकट : असमानतेचा प्रश्न 

पृथ्वीवरील सुमारे ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला असला, तरी त्यातील केवळ २.५ टक्के पाणी गोड आहे. त्यातीलही अत्यल्प भाग मानवाच्या वापरासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याची विपुलता ही केवळ भास आहे.

हवामान बदल, लोकसंख्यावाढ,औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढत असताना उपलब्धतेत आणि वितरणात मोठी असमानता निर्माण झाली आहे. या असमानतेचा सर्वाधिक फटका स्त्रिया आणि मुलींना बसतो.

 पाणीटंचाईत महिलांचे सर्वाधिक शोषण 

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालांनुसार, जगभरातील १ अब्जाहून अधिक स्त्रिया अजूनही सुरक्षित पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. सुमारे १.८ अब्ज लोकांच्या घराजवळ पाणी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक तीन घरांपैकी दोन घरांमध्ये पाणी आणण्याची जबाबदारी महिलांवर असते.

५३ देशांतील आकडेवारीनुसार स्त्रिया आणि मुली दररोज एकत्रितपणे सुमारे २५० दशलक्ष तास पाणी आणण्यात खर्च करतात. ही वेळ शिक्षण, रोजगार किंवा वैयक्तिक विकासासाठी वापरता आली असती.

अशुद्ध पाणी आणि स्वच्छतेच्या अभावामुळे दररोज सुमारे १,००० बालकांचा मृत्यू होतो. याशिवाय जगातील सुमारे १४ टक्के देशांमध्ये पाणी व्यवस्थापनाच्या निर्णयप्रक्रियेत महिलांचा समान सहभाग निश्चित करणारी ठोस यंत्रणा नाही.

हे आकडे स्पष्ट करतात की जलसंकट हा केवळ नैसर्गिक प्रश्न नसून तो सामाजिक, आर्थिक आणि लिंगभेद करणारा आहे.

 महिला जलव्यवस्थापनाच्या केंद्रस्थानी हव्यात 

भारतीय संविधानामुळे स्त्री-पुरुष समानतेचा पाया मजबूत झाला आहे.आज महिला उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत नेतृत्व करत आहेत. पाणी व्यवस्थापनातही त्यांचा अनुभव अमूल्य आहे.मात्र ही स्त्री समानता आत्ता जलव्यवस्थापनातही आणणे केवळ आपल्याच देशाची नाही तर जगभराची गरज बनली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मते, जलव्यवस्थापनात महिलांचा सहभाग वाढल्यास सेवा अधिक शाश्वत, समावेशक आणि प्रभावी ठरतात. त्यामुळे महिलांना ‘पाणी आणणाऱ्या’ भूमिकेतून ‘पाणी नियोजन करणाऱ्या’ भूमिकेत आणणे आवश्यक आहे.

पाणी आणि अर्थव्यवस्था : अदृश्य नाते 

पाणी हे जीवनाचेच नव्हे तर अर्थव्यवस्थेचेही मूलभूत साधन आहे. जगभरात उपलब्ध शुद्ध पाण्यापैकी सुमारे ७० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते, तर उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते.

ज्या देशांनी प्रभावी जलव्यवस्थापन केले, तेथे आर्थिक प्रगती वेगाने झाली. इस्रायलने ठिबक सिंचन, सिंगापूरने सांडपाण्याचा पुनर्वापर, नेदरलँडने पूर नियंत्रण आणि ऑस्ट्रेलियाने जलसंधारण धोरण यशस्वीपणे राबविले. ही उदाहरणे योग्य नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करतात.

जागतिक उपाययोजना : बदलाची दिशा 

पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर (डिसॅलिनेशन), सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर, तसेच नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यांवर भर दिला जात आहे.

महाराष्ट्रातील नागपूर येथे सांडपाण्याचा औद्योगिक वापर केला जातो, तर नवी मुंबईचे सांडपाणी व्यवस्थापन आदर्श मानले जाते. याशिवाय वृक्षारोपण आणि जलसंधारण हे पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यावश्यक उपाय आहेत.

पाणी अडवा – पाणी जिरवा : प्रभावी उपाय 

पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे ही जलसंधारणाची सर्वात प्रभावी पद्धत आहे. यामुळे भूजल पातळी वाढते, विहिरी जिवंत राहतात आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होते.

शहरी भागातही रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करणे आवश्यक आहे. शासनाने नव्या बांधकामांसाठी ही अट बंधनकारक केली आहे, ही सकारात्मक बाब आहे.

भारतातील प्रयत्न : धोरण आणि अंमलबजावणी 

भारत सरकारने पाणी व्यवस्थापनासाठी विविध योजना राबवल्या आहेत—

जल जीवन मिशन – प्रत्येक जल जीवन मिशन, अटल भूजल योजना,जलशक्ती अभियान,स्वच्छ भारत मिशन,महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजना,मुख्यमंत्री जलसंधारण योजना,नमामि गंगे योजना अशा कितीतरी योजनांमधून केंद्र व राज्य शासन जनतेला शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

प्रत्येक नागरिकाची भूमिका 

शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी सामान्य नागरिकांनीही या मोहिमेत एक जबाबदार नागरिक म्हणून पुढे येणे गरजेचे आहे.पाणी वाचवण्याची सुरुवात शासनाकडून नव्हे, तर घरापासून होते. आपण काही सोपे उपाय अवलंबू शकतो.जसे की,नळ आणि पाईप गळती त्वरित दुरुस्त करणे,रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे,

सांडपाण्याचा पुनर्वापर,ठिबक सिंचनाचा वापर

पाण्याचा अपव्यय टाळणे,वृक्षारोपण करणे,घरातील पाणी व्यवस्थापनात महिलांचा निर्णयाधिकार मान्य करणे,पाणी हा केवळ नैसर्गिक संसाधन नसून तो मानवी हक्क, सामाजिक न्याय आणि लिंगसमतेचा आधार आहे. जलसंकटाचा विचार करताना समतेचा दृष्टिकोन आवश्यक आहे. तसा विचार रुजवणे.यासोबतच घराघरात केवळ पाण्याच्या उपलब्धतेसाठी महिलांचे शोषण होणार नाही याची काळजी घेण्याचाही आजचा दिवस आहे. चला !तर महिलांच्या डोक्यावरचा हंडा काढूया आणि जल जीवन मिशन, अटल भूजल योजना,जलशक्ती अभियान,स्वच्छ भारत मिशन,महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजना, विविध जलसंधारण योजनेच्या माध्यमातून पाणी टंचाई मुक्त समाज निर्मितीसाठी पुढे येऊया..

कारण पाणी वाचवणे म्हणजेच समाजाचे भविष्य सुरक्षित करणे होय.

प्रवीण टाके

उपसंचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

9702858777

00000000



Friday, March 20, 2026

 वृत्त क्रमांक 350

मंगळवारी नायगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 20 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व परमवीर चक्र कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 24 मार्च 2026 रोजी  परमवीर चक्र कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नायगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधी साठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी मंगळवार 24 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून परमवीर चक्र कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नायगाव येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी  क्रमांक 02462-251674 व सय्यद रज्जाक 9423748008 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 349

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप योजनेत अर्ज करण्यासाठी २७ मार्च अंतिम मुदत

नांदेड, दि. २० मार्च :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्ती क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या बचत गटांनी आपले अर्ज सादर करण्यासाठी तसेच त्रुटींची पूर्तता करण्यासाठी २७ मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

ज्या बचत गटांनी योजनेसाठी अर्ज प्राप्त करून घेतले आहेत, परंतु अद्याप भरून समाज कल्याण कार्यालयाकडे सादर केलेले नाहीत, तसेच ज्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांनी निश्चित मुदतीत आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालयात सादर करावेत. अपूर्ण अथवा त्रुटीयुक्त अर्जांची आवश्यक पूर्तता करून घेणे अनिवार्य आहे.

अर्जातील त्रुटींबाबत माहिती मिळवण्यासाठी संबंधितांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज किंवा त्रुटींचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

०००००

वृत्त क्रमांक 348

'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' अंतर्गत 

कृषी अवजार बँकेसाठी मिळणार 24 लाखांपर्यंतचे अनुदान

अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल 2026

नांदेड दि. 20 मार्च :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यांतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना कृषी व्यवसायात भरारी घेण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत गावपातळीवर 'कृषी अवजार बँक' स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्यांच्या ६० टक्के म्हणजेच कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी प्रकल्प गावातील उमेद आणि माविम यांच्याद्वारे पुरस्कृत महिला बचतगट तसेच गाव संघ पात्र राहतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

या योजनेच्या लाभासाठी संबंधित गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान १० सदस्य असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, ते गट अपात्र राहतील. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास निवड प्रक्रीया ऑनलाईन लॉटरी पध्दतीने केली जाईल, यासंबंधीचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत.

या कृषी अवजारांची करता येणार खरेदी

निवड झालेल्या गटांना गावस्तरावर अवजार बँक स्थापन करण्यासाठी विविध प्रकारची कृषी यंत्रसामग्री अपेक्षित आहे. यात प्रामुख्याने ट्रॅक्टर चलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाइन हार्वेस्टर आणि फवारणी पंप यासारखी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करता येईल. शासकीय योजनेचा लाभ घेता येईल.

लाभार्थी निवडीची पद्धत: योजनेअंतर्गत निवड झालेल्या एकाच गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर लाभार्थीची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाईल. जर प्रकल्पाचे मूल्य २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर राष्ट्रीयीकृत बँकेकडून ७५ टक्के कर्ज घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अर्ज करण्यासाठी कृषी विभागातर्फे आवाहन  

इच्छुक संस्थांनी प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर (https://dbtndksp.mahapocra.gov.in/) वर ५ एप्रिल पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000 

वृत्त क्रमांक 347

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दस्तनोंदणी राहणार सुरू 

नांदेड दि. २० मार्च :- आर्थिक वर्ष संपत येत असल्याने व नूतन वर्षानिमित्त लोकांचा मालमत्ता खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे दस्तनोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने गुरुवार 26 मार्च, शनिवार 28 मार्च, रविवार 29 मार्च व मंगळवार 31 मार्च 2026 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय चालू राहणार आहेत. 

ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी शनिवार व रविवार सोडून अन्य दिवशी आहे ती कार्यालय त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्टयांपैकी एक दिवस चालू राहतील. 

या दिवसासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्याकरीता तसेच अभिनिर्णय व कमी पडलेले मुद्रांक शुल्क इत्यादी कामकाज विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगरसहीत) कार्यालय देखील कार्यरत ठेवावीत, असे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहेत.

00000

Thursday, March 19, 2026

वृत्त क्रमांक 346

पायाभूत सुविधा बळकटीसाठी ठोस निर्णयांवर भर : मंत्री संजय राठोड 

नांदेड, दि. 19 मार्च : देश व राज्य पातळीवर पायाभूत सुविधा मजबूत करण्यासह सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून ठोस व धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले. 

माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रात उभारण्यात येणाऱ्या शक्तिपीठ बंधाऱ्याच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी ते बोलत होते. दीक्षागुरू प्रेमसिंगजी (बापू) महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी आमदार भीमराव केराम, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार किसनराव वानखेडे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, धरमसिंग राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. 

मंत्री राठोड म्हणाले की, माहूर गडावर दरवर्षी लाखो भाविक येतात व पैनगंगा नदीत स्नान करतात; मात्र आवश्यक सुविधा अपुऱ्या होत्या. शक्तिपीठ बंधाऱ्याच्या माध्यमातून भाविकांना विविध सुविधा उपलब्ध होणार असून हा प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विकासकामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आमदार भीमराव केराम यांनी सांगितले की, प्रेमसिंगजी (बापू) महाराज यांनी विनामोबदला जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या बंधाऱ्यात स्नान घाट, रेलिंग, प्रकाश व्यवस्था, संरक्षण भिंत, पार्किंग व सभामंडप यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. तसेच या मठासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. 

मतदारसंघात सुमारे 1100 कोटी रुपयांच्या निधीतून तीन उच्च पातळी बंधारे उभारले जात असून त्यातील सर्वात मोठा प्रकल्प किनवट-माहूर मतदारसंघात होत असल्याचे त्यांनी सांगितले. धनोडा उच्च पातळी बंधारा पूर्ण झाल्यानंतर माहूर येथील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले. 

तसेच सहस्त्रकुंड प्रकल्प मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून  त्याद्वारे सुमारे २२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

यावेळी आमदार बाबुराव कोहळीकर व किसनराव वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर कचकलवार यांनी केले.

00000







 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबतच्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठीच्या प्रवेशिका मागविण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवेशिका मागविण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च, २०२६ असा होता; तथापि, आता दि. ३१ मार्च, २०२६ पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी, २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन / छायाचित्रे / वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने https://dgipr.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

0000

Wednesday, March 18, 2026

एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भातील तक्रारींसाठी शासनाकडून व्हाटस् ॲप क्रमांक उपलब्ध… 👉🏾 ९७६९९१९२२१ #LPG


 

 एलपीजी गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना.

#LPG



वृत्त क्रमांक 345

सहाय्यका मार्फत ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ 

नांदेड दि. 18 मार्च :- जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी अद्याप झाली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ आपले गावासाठी नेमलेले सहायक अथवा ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मंगळवार 31 मार्च 2026 पूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासन केले आहे. 

पीक नोंदणी न झाल्याने नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज इत्यादी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, तसेच नाफेडमार्फत खरेदीसाठी अडचणी येऊ नये याकरीता सहायक स्तरावरून करावयाच्या पीक नोंदणीला (DCS) ३१ मार्च २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत उर्वरित सर्व शेतकऱ्यांची पीक पाहणी पूर्ण करून घेण्याबाबत सर्व संबंधितांनी तात्काळ कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिले आहेत. 

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024 नुसार संपूर्ण राज्यामध्ये ई-पीक पाहणी Digital Crop Survey (DCS) अंतर्गत मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी करण्यात येते. राज्यात रब्बी हंगाम २०२५-२०२६ हा १० डिसेंबर २०२५ पासून सुरु असून त्याअंतर्गत १० डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी ही सुरु होती. तसेच २५ जानेवारी २०२६ पासून सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात आली असून त्याची अंतिम मुदत १० मार्च, २०२६ अशी होती.

000000




 वृत्त क्रमांक 344

अथलेटिक्स, कुस्ती खेळासाठी खेळाडूंची निवड 

पात्र खेळाडुंना अर्ज करण्याचे आवाहन   

नांदेड दि. 18 मार्च :- राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मिशन लक्षवेध हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला असून या योजनेंतर्गत लातूर विभागास अथलेटिक्स व कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरु करण्यास मान्यता मिळालेली आहे. या विभागीय क्रीडा निपुणता केंद्र अंतर्गत अथलेटिक्स व कुस्ती या खेळांच्या प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यासाठी पात्र खेळाडूंनी आपले अर्ज विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग जिल्हा क्रीडा संकुल परिसर औसा रोड लातूर येथे प्रत्यक्ष अथवा dyd.syslatur@rediffmail.com या मेलवर शुक्रवार 20 मार्च 2026 पर्यंत करावे, असे आवाहन लातूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक महादेव कसगावडे यांनी केले आहे. 

आवश्यक कागदपत्रे व पात्रता

वयोमर्यादा- 25 वर्षाआतील मुले/मुली (वर्षाच्या 31 डिसेंबर 2026 रोजी).

आवश्यक कागदपत्रे- जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील 2 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज 3 फोटोग्राफ, शाळा महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकांचे संमती पत्र इ.

अधिवास- महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असणे आवश्यक (अधिवास प्रमाणपत्र)

क्रीडा कामगिरी- राज्य स्तरावरील पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी (SGFI, AFI, Khelo India National only) गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती चाचन्यांमध्ये पात्र होणे आवश्यक.

वैद्यकीय तपासणी-शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य. 

निवड झालेल्या खेळाडूना निवासी क्रीडा प्रशिक्षण, पायाभूत सुविधा व क्रीडा साहित्य, खेळाडूंचा सराव व मुल्यांकनाकरिता क्रीडा स्पर्धेचे आयोजन स्पोर्ट्स सायन्स सेंटर, करीयर मार्गदर्शन, देशी-विदेशी संस्थांच्या सहकार्याने क्षमता विकास कार्यक्रम इ. सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मिशन लक्षवेध ही निवासी विभागीय क्रीडा निपुणता योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तसेच यामध्ये निवड झालेल्या खेळाडूना निवास, भोजन, पूरक आहार, खर्च, क्रीडा प्रशिक्षण साहित्य, निवडलेल्या खेळाडूंचे देशांतर्गत / परदेशी प्रशिक्षण व देशांतर्गत / विदेशातील स्पर्धा सहभाग खर्च, खेळाडूंच्या वैद्यकीय चाचण्या, किरकोळ वैद्यकीय खर्च, क्रीडा व युवक सेवा लातूर यांच्या मार्फत करण्यात येईल. 

मिशन लक्षवेध या योजनेअंतर्गत प्रवेशासाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी अर्ज करावा व अधिक माहितीसाठी विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, औसा रोड, लातूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही आवाहन महादेव कसगावडे, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग लातूर यांनी केले आहे.

 00000

वृत्त क्रमांक 343

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा सुधारित दौरा 

नांदेड दि. 18 मार्च :- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे गुरुवार 19 मार्च 2026 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरुवार 19 मार्च 2026 रोजी घाटंजी तालुक्यातील मोवाडा हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने सकाळी 10.55 वा. धनोडा हेलिपॅड येथे आगमन व शासकीय वाहनाने माहूर तालुक्यातील धनोडा उच्च पातळी बंधारा साईटकडे प्रयाण. सकाळी 11 वा. धनोडा उच्च पातळी बंधाऱ्याच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ धनोडा उच्च पातळी बंधारा साईट ता. माहूर. सकाळी 11.55 वा. धनोडा उच्च पातळी बंधारा येथून शासकीय वाहनाने धनोडा हेलिपॅडकडे प्रयाण करतील. दुपारी 12 वा . धनोडा हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने सेवादासनगर हेलिपॅड ता. जिवती जिल्हा चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्रमांक 342

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग निर्मूलनासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेला गती द्या; मुख्य कार्यकारी अधिकारी 

 नांदेड दि.१८ मार्च: मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागा ची आढावा बैठक घेण्यात आली. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) समूळ उच्चाटन करण्यासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण ही काळाची गरज आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आज आयोजित विशेष आढावा बैठकीत केले.

जनजागृतीवर विशेष भर

बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला:

 पालक-शिक्षक समन्वय: शाळा आणि शिक्षकांच्या मदतीने जास्तीत जास्त पात्र मुलींपर्यंत पोहोचून लसीकरणाचे प्रमाण वाढवणे.

 ग्रामस्तरावरील उपक्रम: महिलांच्या विशेष ग्रामसभा, महिला मंडळ, युवा मंडळ आणि माता बैठकांचे आयोजन करणे.

 स्थानिक नेतृत्व: गावातील सरपंचांच्या समन्वयाने जनजागृती करून पालकांना व लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणे.

लस सुरक्षित आणि प्रभावी

मुख्य कार्यकारी अधिकारी पुढे म्हणाले की, "ही लस जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रमाणित केलेली असून तिचे कोणतेही दुष्परिणाम (Side Effects) नाहीत. लस घेतल्यास मुलींचे भविष्य आरोग्यदायी आणि उज्ज्वल होणार आहे. आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयईसी (IEC) उपक्रमांच्या माध्यमातून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे."

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा

या बैठकीत केवळ लसीकरणच नव्हे, तर इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये:

 कुष्ठरोग आणि क्षयरोग (TB) निर्मूलन मोहीम.

पॅलिएटिव्ह केअर (सुश्रुषा सेवा) 

गोल्डन कार्ड काढणे 

ncd कार्यक्रम आणि आरसीएच (RCH) संबंधित उपक्रम.

आरोग्य विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी.

या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, सह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, सहसंचालक आरोग्य सेवा डॉ. बालन, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, मलेरिया अधिकारी डॉ. चव्हाण, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000



वृत्त क्रमांक 341

नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवात विक्रमी उलाढाल 

नांदेड कृषी महोत्सव पोर्टलद्वारे www.nandedkrushimahotsav.in शेतमाल थेट विक्रीस चालना 

- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत   

नांदेड दि. 18 मार्च :- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड आणि प्रकल्प संचालक, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ते 17 मार्च 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, हरिद्रा, रेशीम, मत्स्य विभाग, आणि शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी सक्रीय सहभाग घेतला. तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना दर्जेदार शेतीमाल उपलब्ध व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2026' ला नांदेड जिल्ह्यातील व शहरातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा मैदानात रंगलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात तब्बल 1 कोटी रुपये पेक्षा अधिक विक्रमी उलाढाल झाली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या दर्जेदार उत्पादनास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये आनंदाची भावना दिसुन आली.तसेच जिल्हा महोत्सव PMFME अतर्गंत खरेदीदार विक्रेता संमेलनात 55 लक्ष रुपये किमतीचे खरेदी करार करण्यात आले. 

या महोत्सवाच्या तिन्ही दिवसांत ग्राहकांनी मोठयाप्रमाणात खरेदीसाठी सहभाग घेतल्यामुळे मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांना विक्री करण्यात आली असुन, शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल उत्पादनास योग्य मोबदला मिळाला आहे विविध प्रकारचे धान्य, कडधान्ये आणि प्रक्रियायुक्त पदार्थांचे स्टॉल्स,पाणलोट,जलतारा,नैसर्गिक शेतीचे मॉडेल तसेच ईलेक्ट्रीक पॉवर टिलर ठरले कृषी महोत्सवाचे आकर्षण.

पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बाजरी, राजगिरा, नाचणी, वरई, भगर यांसारख्या पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले विविध पदार्थ स्पर्धकांनी सादर केले. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. सुरेखा कुलकर्णी (विभाग प्रमुख, होम सायन्स, केआरएम महिला महाविद्यालय, नांदेड) व प्रा. अलका पवळे (कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी) यांनी केले. प्रथम क्रमांक – सौ. सुनीता अशोक कावळे, रेनापूर, ता. भोकर (नाचणी व भगर लाडू) द्वितीय क्रमांक – सौ. मनीषा सुरेशराव कदम, नांदेड (भगर आप्पे व इडली) तृतीय क्रमांक – सौ. अर्चना विजय क्षीरसागर, नांदेड (नाचणी ढोकळा) तसेच सर्व विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक – सौ. सुनीता अशोक कावळे, रेनापूर, ता. भोकर (नाचणी व भगर लाडू) द्वितीय क्रमांक – सौ. मनीषा सुरेशराव कदम, नांदेड (भगर आप्पे व इडली) तृतीय क्रमांक – सौ. अर्चना विजय क्षीरसागर, नांदेड (नाचणी ढोकळा) तसेच सर्व विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच बायोचार,ऊसा पीकातील AI तंत्रज्ञान मार्गदर्शन व शेतकरी शास्त्रज्ञ कार्यशाळा कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 

"नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. थेट विक्रीच्या या माध्यमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य किंमत मिळाली असून, यामुळे ग्रामीण कृषि अर्थव्यवस्थेला उभारी  मिळाली आहे."

या महोत्सवाच्या यशस्वीतेमुळे आगामी काळात अशा उपक्रमांची व्याप्ती वाढवण्याचा मानस शेतकऱ्यांनी व नागरिकांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे हिताचे असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी सांगितले व कृषि व धान्य महोत्सवाचे यशस्वीतेबाबत सर्वांचे आभार मानले.

00000

 वृत्त क्रमांक 340

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न

नांदेड दि. १८ मार्च : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत आयोजित विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर ११ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडले. शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, रस्ते दुरुस्ती, साक्षरतेचे महत्त्व, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, पेंटिंग, वायरिंग, नळकाम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणार्थी व ग्रामस्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन मिळावे यासाठी तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. राष्टसंत गुरुवर्य सतगुरू साईनाथ महाराज स्वच्छता दूत, महाराष्ट्र यांनी स्वच्छतेविषयी प्रबोधन केले. १७ मार्च २०२६ रोजी शिबिराचा समारोप झाला.

समारोप कार्यक्रमासाठी तहसील कार्यालय अर्धापूरचे तहसीलदार  रेणुकादास देवणीकर हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात अशा उपक्रमांमुळे व्यक्तिमत्त्व विकास घडतो व समाजाप्रती असलेली बांधिलकी दृढ होते, असे सांगितले. तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी नोकरीपेक्षा स्वतःचे उद्योग सुरू करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करून त्यांचे मनोबल वाढवले.

संस्थेचे उपप्राचार्य व्ही. डी. कंदलवाड यांनी महादेव पिंपळगाव येथील ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

शिबिराच्या निरोप समारंभाला गावातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, मंगल कार्यालयाचे अध्यक्ष, ग्रामस्थ, शिल्पनिदेशक व शिबीरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी डी. ए. पोतदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. बी. उभेदळ यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी डी. ए. पोतदार, पी. बी. उभेदळ, जी. ए. भाकडे, ए. जी. तळोकार,  के. एस. जैन आदींनी सहकार्य केले.

०००००



वृत्त क्रमांक 339

विविध कृषि पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 18 मार्च :- महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्य शासनातर्फे दरवर्षी कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट/संस्थेला पुरस्कार देण्यात येतो. उल्लेखनिय, अतिउल्लेखनिय कार्य करणारे तसेच राज्य, जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारे शेतकरी,व्यक्ती,संस्था, गटांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्यात दरवर्षी शेती, फलोत्पादन व पुरकक्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार, जिजामाता कृषीभुषण पुरस्कार, कृषीभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) कृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे.

सदर संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे.यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे विहित कालावधीत अर्ज करावा.

शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी दाखला प्राप्त करून घेण्यास १५-२० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे, त्याबरोबर Network issue, तांत्रिक अडचण यांमुळे शेतकऱ्यांना विहित मुदतीत अर्ज सादर करण्यास अडचण येत आहे. तसेच मार्च महिन्यात आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने कामकाज असल्यामुळे क्षेत्रीय यंत्रणाना प्रत्यक्ष पडताळणीसाठी देखील कालावधी आवश्यक आहे. यामुळे शेतकरी स्तरावरून व क्षेत्रीय स्तरावरून दूरध्वनीद्वारे सदरची मुदत वाढवून मिळणेबाबत होत असलेल्या विनंतीच्या अनुषंगाने केवळ सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार सादर करणेसाठी सुधारीत नियोजन पुढीलप्रमाणे राहील.

सन 2025 सुधारित कालावधी  

अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरणे. सहाय्यक कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा ऑनलाईन अर्जाची छाननी करून, समक्ष भेट देऊन अनुषंगिक बाबींची पूर्ततेची कार्यवाही करून तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे.तालुका कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा ऑनलाईन अर्ज छाननी, समक्ष भेट, सहाय्यक कृषी अधिकारी यांचे अभिप्राय यांची प्रत्यक्ष पडताळणी करून जिल्हास्तर समितीकडे अर्ज सादर करण्याचा सुधारित कालावधी 31 मार्च 2026 अखेर राहील.

जिल्हास्तर समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, समक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारशीसह अर्ज विभागस्तरीय समितीकडे सादर करण्याचा कालावधी 10 एप्रिल 2026 अखेर असेल.

विभागस्तरीय समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, समक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारस केलेले परिपूर्ण व निकषाप्रमाणे पात्र प्रस्ताव विभागस्तरीय समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तासह कृषी आयुक्तालयास सादर करण्यासाठी कालावधीत 25 एप्रिल 2026 अखेर पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.

आयुक्त कृषी यांनी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गटांना सन 2025 पासूनचे विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करण्याबाबत आवाहन केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ आपला अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

Tuesday, March 17, 2026

वृत्त क्रमांक 338 

नांदेड ग्रंथोत्सव-2025

आयोजित वाचकांनी केली विक्रमी खरेदी ; दहा लाख रुपयांची ग्रंथविक्री 

नांदेड दि. 18 मार्च :- नांदेड ग्रंथोत्सव 2025 हा 1415 मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. वाचकांना नियोजीत कार्यक्रमाच्या साहित्यिक मेजवानी सोबतच, आयोजकांनी मोठ्याप्रमाणात पुस्तकांचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. वाचकांना व ग्रंथालय चालकांना पाहिजे असलेली पुस्तके मिळावीत या हेतुने, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय प्रकाशनाचे स्टॉल, शांती पब्लीकेशन पुणे तसेच जिल्हाधिकारी कार्याल नांदेड येथील ग्रंथ प्रदर्शन स्टॉल, संकेत प्रकाशन, निर्मल प्रकाशन नांदेड, संदेश बुक डेपो परभणी प्रगती बुक डेपो हिंगोली, मांडणी कर बुक डेपो नांदेड मराठवाडा बुक सेलर नांदेड ओमकार ओमकार प्रकाशन नांदेड ओमकार प्रकाशन नांदेड हिंगोली व इतर  पुस्तकाचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले होते. 

या ग्रंथप्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक सुरेश सावंत यांनी केले. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, डॉ. मा. मा. जाधव, प्रा.संजय जगताप, साहित्यिक डॉ.विलास वैद्य, साहित्यिक नारायण शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी आदी मान्यवरांनी हजेरी लावली. 

प्रकाशकांनी मोठ्या प्रमाणावर वाचकांना दर्जेदार ग्रंथ उपलब्ध करून दीले होते. त्याला वाचक ग्रंथालय चालकांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथखरेदी करूण चांगला प्रतिसाद दिला आहे.  दोन  दिवसात जवळपास दहा लाख रुपयांचे ग्रंथ विक्री झाल्याचे समजते.

00000











 वृत्त क्रमांक  337

माजी सैनिकांच्या पुनर्वसन व कौशल्य विकासासाठी 13 मार्च रोजी समुपदेशन

नांदेड, दि. 9 मार्च :- नांदेड जिल्हा व अधिपत्याखालील क्षेत्रात माजी सैनिक व त्यांच्या विधवांची संख्या 1 हजार 834 इतकी आहे. जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य कौशल्य विकास व पुनर्वसनाची संधी मिळावी यासाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरावर विशेष समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा समुपदेशन कार्यक्रम शुक्रवार, दि. 13 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा सैनिक कार्यालय, नांदेड येथे होणार आहे. जिल्ह्यातील सर्व इच्छुक माजी सैनिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

या समुपदेशन कार्यक्रमाद्वारे माजी सैनिकांना जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामार्फत त्यांच्या कौशल्यानुसार योग्य तांत्रिक अथवा शैक्षणिक अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय व निमशासकीय नोकरीच्या संधींबाबत माहिती, आवश्यक प्रमाणपत्रांविषयी मार्गदर्शन, रोजगाराच्या संधींबाबत सल्ला तसेच पुनर्वसन प्रक्रियेत येणाऱ्या शैक्षणिक व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

000000

https://setusamitinanded.in/index.php जिल्हा सेतू समिती, नांदेड अंतर्गत ग्रामीण भागासाठी 'आपले सरकार सेवा केंद्र' अर्जांची पहिली याद...