Thursday, November 14, 2024

 वृत्त क्र. 1092

दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांनी ‘सक्षम ॲप’ चा वापर करुन सुविधा प्राप्त करुन घ्याव्यात : जिल्हाधिकारी

नांदेड, दि. 14 नोव्हेंबर : लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभ रीतीने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने सक्षम नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेसाठी सर्व दिव्यांग मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये सक्षम अँप डाऊनलोड करून मतदारांसाठी दिलेल्या सोयी सुविधा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

दिव्यांग मतदारांसाठी आयोगाने तयार केलेले सक्षम ॲपवर विविध सोयी सुविधा देण्यात येत आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक दिव्यांग मतदाराने सक्षम ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे. निवडणूकसंदर्भात सेवा घेण्यासाठी दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना त्यांचे नाव पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती ॲपमध्ये भरावी लागणार आहे. दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना या सक्षम ॲपद्वारे मतदानासाठी लागणाऱ्या सहायतेची मागणी नोंदविता येईल. त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग, वयोवृद्ध मतदानाचे मतदारसंघ व स्थाननिश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर या मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हील चेअर, सहाय्यक मदतनीस इत्यादी प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळवू शकतो.

सक्षम ॲप अनेक वैशिष्ट्ये प्रदान करते. दृष्टीहीन असलेल्यांसाठी आवाज प्रदान करते. श्रवण अक्षम असलेल्यांसाठी ॲप-टेक्स्ट-टु-स्पीच प्रदान करते. ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे ते वापरण्यासाठी सोपे होते. ॲपमध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून त्यामध्ये मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र उपलब्ध प्रवेश योग्यता वैशिष्ट्ये आणि मतदान अधिकाऱ्यांच्या संपर्क तपशिलांचा समावेश आहे. दिव्यांग मतदाराला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतांना येणाऱ्या कोणत्याही समस्याबद्दल ॲपवर तक्रारी नोंदविता येतात.

दिव्यांग मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सक्षम ॲप हे महत्वाचे असून, वापरण्यास सोपा आहे. दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी नोंदणी करणे, त्यांचे मतदान केंद्र शोधणे आणि त्यांचे मत देणे सोपे होते. 

जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांनी सक्षम ॲप डाऊनलोड करून विविध सुविधेचा लाभ घ्यावा ,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभीजीत राऊत यांनी केले आहे.

००००००



No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...