Thursday, November 14, 2024

 वृत्त क्र. 1093

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ५५ उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल 

उमेदवारांनी १८ तारखेपर्यंत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रत्येकी ३ जाहिराती देणे आवश्यक 

उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मतदारांना देणे अनिवार्य

नांदेड, दि. १४  नोव्हेंबर :- नांदेड जिल्हयामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उभे असणाऱ्या १८४ उमेदवारांपैकी ५५ उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. या ५५ उमेदवारांनी निवडणूक पूर्ण होईपर्यंत आपली माहिती वृत्तपत्रातून जनतेला कळविणे आवश्यक आहे. ज्यांनी वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या नसतील त्यांनी १८ नोव्हेंबर पर्यत दयाव्यात, अशी सूचना खर्च विभागाचे नोडल अधिकारी जनार्दन पक्वाने यांनी केली आहे.

भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे सर्व उमेदवारांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास कोणते गुन्हे दाखल आहेत याबाबतची सविस्तर माहिती माध्यमामध्ये निवडणूक उमेदवारी जाहिर झाल्यापासून तर मतदान होईपर्यत जाहिर करणे अनिवार्य केले आहे.

त्यामुळे अशा पार्श्वभूमीच्या उमेदवारांनी मतदारांना माहिती होईल अशा प्रकारे माध्यमामधून एकूण तीन वेळा जाहिराती देवून जनतेला माहिती द्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. यासंदर्भात आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी निर्देश जारी केले आहेत. नांदेड जिल्हयात लोकसभेसाठी १९ तर विधानसभेसाठी ९ मतदारसंघात १६५ उमेदवार उभे आहेत. अशा एकूण १८४ उमेदवारापैकी ५५ उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

या सर्व उमेदवारांना प्रिंट मीडियामध्ये तीन जाहिराती व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रत्येकी तीन जाहिराती प्रकाशित करणे आयोगाने अनिवार्य केले आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्देशानुसार जाहिराती प्रसारित करण्याचे स्पष्ट केले आहे.

000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...