वृत्त क्र. 1088
निर्भय वातावरणात मोठ्या संख्येने
मतदार केंद्रावर येतील हे सुनिश्चित करा - विभागीय आयुक्त दिलीप गावडे
• लोकसभा, विधानसभेची आढावा बैठक
• लोकसभा, विधानसभा संदर्भिकेचे प्रकाशन
नांदेड दि. 14 नोव्हेंबर :- मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा निर्माण करा. सर्व मतदार निर्भय वातावरणात लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतील याची खातरजमा प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्याने घेणे आवश्यक आहे. केवळ निवडणूक निर्णय अधिकारी नव्हे तर आपल्या प्रत्येकांची ही जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवा, असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी आढावा बैठक घेतली. नांदेड जिल्ह्यामध्ये 1999 नंतर प्रथमच लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एकत्रित होत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणूक यंत्रणेला अन्य जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेपेक्षा उपलब्ध मनुष्यबळ कुशलतेने वापरणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात मतदान केंद्रावरील नियोजन आवश्यक आहे. मतदाराला मतदान केंद्रावर सर्व पायाभूत सुविधा मिळाव्यात, तसेच हिवाळ्यात होणारी ही निवडणूक लक्षात घेऊन आवश्यक वीज पुरवठा त्या-त्या ठिकाणी उपलब्ध असेल यासाठी देखील सर्वांनी जागरूक रहावे. येत्या 20 तारखेला मतदान आहे. तेंव्हा ज्या ठिकाणी सुविधांमध्ये काही कमी असेल तर पूर्ण करण्यात यावी.
या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनास कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तथा नोडल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्ह्यामध्ये मतदानाची आकडेवारी वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाबाबत त्यांनी जाणून घेतले. नोडल अधिकारी मिनल करनवाल व डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्याकडून माहिती घेतली. निवडणूक सिजर व्यवस्थापन कक्षाबाबत व कायदा व सुव्यवस्थेबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी माहिती दिली. मतदान केंद्रावरील सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी दिली. याकाळात जिल्ह्याच्या विविध भागात दिलेल्या भेटीचा तपशील त्यांना दिला. तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची माहिती नोडल अधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी दिली. आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्थेची संदर्भात दाखल झालेले गुन्हे व जिल्ह्यामधील परिस्थितीबाबत नोडल अधिकारी महेश वडदकर यांनी माहिती दिली. निवडणुकीच्या संदर्भातील माहिती व्यवस्थापनाची तसेच निवडणूक आयोगाच्या सूचना व संपर्काची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने यांनी दिली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश पाटील, निवडणूक निर्णय कक्षाचे नोडल अधिकारी प्रशांत शेळके, इव्हीएम कक्षाचे अजय शिंदे, साहित्य स्विकृती कक्षाच्या नोडल अधिकारी रुपाली चौगुले, मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी संजीव मोरे, संगणक व माहिती तंत्रज्ञान कक्षाचे नोडल अधिकारी प्रफुल कर्णेवार, सिव्हिजील कक्षाचे नोडल अधिकारी गंगाधर इरलोड, निवडणूक खर्च तपासणी संदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन पक्कवाने, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाबाबत जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
संदर्भिकेचे प्रकाशन
यावेळी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या संदर्भिकेचे प्रकाशन केले. जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय कार्यालयाला ही पुस्तिका वितरीत करा. तसेच सर्व माध्यम प्रतिनिधींपर्यंत ही पुस्तिका पोहोचेल यासंदर्भात दक्षता घ्या, असे आवाहन त्यांनी केले. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून तर महाराष्ट्राच्या निर्मिती पासूनच्या विधानसभेच्या निवडणुकीची माहिती यामध्ये आहे. या संदर्भिकेचे त्यांनी कौतुक केले.
00000
No comments:
Post a Comment