Friday, August 30, 2019


'मराठवाडा वॉटर ग्रीड'साठी
११ धरणे लूप पद्धतीने जोडणार

मुंबई, दि. 30: मराठवाड्याच्या सुमारे 2 कोटी लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी योजनेचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
या योजनेंतर्गत 1 हजार 330 किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येईल. 11 धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव) लूप पध्दतीने जोडण्यात येतील. त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी 3 हजार 220 किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे.
 बीड जिल्ह्यासाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य व दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा यासह विविध ठिकाणी अनुषंगिक कामांसाठी 4 हजार 802 कोटींच्या पहिल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. हे पाणी  पिण्यासाठी, शेती व उद्योगासाठी वापरण्यात येईल. या प्रकल्पासाठी इस्त्रायलच्या मे. मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
 कमी सरासरीने व असमान पडणारा पाऊस, भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात झालेली घट, भूजल व भुपृष्ठावरील  पाण्याच्या साठ्यात होणारी घट, टँकरच्या संख्येत होणारी वाढ  तसेच सन 2016 मध्ये लातूर शहरास रेल्वेद्वारे करण्यात आलेला पाणीपुरवठा ही परिस्थिती लक्षात घेता मराठवाड्यात वॉटर ग्रीड निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
००००



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...