Friday, August 30, 2019


वृ.वि.2313
30ऑगस्ट, 2019
विशेष वृत्त :


राज्यातील ४३ निसर्ग पर्यटनस्थळांचा विकास पूर्ण
१३९ स्थळांच्या विकासासाठी निधी वितरित
- सुधीर मुनगंटीवार
           
मुंबई, दि. ३०: महाराष्ट्रातील ४३ निसर्गपर्यटन स्थळांचा परिपूर्ण विकास करण्याचे काम पूर्ण झाले असून आणखी १३९ निसर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधीचे वाटप करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
राज्यातील ३४७ निसर्ग पर्यटन स्थळांपैकी १८९ पर्यटनस्थळांचे आराखेडे मंजूर झाले आहेत. यासाठी ३५१ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून आतापावेतो २८४ कोटी रुपये खर्च झाल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.
निसर्ग पर्यटनाकडे लोकांचा असलेला कल लक्षात घेऊन त्यांना अधिक  सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २०१५ मध्ये महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाची स्थापना केली. या मंडळामार्फत आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय बाबी लक्षात घेऊन जबाबदार निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.  होम स्टे, पर्यटक मार्गदर्शक, पर्यटकांसाठीची वाहने, यासारख्या विविध प्रकारातून स्थानिकांना रोजगार निर्मिती आणि त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता करून दिली जात आहे.
वनांच्या बफर आणि कॉरिडोर क्षेत्राचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास केल्यास पर्यटकांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देता येतील. राज्याच्या वनक्षेत्रात असलेल्या किल्ल्यांमध्ये साहसी खेळांना चालना देण्यात येणार आहे.  निसर्ग पर्यटन मंडळाकडून निसर्गानुभव उपक्रम राबविला जातो. जिल्हा परिषदा आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना एक दिवसासाठी जंगलभ्रमंतीसाठी नेले जाते. त्यांना वन आणि वन्यजीवांचे महत्व सांगून संरक्षण आणि संवर्धनात सहभागी करून घेतले जाते. 
इको टुरिझम सर्किट
राज्यात "इको टुरिझम सर्किट" विकसित करणार असल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात १२४ वन उद्याने,४३ ऐतिहासिक किल्ले, ६ व्याघ्र प्रकल्प,, ३३ वन्यजीव अभयारण्ये, ५२ धार्मिक स्थळे, ५५ निसर्ग पयर्टन स्थळेृत, ५ हिल स्टेशन्स आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे मुंबई महानगरालगतचे उद्यान आहे महाराष्ट्र हे  गड-किल्ले, सागरतटीय पर्यटन, जंगलभ्रमंती, अध्यात्मिक पर्यटन, साहसी पर्यटन यासारख्या  सर्व प्रकारच्या पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्य आहे. स्थानिकांच्या रोजगारनिर्मितीसाठी पर्यटन हे राज्याचे  मोठे शक्तीस्थान आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच निसर्ग पर्यटन मंडळ  विविध उपक्रम राबवत असल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
0000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...