वृत्त क्रमांक 577
शिवस्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीला नवचैतन्य देणारी :
पालकमंत्री अतुल सावे
शिवस्वराज्य दिन जिल्हा परिषदेत उत्साहात साजरा
नांदेड, 6 जून :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शिवस्वराज्य दिन हे नव्या पिढीला प्रेरणा व नवचैतन्य देणारे स्मरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने 2021 पासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारण्यात आली, शिवशक राजदंड व गुढीचे पूजनही करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी पालकमंत्री अतुल सावे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवला.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला सुशासनाचा आदर्श आजही प्रशासकीय कार्यपद्धतीसाठी दिशादर्शक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या लोककल्याणकारी धोरणांचा आदर्श घेत जिल्हा परिषद ग्रामीण विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्रांगणात उभारलेल्या दोन गाळ्यांची चावी तिरंगा महिला प्रभाग संघाकडे सुपूर्द करण्यात आली. या गाळ्यांमध्ये महिला बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार असून दुसऱ्या गाळ्यात कॅन्टीन चालवले जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने खिचडी, मसाला दूध व जिलेबीचे वाटप करण्यात आले. शाहीर रमेश गिरी व त्यांच्या संचाने शिवचरित्रावर आधारित पोवाडा व गीत सादर करून वातावरण शिवमय केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी व मिलिंद व्यवहारे यांनी केले.
या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणेचे संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी
राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, जल जीवन मिशनचे
प्रकल्प संचालक नारायण मिसाळ,
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. संगीता देशमुख,
शिक्षणाधिकारी माधव सलगर,
समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, जिल्हा
पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment