Friday, June 6, 2025

 वृत्त क्रमांक 578 

भविष्यातील शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारेच शक्य 

विकसित कृषि संकल्प अभियानाचा आठवा दिवस 

नांदेड, 6 जून :- विकसित कृषि संकल्प अभियानाच्या 5 जून रोजी आठव्या दिवशी आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगावर भर देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, कापूस लागवड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असून, त्याद्वारे उत्पादनवाढ, मातीची गुणवत्ता सुधारणा आणि कीड व्यवस्थापन अधिक प्रभावी होऊ शकते. काल 5 जूनचे कार्यक्रम देगलूर तालुक्यातील येरगी, शिवणी, देवापुर व धर्माबाद तालुक्यातील बेलूर, करखेली, बाभुळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या गावांमध्ये ड्रोन तंत्रज्ञान, अचूक सिंचन प्रणाली, संकरीत बियाणे आणि कीड व्यवस्थापनासाठी सटीक उपाय यासारख्या आधुनिक संकल्पनांवर सखोल चर्चा झाली. 

विशेषतः कापूस शेतीसाठी रोपसंपादन, स्मार्ट सिंचन पद्धती, कीटकनाशकांचा नियंत्रित वापर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, कापूस लागवडीसाठी संकरीत बियाणे, जलसंवर्धन तंत्रज्ञान आणि कीड नियंत्रणासाठी जैविक उपायांचा अवलंब केल्यास उत्पादनाची गुणवत्ता वाढू शकते. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. 

या वेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शिरगुरे, शास्त्रज्ञ श्री. डमाळे, ऊस संशोधन संस्था, प्रवरानगरचे डॉ. थोरात व डॉ. बोरसे, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. कपिल इंगळे, डॉ. प्रियंका खोले, श्री. वेंकट शिंदे यांची उपस्थिती लाभली. कृषी विभागाचे उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर श्री. विठ्ठल गीते, मंडळ कृषी अधिकारी धर्माबाद श्री. व्ही. बी. चंदापुरे आणि बीटीएम धर्माबाद श्री. एस. एस. गुंडावार यांनीही सहभाग घेतला.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते. अभियानाचे आयोजक यांनी शेतकऱ्यांना कापूस लागवडीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अधिक माहिती देण्यासाठी पुढील मार्गदर्शन सत्राचे निमंत्रण दिले आहे.

00000




No comments:

Post a Comment

15.7.2025.