Wednesday, September 4, 2024

विशेष वृत्त क्र. 805 

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले दर्शन 

नांदेड, दि. 4  सप्टेंबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. 

यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा पारंपारिक पद्धतीने शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती महोदयांच्या कन्या इतीश्री याही उपस्थित होत्या. त्यांचाही यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सचखंड गुरुद्वाराचे प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंगजी, सल्लागार जसवंतसिंग बॉबी, अधिक्षक राज देविंदरसिंगजी, पुजारी बाबा ज्योतिदरसिंगजी जत्थेदार, संत बाबा बलविंदरसिंगजी आदींची उपस्थिती होती. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची लंगरला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुद्वारा येथील दर्शनानंतर तेथे असलेल्या लंगरला भेट देवून पाहणी केली व समाधान व्यक्त केले. 

पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लाभार्थी कटलरी व किचन्स, खेळणी व्यवसायिक केतन लक्ष्मण कळसकर व फळे आणि ज्यूस व्यवसायिक समशेरसिंग लालसिंग राठोड यांच्या स्टॉलला भेट देवून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

0000
































No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...