वृत्त क्र. 454
खरीप हंगाम पिक स्पर्धा-2023 शेतकऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 28 :- खरीप हंगाम पीक स्पर्धा 2023 कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकासाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाने केले आहे.
पिक स्पर्धेसाठी ठळक वैशिष्टे –
मूग व उडीद पिकासाठी पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारणगटासाठी रक्कम ३०० रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहिल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
पिकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिसाचे स्वरुप सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे. तालुका पातळी बक्षिसे रुपये पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये तर तिसरे 2 हजार रुपये तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसरे बक्षीस 5 हजार रुपये, राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रुपये राहिल. खरीप हंगाम 2023 साठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुग व उडीद पिकासाठी 31 जुलै पुर्वी तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment