Saturday, January 7, 2017

दंगलच्या संवेदनशील पर्वणीने खुलले
मुलींचे चेहरे ;आनंदासह... प्रेरणाही घेऊ...
जिल्हाधिकारी काकाणी यांच्यामुळे दंगल पाहण्याची संधी
नांदेड, दि. 7 :- एखाद्या सुंदर कलाकृतीचा रसास्वाद स्वतः घेण्यात आनंदच असतो. पण हा आनंद द्विगुणीत होतो, तो ही कलाकृती इतरांबरोबरच अनुभवण्यातून. अशाच अनुभवामुळे आज काही मुलींच्या चेहऱ्यावर अनोखे हास्य फुलले.. आणि समोर आलेल्या कलाकृतीतून प्रेरणा घेण्याची जिद्दही व्यक्त झाली. निमित्तं होतं  जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या दंगलचित्रपट पाहण्याच्या अनोख्या संधीचं. शहरातील अनाथालयातील काही मुलींना ही संधी साधता आली. यामुळे शाम टॅाकीजमध्ये दंगलचा सायंकाळचा शोही आगळा ठरला.
ख्यातकिर्त मल्ल महावीरसिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत, आणि कुस्तीच्या क्षेत्रात त्यांच्या मुलींनी मिळविलेली जागतिक किर्ती या अनुषंगाने दंगल चित्रपटाची निर्मिती झाली आहे. दंगलची कहाणी आणि मांडणीही मुलींसाठी प्रेरणादायी आहे. अशा या उत्कृष्ट चित्रपटाविषयी चर्चा करताना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना कल्पना सुचली, उत्कृष्ट चित्रपट आपण नेहमीच पाहतो. पण विशेषतः मुलींसाठी प्रेरणादायी असलेला, मुलींसाठी कोणतेही क्षेत्र वर्ज्य नसल्याचा संदेश हा चित्रपट देतो. मग हा चित्रपट पाहण्याचा आनंद द्विगुणीत करता येईल. तोही असा चित्रपट पाहण्याची संधी अभावानेच उपलब्ध होणाऱ्या मुलींना ही संधी उपलब्ध करून देण्यातून. त्यातूनच जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सहकाऱ्यांना ही कल्पना बोलून दाखविली आणि ती लगेच प्रत्यक्षातही आणली. शहरातील मिनाक्षी महिला मंडळ संचलित सुमन मुलींचे बालगृह आणि राणीलक्ष्मीबाई महिला मंडळ संचलित पितृछाया बालकाश्रमातील मुलींसाठी शाम टॅाकीज येते दंगल चित्रपट पाहण्याची व्यवस्था करण्यात आली. सुमारे बेचाळीसहून अधिक मुलींनी हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.
दंगलची ही पर्वणी अनुभवण्यासाठी आलेल्या या मुलींचे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. याबाबत जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले, मुलींसाठी हा चित्रपट आनंददायी ठरेल, तर दुसरीकडे तो प्रेरणादायी ठरेल, या विश्र्वासातून ही कल्पना सुचली. चित्रपट आपण नेहमीच पाहतो पण पाहण्याची संधी मिळते. पण अशी संधी नसलेल्या मुलींना ही संधी उपलब्ध करून देण्यातही मोठे समाधान आहे.
यावेळी महिला व बालविकास अधिकारी एस. व्ही. शिंगणे, सहायक करमणूक कर अधिकारी मकरंद दिवाकर, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, शाम टॅाकीजचे शामसेठ बिसेन, गोपालसेठ बिसेन, व्यवस्थापक महावीरसिंह चौहान, बालकाश्रमांचे पदाधिकारी ललिता कुंभार, अनिल दिनकर आदींची उपस्थिती होती.
दंगलची पर्वणी आनंददायी..यातून प्रेरणाही घेऊ - कांचन आणि उमा
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी हा चित्रपट पाहण्याची ही संधी उपलब्ध करून दिली. हा क्षण आमच्यासाठी आनंददायी तरच आहे. पण यातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न करू. मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. हे सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटाविषयी खूप ऐकून होतो. पण तो प्रत्यक्ष अनुभवण्याची  संधी जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून दिली, ही बाबही आमच्यासाठी खूप मोठी आहे, अशा आशयाची प्रतिक्रीयाही दंगल चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या कांचन व उमा या दोघींनी व्यक्त केली.

00000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...