Saturday, January 7, 2017

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे
काटेकोर पालन करावे - जिल्हाधिकारी काकाणी
विविध यंत्रणा तसेच राजकीय पक्षांची बैठक संपन्न
नांदेड, दि. 7 :- भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ विधानपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. सर्व यंत्रणांनी मतदारांना प्रभावित करणाऱ्या बाबींबाबत सतर्क रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. शिक्षक मतदार संघ विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते.
बैठकीस महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, उपवनसंरक्षक सुजय डोडल, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, डीआरडीएचे सहायक प्रकल्पाधिकारी प्रवीणकुमार घुले, जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात आदींची उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमाची बैठकीत माहिती देण्यात आली. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांवरील जबाबदाऱ्यांबाबत आढावा घेण्यात आला.  मतदारसंघासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार नांदेड जिल्ह्यातील मतदारांची संख्या 9 हजार 45 इतकी आहे. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. निवडणुकीसाठी मंगळवार 10 जानेवारी रोजी अधिसूचना जाहीर करण्यात येईल. त्यानुसार मंगळवार 17 जानेवारी नामनिर्देशनपत्र दाखल कऱण्याची अंतिम मूदत आहे. त्यानंतर शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. तर सोवार सहा फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील मतदारांसाठी 29 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, त्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी श्री . काकाणी बैठकीत प्रचार कार्यालय, पोस्टर्स तसेच भित्तीपत्रके, विश्रामगृहांचा वापर, धार्मिकस्थळांचा निवडणुकीसाठी वापर करण्यास प्रतिबंध, प्रचारासाठीच्या वाहनांचा वापर या अनुषंगाने विस्तृत अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. शिक्षक मतदारांना प्रभावित करू शकतील अशा कार्यक्रमांबाबत दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी स्थिर पथक, भरारी पथक आणि केंद्रीय पथक यांद्वारे अवैध अशा गोष्टींवर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देशही दिले. आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभाग ,तसेच विक्रीकर विभाग यांचा सहभाग घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या तयारींच्या अनुषंगानेही चर्चा झाली व विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
निवडणुकीसाठी राजकीय पक्ष प्रतिनिधींचीही बैठक संपन्न
विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिंधीची बैठकही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत मतदान व मतमोजणी प्रतिनिधींच्या नियुक्तीबाबत, प्रचार कार्यालये, मतदान केंद्रांची निश्चिती याबाबत चर्चा झाली. मतदान केंद्रांची स्थिती, तेथील सुविधांबाबत वेळीच दखल घ्यावी. मतदान शांततेत व सुरळीत पार पडेल यासाठीच्या सुविधांबाबत दक्ष रहावे, असेही  निर्देशही देण्यात आले.बैठकीस उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.



-------

No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...