Monday, January 9, 2017

अपघातविरहीत जीवनासाठी वाहतूक नियमांची
स्वयंशिस्त बाळगा - जिल्हाधिकारी काकाणी
रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन 
नांदेड, दि. 9 :- अपघातविरहीत जीवनासाठी वाहतुकीच्या नियमांबाबत स्वयंशिस्त बाळगणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड  व शहर वाहतूक शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी श्री. काकाणी बोलत होते.
28 व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह व राष्ट्रीय पंधरवड्याचे उद्घाटन आज येथे वजिराबाद शहर वाहतूक शाखेच्या प्रांगणात झाले.  याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, महेंद्र पंडीत, प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर, पोलीस उपअधीक्षक विश्र्वंभर नांदेडकर, अशोक बनकर, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, शहर वाहतूक शाखेचे प्रमुख विलास नारनवर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काकाणी पुढे बोलताना म्हणाले की, अपघातांची अनेक कारणे आहेत. पण त्यामध्ये स्वयंशिस्त हे महत्त्वाचे कारण आहे. स्वयंशिस्त ही अनेक गोष्टींत बाळगावी लागते. त्यामध्ये वाहतुकीचे नियम पाळणे, वाहनाला सुस्थितीत ठेवणे, चालकाच्या शारिरीक क्षमतेचे विचार करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहनांच्या क्षमतेचा विचार करून भार-प्रवाशी वाहतूक, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे यांचा अंतर्भाव होतो. वाहतूक शिस्तींची माहिती सर्व घटकांत पोहचणेही महत्त्वाचे आहे. शाळा, महाविद्यालयांपासून अनेक घटकांनी स्वयंप्रेरणेने वाहतूक आणि रस्ते सुरक्षेचे नियमांबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून या घटकांनी स्वयंप्रेरणेने रस्ता सुरक्षा अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अप्पर पोलीस अधीक्षक बारगळ म्हणाले की, वाहनांची संख्या वाढते आहे. पण रस्त्यांची लांबी-रुंदी, त्या वेगाने वाढत नाही. रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन आणि शिस्तीबाबत सर्वसामान्यांचा सहभागही आवश्यक आहे.
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. मनवर यांनी अपघाताच्या विविध कारणांबाबत मिमांसा केली. यंदा तुमची सुरक्षा, तुमच्या कुटुंबियांचे संरक्षण करते, रस्ते सुरक्षांबाबत जागरूक रहा असे घोषवाक्य घेऊन सुरक्षा अभियान राबविण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरवातीला अभियानाची माहिती देणाऱ्या भित्तीपत्रकांच्या दालनाचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. रस्ते सुरक्षेबाबत जनजागृतीपर प्रकाशित विविध माहितीपत्रकांचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. मोटार वाहन निरिक्षक सविता पवार यांनी सुत्रसंचालन केले. सहायक परिवहन अधिकारी श्री. तिराणकर यांनी आभार मानले.
पालकांनो स्वतः शिस्त पाळा
जिल्हाधिकारी काकाणी यांनी शहरी आणि ग्रामीण वाहतूक त्यातील अपघतांची कारणे याबाबत विश्र्लेषण केले. शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन पालकांनी स्वतःपासून करावे. जेणेकरून शिक्षणासाठी दुचाकींचा वापर करणाऱ्या पिढीलाही त्यातून प्रेरणा घेता येईल. वाहतूक शिस्तींचे पालन स्वतःपासून केले, तर पुढच्या पिढीचे जीवन अपघात विरहीत होईल. यासाठी सर्वच घटकांत जाणीव-जागृती वाढीस लागावी, अशी अपेक्षाहीत त्यांनी व्यक्त केली.

00000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...