Tuesday, October 8, 2024

 वृत्त क्र. 916

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानात गुरुवारी नांदेड येथे भव्य महिलांचा महामेळावा 

·         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

·         कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन

·         वाहतुक व्यवस्थेसाठी दोन स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था

·         विविध पथदर्शी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण

नांदेड दि. 8 ऑक्टोबर :  महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसह अनेक पथदर्शी योजना आणल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीतून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. या योजनातील लाभार्थी महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी 10 ऑक्टोबरला नांदेड येथे भव्य महिला मेळावा होत आहे.

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे  गुरुवारी 10 ऑक्टोबर 2024 रोजी नांदेड येथे महिला सशक्तिकरण अभियानाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत.

नांदेड येथील नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भव्य होणाऱ्या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री  तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, हिंगोलीचे खासदार नागेश बापूराव पाटील आष्टीकर, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची उपस्थिती असणार आहे.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमाची सुरुवात राज्यमाता-गोमाता पुजनाने होणार असून त्यानंतर लखपती दीदी व इतर स्टॉलचे  उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

 त्यानंतर मुख्यमंत्री व मान्यवर लाभार्थ्यांशी भेट घेवून हितगुज करतील. यावेळी पोलीस बँडवर राज्यगीत सादर करण्यात येईल. तसेच यावेळी प्रशासनाच्यावतीने मान्यवरांचे स्वागताचा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभ वितरण करण्यात येणार आहे.

 वाहनतळाची व्यवस्था 

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातून विविध योजनाचे लाभार्थी व नागरिक यांची मोठया संख्येने येणार असून त्यासाठी प्रशासनाच्यावतीने 249 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेससाठी नांदेड शहरात दोन वाहनतळाची व्यवस्था केली आहे. नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मैदानावर नांदेड मनपा, नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, हिमायतनगर या तालुक्यासाठी 170 बसेससाठी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. तर यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हदगाव, नायगाव, बिलोली, उमरी, धर्माबाद, मुखेड, देगलूर, कंधार व लोहा या तालुक्यासाठी एकूण 129 बसेस पार्किंगची व्यवस्था केली आहे. नांदेड येथील वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठीही नियोजन केले आहे.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी प्रशासनाच्यावतीने सुक्ष्म नियोजन केले असून कार्यक्रमासाठी येणाऱ्या माध्यम प्रतिनिधीसाठी वेगळी आसन व्यवस्था केली आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणाहून प्रत्येक योजनेचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येणार असून येणाऱ्या नागरिकांसाठी भव्य मंडपाची व्यवस्था केली आहे.

00000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 954 राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे -           जिल्हाधिकारी अभिजीत राऊत • राजकीय पक्षांचे प्...