Friday, July 28, 2023

 जिल्ह्यात 57 मंडळांमध्ये 28 जुलै रोजी

अतिवृष्टीची नोंद  

 

जिल्हा प्रशासनाने संपूर्ण क्षमतेसह

बचाव कार्यासाठी शक्ती लावली पणाला

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 28 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने धर्माबाद, बिलोली, देगलूर, मुखेड, नांदेड, मुदखेड, किनवट, अर्धापूर, उमरी, लोहा आदी  तालुक्यातील 57 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. पुराचे पाणी अनेक गावात शिरले. मोठ्याप्रमाणात विद्युत पुरवठा खंडीत झाला. मुखेड व इतर तालुक्यात विद्युत खांब खाली पडल्यामुळे लोकांना अडचणीला सामोरे जावे लागले. किनवट, बिलोली, धर्माबाद तालुक्यात मंडळातील काही गावात लोक पुरात अडकले. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासह प्रशासनाने सर्व विभागाच्या समन्वयातून अहोरात्र मेहनत घेऊन मदत पोहचविली. या मदत कार्यात अनेक गावात स्थानिक नागरिकांनी आपली कर्तव्य भावना जपत प्रशासनासमवेत मदतीचे हात मजबूत केले. या अतिवृष्टीमध्ये तालुकानिहाय घडलेला घटनाक्रम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने पुढीलप्रमाणे दिला आहे.  

 

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात दि. 27 जुलैच्या रात्रीपासून पाऊस थांबलेला आहे. किनवट तालुक्यातील चिखली खु. येथे नाल्याचा पूर ओसरला आहे परंतु रस्ता बंद आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक चालू आहे. बेल्लोरी किनवट येथील बेलोरी नाल्यावरून एक व्यक्ती वाहुन गेले अशोक पोशट्टी दोनेवार वय अंदाजे 40 पुरात वाहुन गेला. भोई समाजाचे लोक मदतीला घेऊन शोध बचाव कार्य चालु आहे तहस‍िलदार किनवट यांच्‍याकडुन माहिती प्राप्‍त झाली आहे. किनवट तालुक्‍यातील इस्लापूर येथील साईबाबा मंदिराजवळील 27 जुलै रोजी नाल्याचे पाणी पुलावरून जात असताना हर्दुके नावाचे इसम वय अंदाजे 55 वर्ष पाण्यात अडकले होते. या इसमाचा बचाव करण्यासाठी महसूल विभागाचे तलाठी बालाजी वसमतकर हे स्वतः पाण्यात उतरून सदर इसमाला धोक्याच्या पातळी बाहेर काढले.त्यानंतरही पाण्याचा प्रवाह वाढतच होता.वाढणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर आत्ता  पूर्णपणे बाहेर येणे शक्य नव्हते.त्यामुळे पुढे मंडळ अधिकारी,शिवनी आणि पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने जेसीबीच्या मदतीने सदर इसम व तलाठी वसमतकर याना सुखरूप बाहेर काढले. एका इसमाच्या बचावासाठी महसूलचे तलाठी बालाजी वसमतकर यांनी दाखविले प्रसंगावधान आणि धाडस कौतुकास्पद आहे अशी सर्वत्र चर्चा होत आहे.

 

मुखेड तालुका  मौजे राजुरा बु. येथील युवक प्रदीप साहेबराव बोयाळे वय वर्ष 25 पाण्याच्या प्रवाहात वाहुन  गेल्याची प्राथमिक माहिती असून मृतदेह सापडला आहे. उमरी-मुदखेड रस्ता रेल्वे पुलाच्या खाली पाणी असल्यामुळे मागील 8 दिवसापासून बंद आहे. धर्माबाद तालुक्यातील बनाळी येथे अति पावसामुळे 60 ते 70 कुटुंबाचे दोन बसेस द्वारे धर्माबाद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलेले आहे. उमरी तालुक्यात बेलदरा ते उमरी रस्ता बंद आहे.

 

मुदखेड तालुक्यात आनंदराव गुंडाजी पवार, गयाबाई आनंदराव पवार, गजानन आनंदराव पवार, लता गजानन पवार, आनंद गजानन पवार, मिना आनंदराव पवार हे वैजापूर पारडी येथे घराला पुराच्या पाण्याने घेराव घातला आहे. सीता नदी वैजापूर. स्थानिक लोकांनी या लोकांना सुखरूप बाहेर काढल्याचे तहसिलदार मुदखेड यांनी कळविले आहे. नायगाव कोपरा येथील पुल तुटला आहे. मुदखेड तालुक्‍यातील नागेली गावामध्ये मातंग वाडा येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 25  व्यक्तींना सुरक्षित जागी (समाज मंदिर) हलवण्यात आले आहे. मुदखेड तालुक्‍यातील शेंबोली गावामध्ये शंबोली फाट्या वरील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 30   व्यक्तींना सुरक्षित जागी (प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबोली) हलवण्यात आले आहे. मुदखेड तालुक्‍यातील बारड गावातील 12 (सुभाष रुखाजी व‍िशी वय 36 वर्षरंजना सुभाष व‍िशी 30 वर्षराम सुभाष व‍ि‍शी 8 वर्षकृष्‍णा सुभाष व‍िशी 5 वर्षद‍ि‍व्‍या सुभाष व‍ि‍शी 4 वर्षराजाराम मारुती फुलारी-36 वर्षसंजय सदाशीव देशमुख 35 वर्षचंद्रकांत धोंडीबा वसुमते 30 वर्षमनोज प्रकाशराव देशमुख 37 वर्षकौशल नवनाथ देशमुख 17 वर्षप्रकाश गणेशराव देशमुख 32 वर्षसाईनाथ दत्‍ता वसुमते 32वर्ष) जणांना एसडीआरएफ टीमने सुखरुप बाहेर काढले. मुदखेड तालुक्‍यातील बारड गावांमध्ये इंदिरानगरशंकरनगर पांदन व भीमनगर येथील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 10  कुटुंबातील 35  व्यक्तींना सुरक्षित जागी (गावातील नातेवाईक यांचेकडे) हलवण्यात आले व इतर कुटुंबासाठी जि. प. येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मुदखेड तालुक्‍यातील बोरगांव स‍िता या गावातील 2 शेतकरी रामकिशन माधव धबडगे व मारोती माधव धबडगे असे एसडीआरएफ टीमने सुखरुप बाहेर काढले. मुदखेड तालुक्‍यातील हजापूर येथील पुरात अडकलेले शेतकरी दिलीप वामनराव कदम वय 54 यांची सुखरूप रेस्क्यू करण्यात आलेली आहे. मुदखेड तालुक्‍यातील सरेगाव गावामध्ये पाणी शिरल्यामुळे-23 कुटुंबातील-87 व्यक्तींना सुरक्षित जागी (गावातील त्यांचा नातलगांच्या घरी) याठिकाणी हलवण्यात आले.

 

अर्धापुर तालुक्‍यातील लोणी खु. येथील मंदीरात पुराच्‍या पाण्‍यात अडकून बसलेल्‍या एका व्‍यक्‍तीस माधव फुलाजी सोळंखे यांना स्थानिक ग्रामस्थांच्या बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले.अर्धापुर तालुक्‍यातील स्वप्नील शंकरराव कदम वय 26 वर्ष रा. कोंढा ही व्यक्ती मौ. गणपूर येथे पुराच्या पाण्यामध्ये विद्युत खांबावर लटकून मागील 2 तासापासून अडकून होता. यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या रेस्क़्यु ऑपरेशन मध्ये एसडीआरएफ टीमच्या सहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

 

धर्माबाद पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे बनाळी गावातल्या एका परिवाराला पुरात वाहून जाताना जीवनदान. पीआय अभिषेक शिंदे, एपीआय जाधववर, पीएसआय पंतोजीजमादार सोमनाथ मठपती इत्यादी सर्वांनी मिळून पांचाळ कुटुंबीयांना बाहेर काढले. धर्माबाद तालुक्यात बनाळी येथील स्थलांतरित करण्यात आलेल्या एकूण 234 नागरिकांपैकी सद्यस्थितीत एकूण 150 नागरीक अजून धर्माबाद येथील जिल्हा परिषद शाळेत तात्पुरत्या निवाऱ्यात आहेत. आता बनाळी येथे अडचण नाही सर्वांची राहाणेची आणि जेवणाची व्यवस्था प्रशासनाने जिल्हा परिषद शाळा येथे केली आहे.

                        

उमरी तालुका-सावरगाव कला येथील तलाव ओव्हरफ्लो झाला आहेतूर्तास गावाला धोका नाही. धर्माबाद तालुका-मो. सिरजखोड ब्रीज पाण्याखाली गेल्याने बामणीविलेगाव,संगम,मनुर या गावाचा संपर्क तुटला आहे. त्यांना पर्यायी मार्ग कुंडलवाडी आहे. भोकर तालुक्‍यात मौ.नांदा म्‍हेता येथे 15 ते 16 घरात पाणी श‍िरुन जनावरे व धान्‍यांची हानी झालेली आहे.

 

नांदेड शहरातील-विठ्ठल रामचंद्र कापावार वय 40 राहणार बसवेश्वरनगर हडको येथील एक व्यक्ती काल लातूर फाटा येथून वाहून गेले होते 28 जुलै रोजी सकाळी मृतदेह सापडला आहे. नांदेड तालुक्‍यातील कासारखेडा गावात पुराच्‍या पाण्‍यात अडकलेले लोक-शेतमालकरजनी सूर्यकांत हळदे गट 335शेत गडीउत्तम विठल कल्याणकर 52 वर्षमीराबाई उत्तम कल्याणकर 45 वर्षलखन उत्तम कल्याणकर 25 वर्षवर्षा लखन कल्याणकर 20 वर्षलहान बाळ अक्षरा लखन कल्याणकर वय 10 महिने  असे 6 जणांना एसडीआरएफ टीमने सुखरुप बाहेर काढले. पासदगावच्या पुलावरून पाणी वाहत आहे. नांदेड-मालेगाव रोड, पोलीस स्टेशन भाग्यनगर व पोलीस स्टेशन लिंबगाव येथील पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी ठेवण्यासाठी संबंधित पोलीस निरीक्षक यांना सूचना केली आहे.

 

लोहा तालुक्‍यातील मौजे कापसी खुर्द येथील पावलाचे पाणी गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच्या वस्तीस तलाठी व मंडळाधिकारी यांच्यासह भेट दिली. रोडलगत मोठ्या नाल्या तुंबल्यामुळे वस्तीतील घरामध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. तसेच सदरील तुंबलेल्या नाल्या ग्रामपंचायतीने एक तासापुर्वी जेसीबीच्या साह्याने मोकळया केल्या असून तुंबलेले पाणी नालीद्वारे काढून देण्यात आले आहे. जवळपास 30 ते 40 लहान-मोठे नागरिक त्याच वस्तीलगत उंचावर व पाणी न गेलेल्या घरी सोयीनुसार थांबलेले आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था (खिचडी ) करण्यात आली आहे. लोहा तालुक्‍यातील कापशी खु. येथे राष्ट्रीय महामार्गालगत  पावसाचे पाणी काही लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. तहसि‍लदार व्‍यंकटेश मुंडे यांनी टीमसह भेट देत आहे तसेच करमाळा या गावात छोटा गाव तलाव अंशता फुटल्याने काही शेतकरी यांचे पीकांचे नुकसान होण्याची शकते.

 

दिनांक 27 जुलै रोजी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील बाबानगर, मगनपुरा, आनंदनगर, हमालपुरा, नाथनगर, अबचलनगर, बँक कॉलनी, टाऊन मार्केट, सहयोगनगर, खोब्रागडेनगर, हनुमानगड, दत्तनगर, सखोजीनगर, बालाजीनगर, शिवनगर, वाघीरोड, समीराबाग, तहुराबाग, श्रावस्तीनगर, हिंगोली गेट RUB, डॉक्टरलेन, हिंगोलीगेट खुराना ट्रॅव्हल्स ते बाफना टी पॉइंट, मिल्लतनगर, वाल्मिकीनगर, लक्ष्मीनगर, इकबालनगर, ममता कॉलनी, इस्लामपुरा, सिडको व हडको याठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले होते. साचलेले पाणी निचरा करण्यासाठी आवश्यकतेनुसार जेसीअी मशीन आणि मनुष्यबळ लाऊन पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. वाघी रोड येथील चुनाल नाल्यामध्ये पाणी वाढून समीरा बागच्या काही भागात पाणी शिरले होते. या ठिकाणी काही भागात नागरिक अडकले होते अग्निशमन विभागाच्या बचाव पथकाने या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच श्रावस्तीनगर मधून 48 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून यापैकी 6 नागरिकांना महापालिकेचे तात्पुरते निवाराकेंद्र नरसिंह विद्यालय येथे स्थलांतरित करण्यात आले. शहरात आनंदनगर जवळील जानकीनगर भागात 27 जुलै रोजी झालेल्या संततधार पावसामुळे नाल्यात एका अज्ञात इसमाचे शव 28 जुलै रोजी सकाळी आढळून आले आहे.

0000

अंगणवाडी कर्मचारी भरतीसाठी उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये - जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर.पी.काळम

वृत्त क्र. 459

 अंगणवाडी कर्मचारी भरतीसाठी उमेदवारांनी

कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये

-         जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर.पी.काळम

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदांची पदभरती प्रक्रिया चालू आहे. ही प्रक्रिया उमेदवारांच्या पात्रतेच्या निकषाप्रमाणे गुणवत्तेवर पारदर्शक करण्यात येत आहे.  इच्छूक उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना अथवा कसल्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर.पी. काळम यांनी केले आहे.

 

या प्रकरणी कुणीही व्यक्ती अथवा शासकीय अधिकारी वा कर्मचारी रक्कमेची मागणी करीत असल्यास त्यास विरोध करुन याची माहिती जिल्हा परिषदेस द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या दोन्हीही पदांसाठी महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार भरती करण्यात येत आहे. या शासन निर्णयानुसार उमेदवारांची शैक्षणिक अर्हता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावी. उमेदवार त्याच गावातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. तसेच विधवा व अनाथ उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्याचे निर्देश आहेत. याशिवाय पदवी, पदव्युत्तर पदवी, डीएड, बीएड तसेच एमएससीआयटी व अंगणवाडीच्‍या कामकाजाच्‍या अनुभवासाठी देखील अतिरिक्त गुण देण्‍यांचे निर्देश आहेत. याशिवाय जात प्रवर्गासाठी देखील अतिरिक्त गुणदान द्यावयाचे आहे.

 

ही भरती ही गुणवत्तेच्या आधारे व उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रानुसार गुणदान करण्यात येणार आहे. सर्वांत जास्‍त गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करण्यात येईल. यासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कार्यालयात 31 जुलै 2023 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर यादीवरील आक्षेप मागवून त्याचा निपटारा करण्यात येईल. गुणवत्तेच्या आधारे नियुक्तीस सर्व पात्र ठरलेल्या उमेदवारांना 15ऑगस्ट 2023 पर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

ई-पीक पाहणी नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 वृत्त क्र. 460

ई-पीक पाहणी नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 साठी ई-पिक पाहणी नोंदणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना तलाठयाकडे न जाता स्वत:च्या मोबाईलवरुन आपल्या सातबारावर विविध पिकाची नोंदणी करणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या ॲपमध्ये आतापर्यत सुमारे 1 कोटी 88 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करुन पिकांची नोंदणी केली आहे. खरीप हंगाम 2023 पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे 2.0.19 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी हे नवीन व्हर्जन अपडेट करुन घ्यावे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी 1 जुलै 2023 पासून सुरवात करण्यात आलेली आहे.

0000

दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ केल्यास होईल कार्यवाही

 वृत्त क्र. 458

दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ केल्यास होईल कार्यवाही

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  जिल्ह्यात अनेक ठिकाणी दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे आढळून येत आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत पथके निर्माण करुन या दूध व दुग्धजन्य पदार्थाची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत दोषी  आढळून येणाऱ्यांवर  कडक कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ केल्यामुळे उत्पादनात व मागणीमध्ये मोठया प्रमाणात तफावत निर्माण होवून या पदार्थाचा कृत्रिम फुगवटा निर्माण होत आहे. यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळत नाही. दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ मुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या अनुषंगाने दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

0000

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 वृत्त क्र. 457

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत

लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 अंतर्गत महाडिबीटी पोर्टलवर अर्ज घेणे सुरु आहे. या घटकात अनुसूचित जाती व  जमाती प्रवर्गाचे अर्ज लक्षांका पेक्षा कमी आहेत. यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व  जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत ड्रॅगन फ्रुट व स्ट्रॉबेरी लागवड, सामुहिक शेततळे, वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, 20 एचपीच्या आतील ट्रॅक्टर, पावरटीलर, पॅक हाऊस, कांदाचाळ इत्यादी घटकासाठी अर्ज करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

 वृत्त क्र. 456

इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

नांदेड (जिमाका) दि. 28 :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यारी येणारी  इ. 10 वीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट 2023 व इयत्ता 12 वीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधी आयोजित करण्यात आलेली आहे. तथापि राज्यातील काही जिल्ह्यामध्ये 28 जुलै 2023 रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे इयत्ता 10 वीच्या पुरवणी परीक्षेतील 28 जुलै 2023 रोजीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येवून ही परीक्षा 3 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात येणार आहे संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इ. 10 वी वेळापत्रकातील सामाजिक शास्त्रे पेपर 1 इतिहास व राज्यशास्त्र शुक्रवार 28 जुलै 2023 सकाळ सत्र 11 ते 1 या कालावधीत होणार होती. सदर परीक्षा सामाजिक शास्त्रे पेपर 1 इतिहास व राज्यशास्त्र गुरुवार 3 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत घेण्यात येईल. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इ. 10 वी पुरवणी परीक्षा लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील या बदलाची सर्व संबंधित माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक, परीक्षक, केंद्र संचालक व अन्य संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे महामंडळाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर शिल्पनिदेशकांची पदभरतीसाठी थेट मुलाखत

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर

शिल्पनिदेशकांची पदभरतीसाठी थेट मुलाखत

नांदेड (जिमाका) दि. 28 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पकारागीर योजनेतर्गंत शिल्पनिदेशकांची पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात निव्वळ तासिका तत्वावर भरावयाची आहेत. ही पदे सैध्दांतिक व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी भरावयाची आहेत. इच्छूक व पात्र उमेदवारांनी 4 ऑगस्ट 2023 पर्यत अर्ज सादर करावेत. उमेदवारांनी 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वा. मुळ व छायांकित कागदपत्रासह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

एमएमव्ही, फिटर, टर्नर, मेसन, ऑर्किटेक्ट असिस्टंट, फाऊर्डीमॅन, इंजिनिअरिंग ड्राईंग या व्यवसायासाठी मुलाखत होणार आहेत. या व्यवसायासाठी उमेदवार हा मेकॅनिकल, इलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रीकल, सिव्हील अभियांत्रिकी मधील किमान द्वितीय श्रेणीमध्ये पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असावा. त्यानंतर एक वा दोन वर्षाचा संबंधित व्यवसायातील अनुभव असावा. तसेच आयटीआय प्रमाणपत्रधारकांनी एनसीव्हीटी/एटीएस परीक्षा उत्तीर्ण व त्यानंतरचा तीन वर्षाचा अनुभव असावा. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. सध्या तासिका तत्वावरील सैध्दांतीक साठी 250 रुपये व प्रात्यक्षिकासाठी 125 रुपये प्रति तास याप्रमाण मानधन मिळेल असेही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने कळविण्यात आले आहे.  

00000

खरीप हंगाम पिक स्पर्धा-2023 शेतकऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन

 वृत्त क्र. 454

खरीप हंगाम पिक स्पर्धा-2023 शेतकऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  खरीप हंगाम पीक स्पर्धा 2023 कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तर भात, ज्वारीबाजरीमका, नाचणी (रागी), तूरसोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकासाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन नांदेड जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाने केले आहे.

पिक स्पर्धेसाठी ठळक वैशिष्टे –

मूग व उडीद पिकासाठी  पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै.  भातज्वारीबाजरीमकानाचणी (रागी)तूरसोयाबीनभुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारणगटासाठी रक्कम ३०० रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहिल.  स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे  आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची  भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्यजिल्हा  तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,  सातबारा, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशाबँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

 

पिकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिसाचे स्वरुप सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यासाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे. तालुका पातळी बक्षिसे रुपये पहिले हजार रुपयेदुसरे हजार रुपये तर तिसरे हजार रुपये तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजारदुसरे हजारतिसरे बक्षीस हजार रुपयेराज्य पातळीवर पहिले 50 हजारदुसरे 40 हजारतिसरे 30 हजार रुपये राहिल. खरीप हंगाम 2023 साठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुग व उडीद पिकासाठी 31 जुलै पुर्वी तर भातज्वारीबाजरीमकानाचणी (रागी)तूरसोयाबीनभुईमुग व सुर्यफुल खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 90.50 मि.मी. पाऊस

 वृत्त क्र. 455

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  90.50  मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 28 :- जिल्ह्यात शुक्रवार 28  जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी  90.50  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 559.10  मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

जिल्ह्यात शुक्रवार 28 जुलै 2023 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 156.30 (504.30), बिलोली-104.90 (680.80), मुखेड- 58.10 (542.60), कंधार-46.40 (280.10), लोहा-53.30 (382.30), हदगाव-55.70 (487.40), भोकर-80.70 (615.50), देगलूर-64.60(553), किनवट-72.30(766), मुदखेड- 151.80 (593.70), हिमायतनगर-57.30 (480.10), माहूर- 66.40 (772), धर्माबाद- 112 (649.90), उमरी- 124.90 (636.40), अर्धापूर- 201.40 (641), नायगाव-128.80 (504.80) मिलीमीटर आहे.

0000

                                             शेतकऱ्यांनी बियाणेखते व किटकनाशक खरेदी

करताना फसवणुक झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशक खरेदी करताना काळजी घ्यावी.  

खत बियाणे व इतर निविष्ठा खरेदी करताना फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी पुराव्यासह 9970630379 या व्हाटसप क्रमांकावर तक्रार पाठवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस बऱ्हाटे  यांनी केले आहे.

 

शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्याची काही विक्री केंद्रे सक्ती करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चढया भावाने निविष्ठांची विक्री करणे, बियाणेखते व किटकनाशके यांच्या खरेदीबाबत शेतकऱ्यांना तक्रार असल्यास पुराव्यासह दिलेल्या व्हाटसप क्रमांकावर पाठवावी. त्यावर शहानिशा करुन तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव पुर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे कृषी विभागाने कळविले आहे.

0000

 वृत्त क्र. 453

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  31  मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 27 :- जिल्ह्यात गुरुवार 27  जुलै रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात सरासरी  31  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 468.60  मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

जिल्ह्यात गुरुवार 27 जुलै 2023 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 15.40 (348), बिलोली-40.30 (575.90), मुखेड- 19.10 (484.50), कंधार-9.90 (233.70), लोहा-11.90 (329), हदगाव-25.30 (431.70), भोकर-57.90 (534.80), देगलूर-25.30(488.40), किनवट-78.30(693.70), मुदखेड- 28.60 (441.90), हिमायतनगर-43.30 (422.80), माहूर- 21.50 (705.60), धर्माबाद- 39.60 (537.90), उमरी- 34.50 (511.50), अर्धापूर- 25.90 (439.60), नायगाव-23 (376) मिलीमीटर आहे.

0000 

Wednesday, July 26, 2023

वृत्त

नांदेड येथून दिल्ली, मुंबई, अमृतसरसह इतर प्रमुख शहरांसाठी विमासेवेला मंजुरी


·         महाराष्ट्र शासन उडान अंतर्गत विमानसेवेसाठी होते आग्रही

·         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

·         उद्योग मंत्री सामंत यांनी मागील महिन्यात विमानतळावरच घेतली होती आढावा बैठक

·         नांदेड येथून पटना, बेंगलुरू, गोवा, पुणे, अहमदाबाद येथेही विमानसेवा 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड येथे सर्व सोई-सुविधांसह विमानतळ असूनही केवळ विमानसेवा सुरू नसल्याने येथील विमानतळ बंद पडण्याच्या मार्गावर होते. नांदेड येथे येऊ इच्छिणाऱ्या शीख भाविकांसह इतर उद्योग व्यवसाय जगताशी निगडीत बहुसंख्य प्रवाशांची विमानसेवा नसल्याने गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर व्हावी व नांदेड जिल्हा देशातील प्रमुख महानगरांशी विमानसेवेने जोडला जावा यादृष्टिने महाराष्ट्र शासन उडान योजनेंतर्गत आग्रही होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेऊन नांदेड जिल्ह्यासाठी आता अधिक भर घालून नवी भेट दिली आहे. फ्लाय 91, स्पाईस जेट व स्टार एअर या 3 विमानसेवा कंपन्यांनी सेवा देण्यास होकार कळविला आहे. 

नांदेड येथून आता स्पाईस जेट ही कंपनी मुंबई, दिल्ली, अमृतसर, पटना या महानगरांसाठी विमान सेवा पुरवेल. फ्लाय 91 ही कंपनी नांदेड येथून बेंगलुरू, गोवा या महानगरांसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. स्टार एअर ही कंपनी नांदेड येथून पुणे, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद या ठिकाणी विमान सेवा देण्यासाठी तयार झाली आहे. देशातील प्रमुख महानगरांशी नांदेड आता विमानसेवेने जोडले जाणार असल्याने येथील उद्योग जगतासह पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला. 

नांदेड विमानतळाच्या असुविधेबद्दल लोकप्रतिनिधींनी वारंवार प्रश्न उपस्थित करून ही सुविधा सुरू व्हावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. पालकमंत्री गिरीश महाजन यासाठी विशेष प्रयत्नरत होते. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मागील महिन्यात यासाठी खास नांदेडला भेट देऊन विमानतळावरच आढावा बैठक घेतली होती. या बैठकीस खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भिमराव केराम व पदाधिकाऱ्यांसह नांदेड विमानतळ व्यवस्थापनाचे मुंबई येथील प्रमुख उपस्थित होते. 

नांदेडसह मराठवाड्याला विकासाच्यादृष्टिने केंद्र शासनाने दिलेली ही अपूर्व भेट आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नांदेड भेटीचे हे फलित असल्याचे प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त दिली. मराठवाड्यासह जवळच्या 5 जिल्ह्यातील प्रवाशांना याचा लाभ होणार असून दळणवळणाच्यादृष्टिने आता प्रगतीचे नवे दालन सुरू झाल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत आभार मानले.

 (संग्रहित छायाचित्र - सदा वडजे)

00000









  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...