Thursday, May 12, 2022

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास 

महामंडळाच्या विविध योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रर्वगातील लोकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील इच्छूक लाभार्थ्यांनी www.vjnt.in   या संकेतस्थळावर अर्ज करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे संपर्क करावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक पी. एम.  झोंबाडे यांनी केले आहे. योजनेची माहिती पुढील प्रमाणे आहे.

 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेमध्ये कर्ज व्याज परतावा मर्यादा 10 लाख पर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन असून यासाठी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. तसेच रहिवाशी दाखला, उत्पनाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळेचा दाखला, संबंधित व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल, मूळ कागदपत्रासह वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

 

 गट कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेसाठी कर्जाची मर्यादा 10 ते 50  लाख रुपये पर्यत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. गटातील सदस्याचे वय 18 ते 45 वर्षा पर्यंत असावे. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते हे आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्यांचे सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिम्रीनलकरीता 8 लाख रुपयाची मर्यादा असावी. ही योजना ऑनलाईन असून याकरिता सदस्यांचे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळेचा दाखला, संबंधित व्यवसायाचे कोटेशन प्रकल्प अहवाल सोबत सर्व मूळ कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

 

रुपये 1 लाख थेट कर्ज योजना : या योजनेत महामंडळाकडून रुपये 1 लाख थेट  कर्ज दिले जाते. योजनेसाठी दोन जामिनदार व गहाणखत, बोझा नोंद करून देणे महत्वाचे आहे. याकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला 1 लाख रुपया पर्यंत मर्यादा, रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, इत्यादी कागदपत्रासह व्यवसायानुसार कागदपत्रे जाडणे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाकडून जातीचा मूळ दाखला व आधार कार्ड दाखवून रितसर नोंद करून अर्जदारास मिळेल.

 

बीज भांडवल योजना : बीज भांडवल योजना ही बँकेमार्फत राबविली जाते. अर्जदाराने महामंडळाकडून जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी, पॅनकार्ड, व्यवसायानुसार आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयात दाखल करावेत. यापूर्वी लाभार्थ्यांनी कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.

वरील योजना सन 2022- 2023 या आर्थिक वर्षाकरिता राबविण्यात येत आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना  (IR-1) 50, गट कर्ज व्याज परतावा योजनेचे (IR-2), बीज भांडवल कर्ज योजना 50, रुपये 1 लाख थेट कर्ज योजना 100 असे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. वरील योजनेचा जास्तीत-जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...