Monday, April 13, 2020

कापूस खरेदीचे अधिकृत धोरण जाहिर नाही ;
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर
महासंघाकडून कापूस खरेदी पुन्हा सुरु होईल   
नांदेड, दि. 13 :- मोबाईल व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून सोमवार पासून कापूस पणन महासंघाची हमी दराने कापूस खरेदी सुरु होणार असल्याची बातमी येत आहे. याअनुषंगाने सध्या राज्यात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातलेले असून कापूस खरेदी करणे, त्यावर प्रक्रिया करणे तसेच सरकी व गाठीची डिलेव्हरी करण्यासाठी लागणारे जादाचे मनुष्यबळ / मजूर संख्या यामुळे कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजारासाठी शासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन करणे कठीण असल्यामुळे अजून पर्यंत कापूस खरेदी सुरु करण्याबाबत अधिकृत धोरण जाहिर झाले नाही, याची नोंद सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी घ्यावी, असे आवाहन कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंत रा. देशमुख व उपाध्यक्ष विष्णूपंत सु. सोळंके यांनी केले आहे.  
या सर्व कामांसाठी एका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आवारामध्ये 50 ते 70 पर्यंत मनुष्यबळ कार्यरत राहते. त्यामुळे शासकीय संचारबंदीच्या घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे तसेच दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे यासारख्या महत्वाच्या बाबींवर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे. त्यामुळे सर्व परिस्थिती पाहता शासनाद्वारे याबाबत अधिकृत नियमावली किंवा परिपत्रक प्राप्त झाल्या शिवाय कापूस पणन महासंघाद्वारे कापूस खरेदी सुरु करण्याबाबत निर्णय घेता येणार नाही.
कापूस पणन महासंघाने सोमवार 23 मार्च 2020 पर्यंत 54.06 लाख क्विंटल कापसाची खरेदी केलेली आहे. सोमवार 23 मार्च पूर्वी खरेदी केलेल्या कापसावर प्रक्रियेचे कामकाज सुरु आहे. आजमितीस जवळपास सर्व जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमधील मजूरवर्ग कोरोना आजाराच्या भितीपोटी आपल्या स्वगावी गेलेले आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये मजुरांअभावी प्रक्रियेच्या कामकाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहे. त्यामुळे नव्याने कापूस खरेदी करतेवेळी अपेक्षित मनुष्यबळ प्राप्त करुन घेणे गरजेचे आहे. खरेदी केलेल्या कापसावर तातडीने प्रक्रिया न केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची संभावना असते. त्याचप्रमाणे कापूस खरेदी करतेवेळी संपर्कात येणारे सर्व कर्मचारी, शेतकरी व मजूर वर्गाला कोरोनाची बाधा होवू नये या सर्व बाबी लक्षात घेवून कापूस खरेदी तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे.
जर फॅक्टरी परिसरात काम करीत असलेल्या कर्मचारी, शेतकरी व मजुरांना या आजाराची लागण झाल्यास त्यांच्यामार्फत गावा-गावात, समाजात कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. या आजाराची रोखथाम करणे या उदात्त हेतूने सद्य:स्थितीत कापूस खरेदी बंद केलेली असली तरी कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास अथवा शासनाने आदेशानुसार महासंघातर्फे कापूस खरेदी पुन्हा कार्यरत करण्यासाठी महासंघ काम करेल. याची नोंद सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवानी घ्यावी, असेही आवाहन कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंत रा. देशमुख व उपाध्यक्ष विष्णूपंत सु. सोळंके यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...