कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची जयंती घरीच साजरी करावी
- जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नांदेड, दि. 13 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागरिकांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर घरीच साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
मंगळवार 14 एप्रिल 2020 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा आनंदाचा दिवस आहे परंतु देशात कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक त्रस्त आहेत. हा आजार संसर्गजन्य असून त्याची लागण होण्याची भीती असल्याने नागरिकांनी एकत्रित येऊन सामूहिकपणे हा दिवस साजरा न करता घरीच राहून तो साजरा करावा.
जिल्ह्यात कलम 144 लागू केली आहेत तसेच संचारबंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडता येणार नाही. सोबतच जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदासुद्धा लागू असून त्या कायदाची देखील पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी नागरिकांची आहे.
सध्याची परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग होवून फैलाव होण्याच्या भीतीमुळे, खबरदारी म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना साथ रोग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात मोठा समुदाय आला तर संसर्ग पसरण्याची जास्त भीती आहे. अशा वेळी सर्वांनी घरीच राहून कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपन व पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment