Friday, December 13, 2024

 वृत्त क्र. 1190

नांदेड जिल्‍हयात सोमवार पासून  ॲग्रिस्टॅक मोहिमेस सुरुवात

१६ तालुक्‍यात लोकप्रतिनिधींच्‍या - वरीष्‍ठ अधिकारी यांच्‍या उपस्थितीत एकाच वेळी उदघाटन

नांदेड दि. 13 डिसेंबर : कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ देणे सुलभ व्हावे यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात यासाठी 16 डिसेंबरपासून मोहिम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

शेतकरी ओळख क्रमांकामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान ,पीककर्ज , पीक विमा, शेतीअनुदान इत्‍यादी विविध योजनांचा लाभ सुलभतेने मिळवता येणार आहे. सोमवार १६ डिसेंबर २०२४ रोजी जिल्‍हा भरात या मोहिमेस सुरुवात होणार आहे. प्रत्‍येक तालुक्‍यातील एका गावात स्‍थानिक लोकप्रतिनिधी, प्रभावशाली व्‍यक्‍ती व संबंधीत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपाधिक्षक भूमि अभिलेख व त्‍यांचे अधिनस्‍त कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. 

या योजनेच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावनिहाय पथकांची निर्मिती करण्‍यात आली आहे. यात ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक)/ कृषी सहायक यांचा समावेश आहे. हे पथक त्‍यांना नेमून दिलेल्‍या गावांमध्‍ये तीन दिवस निवासी राहून अॅग्रीस्‍टॅक योजनेची प्रचार व प्रसिध्‍दी करेल आणि जास्‍तीत जास्‍त शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्‍याची कार्यवाही पुर्ण करेल.

तरी शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचे लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी आपल्या गावात मोहिमेच्या दिवशी शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

तालुका निहाय पुढील गावात दिनांक १६.१२.२०२४ रोजी होणार ॲग्रिस्टॅकमोहिमेचे उद्धाटन. नांदेड तालुका दर्यापूर, किनवट- इस्‍लापूर, माहूर- सावरखेड, हिमायतनगर- करंजी, अर्धापूर- पार्डी म., मुदखेड- नागेली, भोकर- पोमनाळ, उमरी- करकाळा, धर्माबाद- नेरली, बिलोली- कोटग्‍याळ, नायगाव- शेळगाव, लोहा- कलंबर खु., कंधार- करताळा, मुखेड- दापका गुं. देगलूर- लख्‍खा व हदगाव तालुक्‍यातील तालंग.

॰॰॰॰॰

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...