Saturday, November 9, 2024

 वृत्त क्र. 1057

पाच उमेदवारांना खर्च सादर न करण्यासाठी नोटीस 

 13 नोव्हेंबरला पुन्हा खर्चाची दुसरी तपासणी होणार 

नांदेड, दि. 9 नोव्हेंबर :- लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी नियमित व निर्धारित कालावधीमध्ये आपला खर्च सादर करणे आवश्यक आहे. यासाठी होणाऱ्या तपासणीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य असते. अशा तपासणीला अनुपस्थित राहणाऱ्या पाच उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्या आहेत.  

7 नोव्हेंबर रोजी उमेदवारांसाठी पहिली तपासणी ठेवण्यात आली होती. दुसरी तपासणी 13 नोव्हेंबर तर तीसरी तपासणी ही 17 नोव्हेंबरला होणार आहे. लोकसभेप्रमाणेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर अशा तीन तपासणी आयोजित केल्या आहेत. 7 नोव्हेंबर रोजी नियोजन भवन येथे लोकसभा पोट निवडणूक तसेच 86-नांदेड उत्तर व 87-नांदेड दक्षिण विधानसभा क्षेत्रासाठी तपासणी संपन्न झाली तर जिल्ह्यातील अन्य विधानसभा क्षेत्रासाठी क्षेत्रनिहाय तपासणी झाल्या आहेत. 

7 नोव्हेंबरला झालेल्या तपासणीला खर्च निरीक्षक श्री. मृणालकुमार दास तसेच श्री. मयंक पाण्डेय यांची उपस्थिती होती. निवडणूक बँक खात्यामधूनच प्रत्येक उमेदवाराने खर्च करावा. केलेल्या खर्चाचा हिशेब तपासणीसाठी सादर करावा अशी सूचना त्यांनी केली. 

जिल्ह्याचे खर्च विभागासाठी नोडल अधिकारी असणारे डॉ. जनार्दन पक्वाने यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभेच्या 19 उमेदवारांपैकी या बैठकीला 14 उमेदवार उपस्थित होते तर 5 उमेदवार अनुपस्थित होते. अनुपस्थितांमध्ये बुलंद भारत पार्टीच्या कल्पना गायकवाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाधर भांगे, नवरंग काँग्रेस पार्टीचे सय्यदा सय्यद, अपक्ष उमेदवार चालिका चंद्रशेखर, अपक्ष उमेदवार यादव धोंडीबा सोनकांबळे यांचा सहभाग होता. या उमेदवारांना 48 तासात खर्चाचा अहवाल सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.  

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...